अधिष्ठाता बदलीची आंधळी कोशींबीर का आणि कशासाठी ?

Rajarshi Shahu Chhatrapati Maharaj Government Medical College Kolhapur

कोल्हापूरात राजर्षी शाहू छत्रपती महाराज शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या अधिष्ठाता पद नियुक्तीवरुन आंधळी कोशिंबीरचा खेळ सध्या सुरु आहे. कोल्हापुरात रोज कोरोना रुग्ण अर्धशतक ठोकत आहेत. वाढणाऱ्या रुग्ण संख्येने सर्वसामान्यांचा ठोका चुकत आहे. अशा गंभीर स्थितीत कोल्हापूरच्या आरोग्याचा मुख्य कणा असलेले सीपीआर मात्र राजकारणाचा अड्डा बनल्याचे संतापदायक चित्र आहे.

मुंबई-पुण्यासह रेड झोनमधून आलेल्या लोकांमुळे कोरोना रुग्णांचा आकडा वाढला. यापुढे सामाजिक संक्रमण होऊ नये, उंबऱ्यापर्यंत आलेला कोरोना घरात येईल, याचीच धास्ती कोल्हापूकरांना आहे. अशातच कोरोनाच्या निमित्ताने आरोग्य यंत्रणेतील फोलपणा उघड होत आहे. हबकलेली यंत्रणा परिस्थिती नियंत्रणात ठेवण्याचा प्रयत्न सुरू आहे. पोलीसांसह आरोग्य कर्मचारी जीवतोडून कष्ट घेत असतानाच सीपीआर प्रशासन मात्र अधिष्ठाता बदलीवरुन चेष्टेचा विषय बनले आहे. चार दिवसांपूर्वी अधिष्ठाता बदलीचा आदेश येतो काय? तोंडी आदेश देऊन थांबवला जातो काय? पदभार सोडल्याचा आणि पुन्हा परत येणार असल्याच्या चर्चाही रंगतात. या सगळ्या घडामोडीतच सीपीआरमधील लुटारु टोळीकडूनच डॉ. जयप्रकाश रामानंद यांना कोल्हापुरात अधिष्ठातापदी येण्यास विरोध होत असल्याचा गंभीर आरोप राज्य नियोजन मंडळाचे अध्यक्ष, माजी आमदार राजेश क्षीरसागर यांनी केला.

कोरोना महामारीच्या जीवघेण्या स्थितीत आरोग्य यंत्रणा सुधारावी, या हेतूने बदलीचा डाव मांडला असेल तर तोंडी आदेशाच्या फैऱ्या का झडत आहेत ? आरोग्य यंत्रणेत सुधारणा करण्याचा गोंडस हेतू असला तरी अधिकारी जाणे आणि येण्याच्या मध्ये इगो नावाचा शब्द असल्याचे एव्हाना स्पष्ट झाले आहे. यातील कोणी आताच्या घडीला तर कोणी सत्ता नसताना नेत्यांची मने दुखावली. माझं काम केल नसल्याचे कारण सांगितले जाते. बदलीच्या घोळात गेली चार दिवस सीपीआरची यंत्रणा स्थिर असेल ? बदलीची मानसिकता झाल्यानंतर अधिकारी त्याच क्षमतेने काम करतील ? अधिष्ठाताच्या खुर्चीवर कोण बसणार हे सर्वसामान्य कोल्हापूकरांना काही देणे घेणे नाही. कोरोना महामारीत सामाजिक आरोग्य जपणारा अधिकारी पाहिजे ही जनतेची रास्त अपेक्षा आहे. तसे न होता अधिष्ठाता बदलीचा घोळ सुरू आहे. यापार्श्वभूमीवर सीपीआर मधील टोळके, दुकानदारी, अतिक्रमण, अधिकाऱ्यांची वागणूक आदी खऱ्या खोट्या चर्चा सुरू झाल्या. यासगळ्या प्रकरणाच्या मुळापर्यंत जाऊन सीपीआरची यंत्रणा सुधारण्याची मोठी संधी यानिमीत्ताने आहे. सीपीआरमध्ये लुटारू टोळके खरचं काय? असल्यास त्याचा कायमचा बंदोबस्त करण्याची जबादारी कोणाची? अधिष्ठाता बदलीचा घोळ संपवून अशा बदल्या या नेत्यांच्या इगो पॉईंटवर नाहीतर गुणवत्तेवर होत असल्याचे आघाडी शासनाच्या प्रतिनिधींना दाखवून द्यावे लागेल नाहीतर….

_तुम से पहले वो जो इक शख़्स यहाँ तख़्त-नशीं था उस को भी अपने ख़ुदा होने पे इतना ही यक़ीं था_

हे पक्के ध्यानात ठेवावे. पब्लिकला येड्यात काढण्याचा प्रयत्न अंगलट येऊ शकतो. जनता व्यक्त न होता मुकपणे सर्व परिस्थितीचे आवलोकन करीत असते. आणि अंबारी उलटी करण्यात कोल्हापूरची जनता माहीर असल्याचे यापूर्वीची अनेक उदाहरणं आहेत. कोरोना हे संकट असले तरी नेत्यांसाठी नेतृत्व आणि कतृत्व दाखविण्याची मोठी संधी असल्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी कामातून दाखवून दिले आहे. किरकोळ बदल्याच्या खेळात हसे करुन कोणी ही संधी कोणी दवडू नये, नाहीतर बदल्यांचे मल्हारी माहात्म्य (नको तिथे, नको ती गोष्ट करणे) महागात पडू शकते.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER