‘सरकार कोणाचेही असो, उपमुख्यमंत्री अजित पवारच असतील’, चंद्रकांत पाटील यांचे विधान

Ajit Pawar - Chandrakant Patil

मुंबई :- राज्यात सत्ताबदल निश्चित असून तो कधी होणार हे अजित पवार (Ajit Pawar) यांना माहिती आहे. तसेच सरकार कोणाचेही असो अजितदादाच उपमुख्यमंत्री असतील, असे सूचक विधान भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केले. त्यांच्या या विधानानंतर राजकीय चर्चेला उधाण आले आहे. ते गुरुवारी मुंबईत ‘टीव्ही-९ मराठी’शी बोलत होते.

यावेळी चंद्रकांत पाटील म्हणाले की, आम्ही किंवा त्यांनी कोणीही अहंकार करु नये. कालचक्र हे फिरत असतं. १५ वर्षे त्यांची सत्ता होती, ती जाऊन पाच वर्षे आमची सत्ता आली होती. आता पुन्हा त्यांची सत्ता आली आहे. त्यामुळे कुणीही सत्तेचा अमरपट्टा घालून आलेले नाही. महाविकास आघाडीचं सरकार कधी आणि कसं पडणार, हे अजित पवारांना नेमकेपणाने ठाऊक असल्याचे चंद्रकांत पाटील यांनी सांगितले.

ही बातमी पण वाचा : ‘कधी टरबूज-खरबुजची सोसायटी चालवली का’?, अजितदादांचा चंद्रकांत पाटील यांना टोला

पंढपरपूरची पोटनिवडणुकीत महाविकास आघाडीचा (Mahavikas Aghadi) पराभव नक्की आहे. त्यामुळे अजित पवार यांना राजकीयदृष्ट्या फारसे महत्त्व नसलेल्या लोकांच्या घरी जावे लागते. हा अजित पवारांचा स्वभाव नाही. हा स्वभाव शरद पवार (Sharad Pawar) यांचा आहे. हे निवडणूक त्यांच्या हातातून गेल्याचं लक्षण आहे. अजित पवार यांच्या पायाखालची जमीन सरकल्याचे दिसत आहे. शरद पवारांवरील माझी पीएचडी अद्याप पूर्ण झालेली नाही. पण आता अजित पवारांवर मी एम फील करणार आहे. त्यासाठी मी काही प्राध्यापकांची भेट घेणार आहो. इतके सगळे प्रकार करुनही छातीठोकपणे कसं बोलतात याचा अभ्यास मी करणार आहे. म्हणजे यांच्यावर सिंचनाच्या केसेस आहेत, राज्य सहकारी बँकेची चौकशी संपलेली नाही. महाराष्ट्रात जो कारखाना बंद पडेल तो हे विकत घेणार. पवार कुटुंबाचे प्रत्यक्ष-अप्रत्यक्ष किती साखर कारखाने आहेत याची श्वेतपत्रिका काढली पाहिजे.

इतकं केल्यानंतरही देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) मुख्यमंत्री झाल्यानंतर हे उपमुख्यमंत्री, उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) मुख्यमंत्री झाल्यानंतरही हे उपमुख्यमंत्री आहेत. महाराष्ट्रात कम्युनिस्टांचं राज्य आलं तरी हेच उपमुख्यमंत्री असतील, असा टोलाही चंद्रकांत पाटील यांनी लगावला.

ही बातमी पण वाचा : ‘कालचक्र नेहमी फिरत असतं हे विसरु नये’, आघाडी सरकारबाबत चंद्रकांत पाटील यांचे सूचक विधान

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button