आव्वाज कुणाचा? अर्थात पुणेकरांचाच !

Uddhav Thackeray- Pune Lockdown - Maharashtra Today

Shailendra Paranjapeराज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी पत्रकारांना सांगितलं की, मंत्रिमंडळातल्या बहुतांश सदस्यांची म्हणजे बहुतेक मंत्र्यांची लॉकडाऊनसदृश निर्बंध १ जूनपर्यंत असेच चालू ठेवावेत, अशीच इच्छा आहे. अर्थात, त्याबद्दलची अधिकृत घोषणा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) एक-दोन दिवसांत करतील. हे सारं टोपे यांनी काल म्हणजे बुधवारी पत्रकारांना सांगितलं. म्हणजे आता, आज, उद्या केव्हा तरी मामु माननीय मुख्यमंत्री आणखी एक फेसबुक लाइव्ह करणार आणि साधे सरळसोट विधान करणार, ज्याला आपण सर्वांनी घोषणा म्हणायचं आहे. किंबहुना, घोषणा करणे म्हणजे आरडाओरडा करणे नव्हे आणि उगीच आरडाओरडा करणं हे शिवरायांच्या महाराष्ट्राला शोभण्यासारखंही नाही.

त्यामुळे मीही शांतपणे बोलतो आणि तुम्हीही शांतपणे ऐका, घरातच बसा, मी तर म्हणतो कारणाविना बाहेर पडूच नका… हे असलं सारं ऐकायची तयारी ठेवा, म्हणजे तुम्ही त्या साऱ्या प्रकाराकडे आयपीएल बंद झाल्याने करमणूक म्हणून बघत असाल तर… नाही तर काय आहेच तासाभराची करमणूक ते ऐतिहासिक फेसबुक लाइव्ह संपल्यानंतरची… सोशल मीडियावरची… तुम्ही माझ्या पिढीतले असाल म्हणजे पन्नाशीचे असाल तर लहानपणी लपाछपीचा खेळ सगळेच खेळलेलो आहोत. त्यात कायम खेळात असलेला पण असून नसलेला एखादा असायचा. म्हणजे तो पहिला गडी आऊट व्हायची वाट बघायचा आणि मग हळूच कोणाच्या लक्षातही येत नाही, अशा पद्धतीने आऊट व्हायचा. पहिल्यांदा आऊट झालेल्यावर पुढचे राज्य येते. कुणी धपांडी दिलीच तर हा आऊट होऊन बघत असल्याने एंजॉय करतो आणि पुन्हा एकदा नीरस जागी लपून राज्य येणार नाही, अशा पद्धतीने आऊट होतो.

मुळात धपांडी द्यायला, राज्य घेऊन सगळे आऊट करायला एक प्रकारची हिंमत लागते. पण याला खेळायचं असतं आणि राज्यही घ्यायचं नसतं. या साऱ्याची आठवण प्रकर्षाने आलीय ती सध्या सुरू असलेल्या राज्यातल्या कारभारामुळे. राज्यशकट हाकण्याची जबाबदारी नेमकी कुणावर आहे, हे काही समजून येत नाही. राज्याचे मार्गदर्शक आणि राष्ट्रवादीचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) आजारी असल्याने पूर्ण अँक्शनमध्ये नाहीत. त्यात सचिन वाझे या पवारसाहेबांनी स्थानिक म्हणून गणलेल्या विषयात वाझे यांची बडतर्फी झालीय आणि माजी गृहमंत्री अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांची आता ईडी चौकशी होणार आहे. त्यामुळे पवारसाहेबांनी किती किती विषयांवर म्हणून बोलायचं, यालाही काही मर्यादा आहेत. त्यात ते मनाने पश्चिम बंगालमध्येच होते आणि त्यांच्या अदृश्य हातामुळे तर ममता बॅनर्जी विजयी झाल्या असल्याने आता कुठे ते रिकामे होतात ना होतात तोच त्यांना आजारानं गाठलंय. त्यांचे पुतणे अजित पवार यांनी आता राज्यबिज्य काही नाही, असं म्हणून येणाऱ्या पुणे महापालिका निवडणुकीत भाजपाला कशी धूळ चारायची, या दृष्टीनं सगळं लक्ष पुण्याकडे वळवलं आहे. त्यात पुण्यात महापालिकेत भाजपाची सत्ता असल्याने खूप लक्ष घालावं लागतंय.

कोरोना (Corona) काळात न्याय करतोय, असं वाटलंही पाहिजे आणि अन्यायही झाला पाहिजे, अशी तारेवरची कसरत करावी लागतीय. नाही म्हणायला महापालिका हद्दीत समाविष्ट केलेल्या नव्या हद्दीवरच्या गावांमधून पक्षाची स्थिती पुण्यात भक्कम होणार आहे, ही खात्री असल्यानं सारं लक्ष पुणे शहराच्या मध्यवस्तीत द्यावं लागणार आहे. काँग्रेसची स्थिती आरतीला टाळ्या वाजवायच्या आणि प्रसाद घेऊन निमूट घरी जायचं, अशी आहे. कोणत्या आरत्या म्हणायच्या, कशा म्हणायच्या यात त्यांना काही नाही, त्यामुळे प्रसाद तरी पदरी पाडून घ्या. उगाच कशाला हात दाखवून अवलक्षण, असाही विचार त्यामागे असेल. या साऱ्या राजकीय हिशेबांमध्ये पुणेकरांनी काय करायचं… काही नाही एप्रिल १५ पासून जे सुरू आहे तेच चालू ठेवायचं. पुण्यात येऊन जे कोणी उपचार मागतील त्यांना ते द्यायचे, नोकऱ्या द्यायच्या, रोजगार द्यायचे, घरं द्यायची, त्यांच्याकडूनच पुणं कसं वाईट आहे आणि पुणेकर कसे वाईट आहेत, हे ऐकायचे. पुण्याची प्रगती करण्यात पुणेकरांचा वाटा आहे तरी किती, या परिसंवादात मूक प्रेक्षक व्हायचं; कारण त्यात सगळे बाहेरचेच बोलतील. परिसंवादात मूळ पुणेकरांना आणि पुण्याला सदाशिव पेठेला शेलक्या शब्दात हिणवलं जाईल, ते ऐकायचं आणि धन्य मानून घ्यायचं. कारण… कारण… पुण्याचं महानगर होतंय आणि महानगर झालं की असंच होतं. मराठीत बोलणं अशक्य होतं.

आपल्याच घराबाहेर ‘न जाने कहां से आते हैं’ असं आपल्याकडे बघितलं जातं. त्यामुळे अशा वेळी एक गोष्ट लक्षात ठेवायची. व्हाट्स अप मेसेज फॉरवर्ड करायला लागतो तितकाच वेळ निवडणुकीत मतदान करायला लागतो. तेव्हा सुटी म्हणून पुण्याबाहेर फिरायला जायचं नाही, कोरोनाची लस घ्यायला उतावीळपणे पहिला नंबर लावला तसाच तो मतदानालाही लावायचा. तर किंबहुना तरच फेसबुक लाइव्हच्या कंटाळवाण्या आणि स्तर खाली आणणाऱ्या करमणुकीतून सुटका होऊ शकेल आणि आवाज कुणाचा, असं न विचारताच तो पुणेकरांचाच आहे, हे लक्षात येईल.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button