पंढरपुरात कोण बाजी मारणार? भालके की आवताडे? एक्झिट पोलचा निष्कर्ष धक्कादायक

Bhagirath Bhalke - Samadhan Awatade

पंढरपूर : भाजप (BJP) आणि राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) प्रतिष्ठेच्या केलेल्या पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीसाठी शनिवारी मतदान पार पडलं आहे. येत्या २ मे रोजी या निवडणुकीचा निकाल हाती येणार आहे. या निवडणुकीचे एक्झिट पोल आले असून त्यात राष्ट्रवादीचे उमेदवार भगीरथ भालके (Bhagirath Bhalke) यांना पराभवाचा सामना करावा लागू शकतो. तर भाजपचे उमेदवार समाधान आवताडे यांचा निसटता विजय होताना दिसत आहे. याबाबतचे वृत्त टीव्ही-९ मराठीने दिले आहे.

राष्ट्रवादीचे दिवंगत आमदार भारत भालके यांचं निधन झाल्यानंतर पंढरपूर-मंगळवेढा विधानसभेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या निवडणुकीत भालके यांचे चिरंजीव भगीरथ भालके यांना उमेदवारी देण्यात आली. त्याला शिवसेना (Shiv Sena) आणि काँग्रेसने (Congress) पाठिंबा दिला. तर भाजपने समाधान आवताडे यांना उमेदवारी दिली. या दोन्ही उमेदवारांच्या प्रचारासाठी दोन्ही पक्षांनी मोठी ताकद लावली होती. या पोटनिवडणुकीसाठी एकूण ३,४०,८८९ मतदारांपैकी २,२५,४९८ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. एकूण ६६.१५ टक्के मतदान या पोटनिवडणुकीसाठी झालं.

या निवडणुकीनंतर पुण्याच्या द स्ट्रेलेमा या संस्थेने एक्झिट पोल जाहीर केले आहे. त्यानुसार भगीरथ भालके यांना ९५,५०८, समाधान आवताडे यांना ९८,९४६, अपक्ष उमदेवार सिद्धेश्वर आवताडे यांना ७,१२४, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे सचिन शिंदे यांना ८,६१९, अपक्ष उमेदवार शैला गोडसे यांना ६,५९६ आणि इतरांना ८,६९३ मते प्राप्त होणार आहेत. एक्झिट पोलनुसार समाधान आवताडे हे ३,४३८ मताधिक्य घेऊन विजयी होणार असल्याचं म्हटलं आहे. म्हणजे दोन टक्के मतांनी आवताडे यांचा विजय होताना दिसत आहे. उपलब्ध संसाधने आणि सहानुभूती या स्पर्धेत संसाधनांनी सहानुभूतीवर मात केल्याचंही या निष्कर्षात नमूद केलं आहे.

या निवडणुकीत राष्ट्रवादीचे नेते जयंत पाटील आणि अजित पवार अनेक ठिकाणी प्रचारसभा घेऊन सर्व ताकद झोकून दिल्याचे दिसून आले. जयंत पाटील यांनी गावपातळीवर जाऊन प्रचार केला. त्यांनी थेट मतदारांशी संवाद साधला. त्याचा ३५ गावांमध्ये चांगला परिणाम झाला. त्यातच काही नेत्यांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला. राष्ट्रवादीने मायक्रो प्लानिंग केल्याने त्याचा चांगला परिणाम दिसून आल्याचं एक्झिट पोलच्या निष्कर्षात म्हटलं आहे.

तर दुसरीकडे या मतदारसंघात १५ टक्के धनगर समाज आहे. हा मतदार भारत भालके यांच्या बाजूने होता. मात्र, आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांनी धनगर समाजात जाऊन स्थानिक नेत्यांशी चर्चा केली. कार्यकर्त्यांच्या गाठीभेटी घेतल्या. त्यावेळी धनगर समाजातील (Dhangar Community) पडळकरांची क्रेझ दिसून आली. धनगर समाजातील एकमेव मंत्री दत्तात्रेय भरणे यांनीदेखील धनगर नेत्यांशी चर्चा केली. त्यांनी हा पारंपरिक मतदार भालकेंकडे कसा येईल याचा प्रयत्न केला. भरणे यांनी उत्कृष्ट नियोजन केल्याने हा मतदार भालकेंच्या मागे उभा राहताना दिसत असल्याचा निष्कर्षही यात नोंदवण्यात आला आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button