जाणून घ्या विराट कोहलीऐवजी दिल्लीने कुणाला दिली होती पसंती?

DD & Virat Kohli

त्याच्या राॕयल चॕलेंजर्स बंगलोर (RCB) संघाचे अपयश आणि विराटचे (Virat Kohli) अपयशी नेतृत्व याची सध्या चर्चा आहे. गौतम गंभीर व संजय मांजरेकर यांनी विराटच्या नेतृत्वावर टीका केली आहे तर सुनील गावसकर यांनी विराटने स्वतःच मिळवलेले उत्तुंग यश व त्याच्याशी होणारी तुलना त्याला मारक ठरत असल्याचे म्हटले आहे. विराटच्या नेतृत्वात बंगलोरचा संघ आठ प्रयत्नात एकदाही आयपीएल (IPL) जिंकू शकलेला नाही. या पार्श्वभूमीवर विराटला बंगलोरने दिलेली पसंती हा निर्णय योग्य की अयोग्य हा चर्चेचा विषय होऊ शकतो पण मूळचा दिल्लीचा असलेला विराट कोहली दिल्ली डेअरडेव्हिल्स/ कॕपिटल्सच्या (Delhi Daredevils) संघात का नाही आणि राॕयल चॕलेंजर्स बंगलोरच्या संघात कसा आला, याचा प्रवास मोठा मनोरंजक आहे.

2008 मधील ही गोष्ट आहे जेंव्हा आयपीएलची सुरूवात झाली. त्यावेळी विराट कोहलीकडे दूर्लक्ष करुन दिल्ली डेअरडेव्हील्सने कुणाला पसंती दिली होती….नाव वाचुन तुम्हाला आश्चर्य वाटेल पण दिल्ली डेअरडेव्हिल्स संघाला त्यावेळी विराट कोहलीपेक्षा प्रदीप सांगवान (Pradeep Sangwan) अधिक उपयुक्त वाटला होता. दिल्ली संघव्यवस्थापनाचे त्यावेळी म्हणणे होते की, त्यांना आणखी एक फलंदाज नको होता. त्यावेळी त्यांच्याकडे विरेंद्र सेहवाग व एबी डीविलियर्स होते. त्यामुळे आणखी एक फलंदाज नको हा दिल्लीचा त्यावेळचा विचार बरोबरच होता. मात्र राॕयल चॕलेंजर्स बंगलोरने विराटला आपल्या संघात घेतले आणि पुढचा प्रवास सर्वांना माहित आहे.

भारतीय संघाने 19 वर्षाआतील विश्वचषक स्पर्धा जिंकल्यावर विराट कोहली एकदम प्रकाशझोतात आला होता. तो विश्वविजेता कर्णधार होता. त्यामुळे विराट कोहलीसाठी पहिल्या आयपीएलवेळी बऱ्याच फ्रँचाईजी उत्सुक होत्या. विराट मूळचा दिल्लीचा असल्याने त्याला दिल्ली डेअरडेव्हिल्स आपल्याकडेच घेईल असे सर्वांना वाटत होते पण दिल्लीच्या व्यवस्थापनाने त्याच्याऐवजी गोलंदाज प्रदीप सांगवानला पसंती देऊन सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला होता.

त्यानंतर पहिल्या मोसमापासून आजतागायत विराट हा राॕयल चॕलेंजर्स बंगलोरसाठी खेळत आलेला आहे. त्याने 192 डावात 5878 धावा केल्या असुन आयपीएलच्या इतिहासात सर्वाधिक धावा त्याच्या नावावर आहेत.

दुसारीकडे सांगवान, ज्याला कोहलीच्या ऐवजी दिल्लीने घेतले होते, त्याने आयपीएलच्या 39 सामन्यात 35 बळी मिळवले आहेत आणि त्याची इकाॕनाॕमी 8.79 आहे. शिवाय 2013 मध्ये डोप टेस्टमध्ये दोषी आढळल्यावर क्रिकेट मंडळाने त्याला 15 महिने बंदीची शिक्षासुध्दा केली होती. सांगवानने दिल्लीशिवाय कोलकाता नाईट रायडर्स व मुंबई इंडियन्सचेही प्रतिनिधित्व केले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER