ती कविता नेमकी कोणाची आव्हाडांची की पिंगळेंची?

Parag Pingalae-CM Thackeray-Jitendra Awhad

महाराष्ट्राचे कविमनाचे संवेदनशील मंत्री जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddahv Thackeray) यांच्यावर एक बहारदार कविता लिहिली. या कवितेचे शीर्षक आहे, ‘खरंच हा मुख्यमंत्री खूप वाईट आहे’. राज्यातील एका अग्रगण्य वृत्तपत्राने शनिवारच्या अंकात ही कविता आतल्या पानात टॉपला प्रसिद्ध केली. त्यात मुख्यमंत्री ठाकरे आणि आव्हाड यांचे आजूबाजूला फोटोदेखील आहेत. आपल्यावरील आरोपांना मुख्यमंत्री ठाकरे उत्तर देत नाहीत, अशावेळी त्यांच्या मंत्रिमंडळातील सहकाºयाने कविता लिहून विरोधकांना प्रत्युत्तर दिले असल्याचे कवितेला जोडून दिलेल्या बातमीत म्हटले आहे. अख्खी कविता प्रसिद्ध करण्यात आली असून मुख्यमंत्र्यांची भरपूर, जोरदार, वारेमाप स्तुती या कवितेत करण्यात आली आहे.

शनिवारी ही कविता प्रसिद्ध होताच वेगळीच चर्चा सुरू झाली.  ही कविता त्या दैनिकाने आव्हाड यांच्या नावे छापली असली तरी मुळात ती आव्हाड यांनी लिहिलेली आहे की नाही या बाबत शंका उपस्थित करणे सुरू झाले. त्याचे कारणही तसेच घडले. शिवसेनेचे यवतमाळ जिल्हाप्रमुख पराग पिंगळे हे निष्ठावंत शिवसैनिक तर आहेतच शिवाय ते संवेदनशील कविदेखील आहेत. त्यांनी रचलेली ही कविता १४ एप्रिल रोजी त्यांच्या फेसबूक वॉलवर पोस्ट केलेली आहे आणि ती अजूनही त्या वॉलवर आहे. १५ एप्रिल रोजी आव्हाड यांनी ही कविता स्वत:ची म्हणून टिष्ट्वट केली आणि नामवंत दैनिकाने ती शनिवारच्या अंकात प्रसिद्ध केली. त्यामुळे कविता मूळ लिहिली कोणी पिंगळे यांनी की आव्हाड दावा करतात त्या प्रमाणे त्यांनी स्वत: ती लिहिली हा वाद समोर आला. आपली कविता आव्हाड यांनी चोरली अशी कोणतीही तक्रार पिंगळे यांनी केलेली नाही. पिंगळे हे निष्ठावंत शिवसैनिक आहेत. आपली कविता एखाद्या मंत्र्यांने स्वत:च्या नावावर दिली असली तरी त्यात आपल्या साहेबांची (उद्धव ठाकरे) प्रशंसा केलेली आहे. त्यामुळे एका कॅबिनेट मंत्र्याने ही कविता स्वत:ची म्हणून टिष्ट्वट केली तरी पिंगळे यांनी हरकत घेतली नाही अशी माहिती आहे.

आव्हाड यांच्या प्रतिभेविषयी शंका घेण्याचे कारण नाही. ते उत्तम वक्ते आहेत. विविध विषयांचे त्यांना चांगले ज्ञान आहे. उत्तम वैचारिक लिखाणदेखील करतात आणि हे लिखाण महाराष्ट्रातील आघाडीच्या दैनिकांनी आजवर प्रसिद्धदेखील केलेले आहे. मात्र आजची कविता त्यांची आहे की नाही यावरून मात्र वाद रंगला आहे.

पराग पिंगळे (Parag Pingale) यांनी जितेंद्र आव्हाड यांच्या कवितेवर एक पत्र प्रसिद्ध करून ही कविता आपलीच असल्याचे स्पष्ट केले आहे. पिंगळे यांचे हे पत्र असे-

प्रति
मित्रांनो,
जय महाराष्ट्र…!!!!
मी दिनांक 14 एप्रिल 2021 रोजी सायंकाळी “खरंच…. हा मुख्यमंत्री वाईट आहे ” नामक उपरोधिक गद्य कविता लिहिली होती.व मी 14 एप्रिल 2021 रोजीच ती माझे फेअबुकला पोस्ट केलेली आहे.तसेच आपण सर्वांना सुद्धा मी ही गद्य कविता 14 एप्रिल 2021 ला सायंकाळी 8.38 मिनिटांनी पाठविली आहे. ह्या कवितेमध्ये मी विरोधी पक्षावर उपरोधिक टीका केली आहे.

पण 15 एप्रिल 2021 रोजी महाराष्ट्रातील एका मोठ्या व्यक्तिमत्वाने माझी ही कविता स्वतःचे फेसबुक पेज वर त्यांचे स्वतःचे नावे पोस्ट केली आहे.त्यात माझे कुठेही नाव नाही.सदर व्यक्तिमत्व हे मोठे राजकीय व्यक्तिमत्व असल्याने व त्यांचे महाराष्ट्रात लाखो फॉलोवर असल्याने लोकमत,लोकसत्ता व इतर फेसबुक न्युज पोर्टल वर ह्या कविते संदर्भात बातम्या प्रसिद्ध झाल्या आहेत व त्या बातम्या गाजल्या आहेत अर्थात ह्या मध्ये शिवसेना पक्ष प्रमुख व महाराष्ट्राचे उद्धवजी ठाकरे यांचे कामाबद्दल तारीफच झाली आहे व त्याचा मला आनंद आहे.फक्त शब्दरचना म्हणून माझे नाव त्यात नाही.

सदर बातम्या ज्यांनी वाचल्या त्यांना असे वाटू शकते की मी ती कविता त्या व्यक्तित्वाकडून किंवा त्यांचे पेज वरून घेऊन माझे नाव टाकून तुम्हाला पाठवली.ह्या बद्दल मला आज अनेक फोन आले व संभ्रम तयार झाला आहे.म्हणून मी हे स्पष्टीकरण टाकीत आहे.ही गद्य कविता मीच लिहिली आहे व मी हे केव्हाही सिद्ध करू शकतो.

अर्थात शिवसेना पक्षप्रमुख व मुख्यमंत्री  मा उद्धवजी ठाकरे यांची स्तुती साठी मी प्रत्यक्ष अप्रत्यक्ष कारणीभूत झालो ह्याचा मला आनंद आहे.

आपले सर्वांचे माहितीस्तव

आपला नम्र
पराग पिंगळे
शिवसेना जिल्हा प्रमुख
यवतमाळ जिल्हा

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button