कोण ‘सरप्राईज’ उमेदवार लढवणार मुख्यमंत्र्यांशी पंजा?

Who will contest the 'surprise' candidate with the CM

badgeविधानसभा निवडणुकीत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याविरोधात आम्ही ‘सरप्राइज’ तगडा उमेदवार देऊ, असे प्रदेश काँग्रेसच्या नेत्यांनी जाहीर केल्यानंतर ‘हा तगडा पहिलवान कोण?’ याची चर्चा रंगली आहे. ‘हा कोण बकरा पकडणार?’ अशीच बहुतेकांची प्रतिक्रिया आहे. कारण ‘नागपुरात मुख्यमंत्र्यांना वॉकओव्हर मिळणार’ असे चित्र कालपर्यंत होते. स्थानिक कुणीही नेता मुख्यमंत्र्यांशी कुस्ती खेळायला तयार नाही. प्रफुल्ल गुडधे, विकास ठाकरे हे एकदा लढून थकले. पण बाळासाहेब थोरात, पृथ्वीराज चव्हाण यांनी ‘सरप्राईज’ची भाषा केल्याने ‘हा कोण?’ याची झाडाझडती सुरू  झाली. थोरात गंमत करत आहेत असे अनेकांना वाटले. पण दिल्लीत माहिती घेतली असता हायकमांड खरेच मुख्यमंत्र्यांविरुद्ध तगडा पहिलवान उभा करण्याच्या मूडमध्ये आहे असे दिसते. खुद्द सोनिया गांधी गंभीरपणे ह्या शोधकार्यात लक्ष घालत आहेत. फडणवीस यांच्याविरुद्ध उमेदवार दिला नाही तर काँग्रेसची देशभर बदनामी होईल, असे सांगून सोनियाजींनी आपल्या कोअर टीमला कामाला लावले आहे.

काही वर्षांपूर्वी मध्यप्रदेशात अशीच परिस्थिती काँग्रेसवर ओढवली होती. तेव्हाचे मुख्यमंत्री शिवराजसिंह चव्हाण यांच्याविरुद्ध काँग्रेसने माजी केंद्रीय मंत्री अरुण यादव यांना उभे केले होते. हा प्रयोग यशस्वी झाला नाही. पण सोनियाजी तो प्रयोग पुन्हा करू पाहात आहेत. त्यांच्या टीमने त्यांच्याकडे चार नावं दिली आहेत. चौघेही फडणवीस यांना जोरदार टक्कर देऊ शकतात, असे ह्या टीमने सांगितले आहे. ह्या चारमध्ये पहिल्या नंबरवर नागपुरातून पाच वेळा खासदार म्हणून निवडून गेलेले, केंद्रीय मंत्री राहिलेले हेवीवेट विलास मुत्तेमवार यांचे नाव आहे. केरळ, तामिळनाडूची निवडणूक जिंकून देणारे मुकुल वासनिक दुसऱ्या नंबरवर आहेत. काँग्रेसचे गेली १७ वर्षे सरचिटणीस असलेले वासनिक यांचे घर फडणवीस यांच्या मतदारसंघातच आहे; शिवाय ते शेजारच्या रामटेकमधून खासदार म्हणूनही निवडून आले आहेत. दुसरे सरचिटणीस अविनाश पांडे हेही मूळचे नागपूरचे असून नुकतीच त्यांनी राजस्थानची निवडणूक पक्षाला जिंकवून दिली आहे. चौथे  नाव नाना पटोले यांचे आहे. ‘जायंट किलर’ म्हणून प्रसिद्ध असलेले नाना यांनी नुकत्याच झालेल्या निवडणुकीत नितीन गडकरी यांचा लीड कमी करून दाखवला आहे. ह्या चौघांतून  कुणाला आखाड्यात उतरावे? असा प्रश्न सोनियाजींना पडला आहे. आपल्याकडे एवढे तेल लावलेले पहिलवान  असताना आपण उगाच काळजीत होतो या विचाराने त्या अलीकडे प्रसन्न आहेत, असे म्हणतात. चिठ्ठी काढून एकाचे नाव पक्के केले जाणार आहे. ‘सरप्राईज’ उमेदवार ही संकल्पना ह्या चिठ्ठीप्रकारातून आली असावी.

काहीही असो, काट्याची टक्कर पाहायला मिळणार म्हणून नागपूरकरांची उत्सुकता ताणली गेली आहे. पण विश्लेषकांचा निचोड वेगळा आहे. ‘सोनियाजी उमेदवार नव्हे, बळीचा बकरा शोधत आहेत’ असे त्यांना वाटते. नागपुरात भाजपला आणि त्यातल्या त्यात फडणवीस यांना हरवणे शक्य नाही, असे विश्लेषकांना वाटते.