मी काय बोलायच ते मुश्रीफ आणि सतेज पाटील कोण ठरविणार : चंद्रकांत पाटील

Chandrakant Patil

कोल्हापूर : मी पंतप्रधान असेन नाहीतर शेतकऱ्याच पोर ? मी काय बोलायच ते हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील कोण ठरवणार ? असा सवाल भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी उपस्थित केला. माझ्यावर बोलल्याशिवाय कोल्हापूर जिल्ह्यातील या दोन नेत्यांना चैन पडत नाही. पवारांना खूष करण्यासाठीच मी जगात कुठेही काही बोललो तरी मुश्रीफ प्रतिक्रिया देतात असा टोलाही आ. पाटील यांनी लगावला.

मुळ कृषी कायदा रद्द होणार नाही, मात्र त्यामध्ये काहीना काही सुधारणा होतील असे मत व्यक्त केले होते. मी जगात कुठेही बोललो तरी जिल्ह्यातील दोन नेते प्रतिक्रिया देतातच. कायदा रद्द होणार नाही, हे सांगणारे चंद्रकांत पाटील पंतप्रधान झाले काय? असे मंत्री हसन मुश्रीफ यांनी प्रत्युत्तर दिले. मी पंतप्रधान आहे, की सामान्य शेतकरी आहे, हे तुम्ही कोण ठरविणार? पण माझ्या प्रत्येक विषयात त्यांनी बोललेच पाहिजे. त्याशिवाय पवारांच्या प्लसमध्ये जाता येत नाही. पवारांना खूष करण्यासाठीच मुश्रीफ माझ्या वक्तव्यावर तत्काळ प्रतिक्रिया देतात.

शेतकऱ्यांच्या बांधावर जावून बोलून दाखवा, असे सतेज पाटील म्हणाले, यावर आ. पाटील म्हणाले, बंटी साहेब हे कोणाला सांगताय. आम्ही शेतकऱ्याची पोर आहोत. तुम्ही आम्हाला नका शिकवू. समरजीत घाटगे आणि भाजपचे कार्यकर्ते गेली काही महिने शिवार सभाच घेत आहेत. बांधावर नाही तर शिवारात शेतकरी त्यांचे स्वागत करत आहे. बंटी साहेब तुमचं ते हवाई राजकारण आहे. त्यात हे बसत नाही. पण आम्ही शेतकऱ्याला बांधावरच भेटत आहोत, असेही आ. पाटील म्हणाले.

प्रत्येक पक्षाचा नेता एकमेकाला भेटतो, एकमेकांची कामे करुन घेतात. परंतू वर्षभरापासून राज्यातील राजकारण बदलले आहे. एकमेकाला दुष्मन समजू लागले आहेत. ही राज्याची संस्कृती नव्हती. महादेव जानकर यांचे शरद पवार यांच्याकडे काहीतरी काम असेल किंवा पवारांनी त्यांना चहा पिण्यासाठी बोलावले असेल. कोणी ही कोणाला भेटू शकतो. मीही त्यांना भेटेन. त्यात विशेष काही नाही, असे शरद पवार आणि जाणकर यांच्या भेटीवर आ. पाटील यांनी टिप्पणी केली.

मराठा आरक्षणात सक्षम बाजू मांडा

मराठा आरक्षणाबाबत सुप्रिम कोर्टात दावा सुरु आहे. त्यावर काही प्रतिक्रिया देणार नाही. परंतू येत्या सुनावणीत राज्यातील मंत्री आणि ॲडव्होकेट जनरल उपस्थित राहतील, अशी आशा आहे. सरकारने तयारीने जावे. सक्षम बाजू मांडावी. मराठा आरक्षणावरील स्थगिती रद्द व्हावी, अशी प्रार्थना देवाजवळ करतो, असे आ.पाटील यांनी सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER