मुंबई कोणाची? कंगनाची की शिवसेनेची?

अलीकडे टीव्ही उघडला तर अभिनेता सुशांतसिंह राजपूत (Sushant Singh Rajput) याची आत्महत्या ही देशाची एकमेव समस्या आहे असे तुमचे ठाम मत होईल. फिल्मी नट-नट्यांच्या भांडणाशिवाय दुसरे काहीच घडत नाही असे सध्यादेशाचे वातावरण आहे.

कोरोनाचे संकट (Corona crises) आणि त्यातून ढासळलेली अर्थव्यवस्था याची फारशी चर्चा होत नाही. सुशांतच्या संशयास्पद मृत्यूचे दळण मीडिया दोन महिन्यांपासून दळत आहे. या निमित्ताने बॉलिवूडमधील घराणेशाही, ड्रगचे कनेक्शन असे विषय ढवळून निघत आहेत. यात बिहारचे राजकारण आल्याने कलगीतुरा रंगतो आहे. कंगना राणावत (Kangana Ranaut) नावाच्या नटीने मुंबईची तुलना पाकव्याप्त काश्मीरशी केल्याने वेगळाच भडका उडाला आहे. ‘कंगनाला मुंबईत राहण्याचा अधिकार नाही’ असे वक्तव्य करून राज्याचे गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख (Anil Deshmukh) यांनी आगीत तेल टाकले आहे.

कंगनाच्या वक्तव्याशी भाजप सहमत नाही असे भाजपचे (BJP) नेते आशिष शेलार (Ashish Shelar) यांनी म्हटले असले तरी शिवसेना हे मानायला तयार नाही. त्यामुळे हा विषय चिघळतो आहे. महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारला नेमके काय हवे आहे? गृह खाते राष्ट्रवादी कडे आहे. कागदावर शिवसेनेचे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी राष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार यांच्या इशाऱ्यावर सरकार चालते. त्यामुळे हे सरकार कंगनाला उचलणार. येत्या ९ तारखेला आपण मुंबईत येत असल्याचे कंगनाने जाहीर केले आहे.

त्यावेळी तंटा होणार. मीडियाला मसाला मिळत असला तरी एका सिनेमावाल्या बाईच्या बोलण्यामागे किती धावत सुटायचे याचा विवेक सत्ताधाऱ्यांनी ठेवायला पाहिजे. काही वर्षांपूर्वी आमिर खान याची पत्नी किरण राव हिनेही भारत असुरक्षित वाटतो असे म्हटले होते. तेवढ्यापुरती गरमागरमी होऊन मामला थंड झाला. पण कंगनाचा मामला एवढ्या लवकर संपणार नाही. कंगना केवळ तेवढे बोललेली नाही. दोन महिन्यांपासून ती बोलते आहे. सुशांतची हत्या झाली असे सांगणारी ती पहिली. बॉलिवूडच्या ड्रग कनेक्शनलाही तिनेच वाचा फोडली. पोलीस संरक्षण मिळाले तर मदत करायची तयारीही तिने दाखवली. पण त्याकडे कुठल्या पक्षाला किंवा सरकारला लक्ष द्यावेसे वाटत नाही.

बॉलिवूडमध्ये सर्रास ड्रग घेतले जाते असे खूप लोक बोलतात. सुशांतच्या प्रकरणात नार्कोटिक्स विभागाच्या माणसांना ड्रग कनेक्शन मिळालेही आहे. मग हा व्यवहार कोणाच्या आशीर्वादाने सुरू आहे? सीबीआयवाले आले म्हणून ईडी आणि नार्कोटिक्सवाले आले. सीबीआय नको म्हणणाऱ्या सत्ताधाऱ्यांनी मुंबई पोलिसांना ड्रग आणि इतर कनेक्शन तपासायला का सांगितले नाही? मुंबई पोलिसांची प्रतिमा खराब करण्याचा विषयच नाही.

पण ते जर चांगले काम करीत असतील तर मग हे ड्रग, हे माफिया बिनधास्त कसे? कंगनाचा बोलविता धनी भाजप असल्याचे आघाडीचे नेते म्हणत आहेत. प्रत्येक गोष्ट राजकीय चष्म्यातून पाहिली तर असेच दिसणार. जनतेला ह्या साऱ्याचा कंटाळा आला आहे. कोरोनाच्या रुग्णाला हॉस्पिटलमध्ये बेड मिळत नाही, उपचार तर दूर राहिले. अनेकांच्या नोकऱ्या गेल्या, ज्यांच्या वाचल्या ते अर्ध्या पगारावर गाडा चालवत आहेत. गरिबांवर तर उपासमारीची वेळ आली आहे. हे असेच चालू राहिले तर लुटमार सुरू होईल. लोकांच्या समस्या काय आहेत आणि राजकारणी कशावर झगडत आहेत? आहे का कुणी कान पकडणारा?

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजलाMT LIKE OUR PAGE FOOTER