शिवजयंती सगळीकडे जोरात; गुन्हे कोणाकोणावर दाखल करणार?

Uddhav Thackeray - Shivjayanti Celebration

मुंबई :- शिवसेनेच्या नेतृत्वात महाविकास आघाडीचे (Mahavikas Aghadi) सरकार असूनही अगदी १०० लोकांच्याच उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी करावी, असे आदेश राज्याच्या गृह विभागाने कोरोनाचे कारण देत दिलेले होते. त्या आदेशाचा शुक्रवारी पुरता फज्जा उडाला. ठिकठिकाणी उत्साहात जयंतीनिमित्त मिरवणुका निघाल्या, सभा झाल्या, उत्सव दणक्यात साजरा झाला. शिवसेनेकडून दरवर्षी शिवजयंती ही महाराजांच्या जन्मतिथीनुसार साजरी केली जाते. राज्य शासनाकडून मात्र १९ फेब्रुवारीला म्हणजे तारखेनुसार शिवजयंती साजरी केली जाते.

गृह विभागाने गेल्या आठवड्यात एक आदेश काढून शिवजयंती केवळ १०० लोकांच्याच उपस्थितीत साजरी करा, सार्वजनिक ठिकाणी शिवजयंतीनिमित्त कोणतेही सांस्कृतिक कार्यक्रम होऊ नयेत, भाषणे होऊ नयेत असा फतवा गृह विभागाने काढला होता; पण राज्याच्या विविध भागांत सरकारचे हे आदेश धाब्यावर बसविण्यात आले आणि शिवभक्तांच्या उत्साहावर सरकारचा आदेश पाणी फिरू शकला नाही हे स्पष्ट झाले. विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत नागपुरातील शिवाजीनगर उद्यानात भरगच्च उपस्थितीत कार्यक्रम झाला. छत्रपती शिवरायांची  जयंती उत्साहपूर्ण वातावरणात साजरी करण्यापासून आम्हाला कोणीही रोखू शकत नाही, असे त्यांनी बजावले.

अकोला जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अमोल मिटकरी (Amol Mitkari) यांच्या नेतृत्वात ५०० लोकांच्या उपस्थितीत शिवजयंतीची मिरवणूक काढण्यात आली. दिग्रसमध्ये उपनगराध्यक्ष यांनी विनापरवानगी मोठी मिरवणूक काढली. सामाजिक अंतर राखण्याचे आवाहन गृह विभागाने केले होते. तेही कोणी पाळले नाही. मुळात कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतो आहे हे खरे असले तरी सर्वांसाठी नियम सारखेच का नाहीत, असा सवाल आहे. आठ दिवसांपूर्वी मुंबईत काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्षपद स्वीकारले तेव्हा मोठा मेळावाच झाला. शेकडो कार्यकर्ते राज्यभरातून आलेले होते. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील हे दोन दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह झाले; पण त्याच्या आदल्या दिवशीपर्यंत ते राष्ट्रवादी परिवार संवादयात्रेच्या निमित्त राज्यभर फिरत होते. मेळाव्यांमध्ये भाषणे देत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादीच्या नेत्यांना एक न्याय आणि शिवाजी महाराजांच्या जयंती उत्सवाला वेगळा न्याय कसा, असा सवाल भाजपच्या नेत्यांनी केला तर काय चुकले? शिवजयंतीनिमित्त गृह विभागाच्या आदेशांचे पालन न करणाऱ्यांविरुद्ध आता कदाचित गुन्हे दाखल केले जातील; पण आधी दाखल केलेल्या गुन्ह्यांचे काय झाले? कोरोना काळातील निर्बंधांचे  उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध हजारो गुन्हे राज्यात दाखल करण्यात आले होते. ते मागे घेण्यात येतील अशी घोषणा कोरोना पूर्णपणे संपण्याच्या आधीच गृहमंत्री अनिल देशमुख यांनी करून टाकली. त्यामुळे निर्बंध तोडल्याने काहीही फरक पडत नाही, आज ना उद्या गुन्हे मागे घेतले जातात हा चुकीचा संदेश लोकांमध्ये गेला.

त्यामुळे आता निर्बंध मोडताना लोक मागेपुढे पाहणार नाहीत. गुन्हे मागे घेण्याची घोषणा करताना इतकी घाई करण्याची गरज होती का, असा प्रश्न त्यातून निर्माण झाला आहे. कोरोनाचे संकट वाढते आहे हे नक्कीच. त्यातल्या त्यात दिलासा देणारी बाब म्हणजे आतापर्यंत अमरावती, यवतमाळ, सातारा या भागांतील प्रत्येकी चार नमुने पुणे येथील बी. जे.  मेडिकल कॉलेजमध्ये तपासण्यात आले असून या नमुन्यांच्या तपासणी अहवालानुसार या जिल्ह्यांमधील विषाणूंमध्ये ब्रिटन, दक्षिण आफ्रिका किंवा ब्राझील या देशांमध्ये आढळलेल्या नवीन विषाणू प्रकारासारखा कोणताही घटक दिसून आलेला नाही. आता अकोला, अमरावती, यवतमाळ या जिल्ह्यांतील  आणखी काही नमुने राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्था आणि राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था पुणे या ठिकाणी तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. या संदर्भातील सविस्तर अहवाल पुढील आठवड्यात मिळणार आहे.

ही बातमी पण वाचा : शिवजयंतीच्या मुद्द्यावरुन फडणवीसांनी  राज्य सरकारची मुघलांशी केली तुलना

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER