स्वप्निल जोशी कोणाचा घेणार बळी

Maharashtra Today

मराठीत हॉरर सिनेमाची (Marathi Cinema) परंपरा फार मोठी नाही. जे काही हॉरर जॉनरअंतर्गत सिनेमे आले ते विनोदी हॉरर सिनेमे होते. हॉलिवूड किंवा बॉलिवूडमध्ये ज्याप्रमाणे हॉरर सिनेमे येतात तसे पीक मात्र मराठी अजून तरी आलेले नाही. याचे काय कारण असावे ते समजत नाही. पण पुढील महिन्यात मराठी प्रेक्षकांसाठी एक हॉरर सिनेमा येत असून या सिनेमाबाबत मराठी सिने इंडस्ट्रीत प्रचंड चर्चा सुरु झाली आहे. या सिनेमाचे पहिले पोस्टर जेव्हा रिलीज झाले तेव्हाच या सिनेमाबाबत उत्सुकता निर्माण झाली होती आणि या सिनेमात टीझर जेव्हा रिलीज झाला तेव्हा तर ही उत्सुकता अजूनच वाढली आहे. पहिला टीझर चांगलाच भितीदायक आहे.

‘जीसिम्स’ कंपनीने यापूर्वी ‘मोगरा फुलाला’, ‘बोनस’ या मराठी सिनेमांसह ‘समांतर-१’, ‘समांतर-२’ आणि ‘नक्सलबारी’ या वेबसीरीजचीही निर्मिती केली आहे. बळी सिनेमाचे प्रस्तुतकर्ते अर्जुन सिंग बरान आणि कार्तिक डी निशाणदार असून सिनेमाचे दिग्दर्शन विशाल फुरियाने केले आहे. स्वप्निल जोशी (Swapnil Joshi) यात मुख्य भूमिका साकारीत आहे. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टीझरमध्ये ऊसासे टाकणाऱ्या आवाजातील एका आईचे आर्त उद्गार कानी पडतात. ‘बाSSळा’ अशी आर्त हाक ती कुणाला तरी घालताना दिसते. त्यानंतर सिनेमाचा नायक एका पडक्या वाडा रुपी रुग्णालयात कुणाचातरी शोध घेताना दिसतो. ‘मी इथेच आहे बाळा,’ असा त्या आईचा काहीसा घाबराघुबरा आवाज ऐकू येतो. त्या पाठोपाठ ‘एलिझाबेथSS’ अशी हाक ऐकू येते. ती आई ‘घाबरू नकोस…’ म्हणत आपल्या बाळाला धीर देवू पाहते…. अक्षरशः काही सेकंदाचा हा व्हीडियो अंगावर शहारा आणणारा आहे.

तीन वर्षांपूर्वी आलेल्या ‘लपाछपी’ या थ्रिलर सिनेमामुळे लोकप्रिय झालेला दिग्दर्शक विशाल फुरियाने ‘बळी’बद्दल बोलताना सांगितले, “लपाछपी’पेक्षाही हा सिनेमा वेगळा आहे. याची प्रचीती प्रेक्षकांना टीझरवरून आलीच असेल. यातील प्रत्येक नटाने आपली भूमिका उत्तमरित्या साकार केली असून प्रेक्षकांना आम्ही एक वेगळा अनुभव देणार आहोत. १६ एप्रिल रोजी हा सिनेमा थिएटरमध्ये रिलीज केला जाणार आहे असेही विशालने सांगितले.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER