फक्त एकट्या ताहीरवरच कारवाई का? : जावेद अख्तर यांचा सवाल

नवी दिल्ली :- दिल्लीतील हिंसाचारात अनेकांची घरं जाळली गेली. अनेकांचा मृत्यू झाला. पण फक्त एकावरच कारवाई का?, असा प्रश्न गीतकार जावेद अख्तर यांनी ताहीर हुसेन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यावरून ट्विटच्या माध्यमातून पोलिसांना केला आहे. जावेद अख्तर यांच्या ट्विटवरून अनेकांनी त्यांच्यावर टीका केलीय. दरम्यान, आयबी अधिकारी अंकित शर्मा यांच्या हत्येप्रकरणी ताहीर हुसेन यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यानंतर ‘आप’ने ताहीर यांना पक्षातून निलंबित केले आहे.

हिंसाचाराच्या आरोपावरून ‘आप’चे नगरसेवक ताहीर हुसेन यांचा कारखाना पोलिसांनी सील केला. यावर जावेद अख्तर यांनी पोलिसांवर शरसंधान साधले. ‘हिंसाचारात अनेकांचा मृत्य झाला. अनेक जखमी झालेत. कित्येक घरे पेटवली गेली. दुकानं लुटली गेली. तर शेकडो विस्थापित झाले. पण पोलीस फक्त एकावर कारवाई करत आहे. दिल्ली पोलीस एकच गोष्ट घेऊन बसले. त्यांच्या या कामगिरीला सलाम’, असा टोला अख्तर यांनी लगावला आहे. जावेद अख्तर यांच्या ट्विटवर अनेकांनी प्रतिक्रिया देत त्यांच्यावर टीका केली. जावेद अख्तर हे मुस्लिमांना पोलिसांविरोधात चिथावत आहेत, असे माधुरी बोरसे यांनी ट्विट करून म्हटले आहे.

‘आप’चे नगरसेवक ताहीर हुसेन यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत ताहीर हे चाँदबागमधील आपल्या घरात ते दंगलखोरांसोबत हातात लाठी घेऊन असल्याचे दिसत आहे. ताहीर यांनी घरात तरुणांसाठी दगडं गोळा करून ठेवली होती. हे तरुण रस्त्यावरून जाणाऱ्यांवर वरून दगडफेक करत होते, असा दावा या व्हिडिओतून करण्यात आला आहे. तपासात ताहीर यांच्या घरातून पेट्रोल बॉम्ब, दगडांचा साठा आढळून आला.