संजय राऊत यांच्या तोंडाला कोण कुलूप लावणार?

Sanjay Raut And Uddhav Thackeray Editorial

badgeभावाला मंत्री केले नाही ही गोष्ट शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांना खूपच टोचलेली दिसते. काय बोलले म्हणजे काय होऊ शकते हे न कळण्याएवढे राऊत कच्चे नाहीत. तरीही ह्या १५ दिवसात राऊत यांनी केलेल्या वक्तव्यांनी तीन पक्षांच्या आघाडी सरकारला अडचणीत आणण्याचेच काम केले आहे. सरकार अडचणीत येईल असे काहीही बोलायचे नाही असे ठरले असताना संजय राऊत यांनी वादग्रस्त वक्तव्यांचा सपाटा लावला आहे.

‘इंदिरा गांधी डॉन करीम लाला याला भेटायला जात होत्या’ असा स्फोट राऊत यांनी नुकताच केला होता. आता ‘स्वातंत्र्यवीर सावरकर यांना ‘भारतरत्न’ देण्याला विरोध करणाऱ्यांना अंदमान जेलमध्ये पाठवा’ असे वक्तव्य करून राऊत यांनी नवे वादळ उठवले आहे. सावरकरांना ‘भारतरत्न’ द्यायला राहुल गांधी यांचा विरोध सर्वांना ठाऊक असताना राऊत यांच्या वक्तव्याने काँग्रेसवाले दुखावले आहेत. राऊत यांचे वक्तव्य हे त्यांचे वैयक्तिक आहे असे सांगून आदित्य ठाकरे यांनी स्वतःची सुटका करून घेतली खरी. पण हा मामला चिघळला तर उद्धव सरकार अडचणीत येऊ शकते. राऊत यांच्या तोंडाला कुलूप लावण्याची मागणी काँग्रेससोबत शिवसेनेतूनही सुरु झाली आहे.

पण इतक्या वर्षांचे सोबती संजय राऊत यांना हाकलण्याचे धाडस शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे करतील काय? याची चर्चा शिवसेनेत सुरु झाली आहे. स्वतः उद्धव कमी बोलण्यासाठी प्रसिद्ध आहेत. बडबड करण्याचा त्यांचा स्वभाव नाही आणि तशी त्यांची तब्येतही नाही. त्यामुळे राऊतांनी बोलायचे आणि शिवसेनेतील इतरांनी मौन पाळायचे असेच ठरलेले दिसते. वादग्रस्त बोलून मीडियाचा सारा फोकस राऊत घेत आहेत. ह्या वादळात खुद्द मुख्यमंत्री उद्धव सायडिंगला पडत आहेत. ‘मातोश्रीमध्ये याची चर्चा होऊ लागली आहे. राऊत यांची खुन्नस किती दिवस दोन्ही काँग्रेस खपवून घेतात त्यावर उद्धव सरकारचे आयुष्य अवलंबून आहे.

मोरेश्वर बडगे
लेखक ज्येष्ठ पत्रकार आहेत.