कौन बनेगा पंतप्रधान ? निकालाआधीच भांडणं

Badge‘बाजारात नाही तुरी आणि भट भटणीला मारी’ अशी जुनी म्हण आहे. लोकसभा निवडणुकीचे अखेरच्या टप्प्याचे मतदान शिल्लक आहे. मतमोजणीही व्हायची आहे. २३ तारखेला निकाल आहे. कुठे कशाचा पत्ता नसताना विरोधी नेत्यांची लगीनघाई सुरु झाली आहे. त्यांचा एकच अजेंडा आहे. मोदींना कसे रोखायचे? भाजप आणि त्याच्या एनडीएला बहुमत मिळाले नाही तरच हा प्रश्न निर्माण होणार आहे. पण विरोधकांना उड्या मारायला बंदी थोडीच आहे?

ही बातमी पण वाचा : पवारांना करायचे आहे सुप्रियाला मुख्यमंत्री

काँग्रेसच्या पुढाकाराने २१ मे रोजी दिल्लीत विरोधी नेत्यांची बैठक बोलावली होती. मोदींना सत्तेपासून दूर ठेवण्याची रणनीती ठरवायची होती. पण ममता, मायावती यांनी, एवढी घाई कशाला? असे म्हटल्याने ही बैठक गुंडाळल्यात जमा आहे. भाजप नाही तर पंतप्रधानपदाचा उमेदवार कोण? हा विरोधी नेत्यांपुढे पेच आहे. कारण खुर्ची एक आहे आणि दावेदार अनेक आहेत. गेल्या चार दिवसात ममता आणि मायावती यांनी मोदीं यांच्यावरील हल्ले वाढवले आहेत. ममता, मायावती, राहुल गांधी, चंद्राबाबू नायडू… अगदी शरद पवारसुद्धा पंतप्रधान होऊ शकतात. राजकारणात काहीही होऊ शकते. देवेगौडा, गुजराल किंवा नरसिंहराव, मनमोहन सिंग पंतप्रधान होतील अशी कुणी स्वप्नातही कल्पना केली नव्हती. ममता यांना मायावती चालत नाहीत आणि मायावतींना राहुलबाबा चालत नाहीत.

ही बातमी पण वाचा : बिग फाईट ; शत्रुघ्न सिन्हा पडू शकतात

एकमत होत नसेल तर अखेरच्या क्षणी पवारांचे नाव पुढे येऊ शकते. पवार जुगाडू आहेत. त्यांचे कुणाशीही जमू शकते. त्यामुळे सर्वांना चालणारा म्हणून पहिल्यांदाच देशाला मराठी पंतप्रधान मिळू शकतो. पवारांचे राजकारण त्याच दिशेने सुरु आहे. पण दक्षिण भारतातून यावेळी पंतप्रधान व्हावा यासाठी वेगळा दबावगट सक्रिय झाला आहे.

तेलंगणचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव आणि वायएसआर काँग्रेसचे जगन मोहन रेड्डी तिसरी आघाडी बनवण्याच्या कामाला भिडले आहेत. हे दोघे मिळून ४० खासदारांचा दबाव गट उभा करू शकतात. त्रिशंकू लोकसभा आली तर तशा परिस्थितीत ह्या दोघांचे महत्व वाढते. २३ तारखेला कसे निकाल लागतात त्यावर सारा खेळ आहे. मोदी म्हणतात त्या प्रमाणे ३०० जागा भाजपला मिळाल्या तर विरोधकांचा खेळ खल्लास होतो. पण कुणाला स्पष्ट बहुमत नसेल तर घोडेबाजार सुरु होईल. अशा वेळी कोण अधिकाधिक खासदार गोळा करू शकतो त्यांची लॉटरी लागणार आहे. भाजपलाही थोड्या जागा कमी पडल्या तर ‘मोदी नको’ अशा अटीवर काही विरोधी पक्ष भाजपसोबत बसू शकतात.