कौन बनेगा सीएम?

who will be cm?

badge‘मी पुन्हा येईन’ असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेच्या शेवटच्या अधिवेशनात सांगितले असले तरी पुढचा मुख्यमंत्री होण्यासाठी युतीत स्पर्धा लागली आहे, हे उघड दिसत आहे. ‘मुख्यमंत्री कुणाचा? ते आमचं ठरलंय’ असे मुख्यमंत्र्यांपासून शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापर्यंत सारे नेते सांगत असले तरी काहीही ठरलेलं नाही, हेच वास्तव आहे. ज्याचे जास्त आमदार निवडून येतील त्याचा मुख्यमंत्री हे अलिखित सूत्र आहे. त्या प्रमाणेच ठरणार आहे. त्यामुळेच आपले जास्त आमदार निवडून आणण्यासाठी भाजपप्रमाणेच शिवसेनेनेदेखील कंबर कसली आहे.

तसे पाहिले तर युतीच्या नेत्यांना धडपड करायची गरज नाही. दोन महिन्यापूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत तब्बल २२० विधानसभा मतदारसंघात युतीला लीड आहे. कमी झाल्या तरी १०-२० जागा कमी होतील. पण देवेंद्र म्हणा की उद्धव, दोघेही एकेका जागेसाठी लढताना दिसत आहेत. पूर्वी नेते भाजपमध्ये जात होते. आता उद्धव आयारामांना खेचत आहेत. आज उद्धव यांनी शहापूरचे राष्ट्रवादीचे आमदार पांडुरंग बरोरा यांना शिवसेनेत घेतले. फुकट घेतले नाही. तीन महिन्याने होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत त्याला लढवणार आणि निवडून आणणार. दोन्ही पक्ष समसमान जागा लढवणार असल्याने मोठी चुरस आहे. एक जरी आमदार कमी पडला तर शिवसेनेचा मुख्यमंत्री बसणार आहे. यावेळी दोन्ही कॉंग्रेसच्या नेत्यांना निवडणुकीचे टेन्शन नाही. निकाल त्यांना आधीच कळला आहे. औपचारिकता म्हणून ते लढणार आहेत. खरे टेन्शन भाजप नेत्यांना आहे.

शिवसेनेने फार आधीपासून ‘दुष्काळी यात्रा’ सुरु केली होती. आता शुक्रवारपासून शिवसेना ‘जन आशीर्वाद’ या नावाने पूर्ण राज्य पिंजून काढायला निघत आहे. मुख्यमंत्रीही पुढच्या महिन्यात रथयात्रेवर निघत आहेत, यात्रांची ही टक्कर राजकारण नव्याने तापवणार आहे. विशेष म्हणजे सेनेच्या यात्रेचे नेतृत्व ‘युवराज’ आदित्य ठाकरे करत आहेत. सेनेचा मुख्यमंत्रीपदाचा चेहरा म्हणून उद्धव आपल्या मुलाला पुढे आणत आहेत. विरोधी पक्षातील आमदारांची फोडाफोडी त्याच हिशोबाने सुरु आहे. हे आक्रमण पाहिले तर ज्यांचा मजबूत जनाधार आहे असे अजितदादा पवार या सारखे विरोधी तंबुतले जेमतेम ५-२५ आमदार निवडून येतील. हवाच तशी आहे. विरोधी पक्ष पराभवाच्या मानसिकतेतून अजूनही बाहेर येऊ शकलेला नाही. आघाडीतील अनेक आमदार फुटायला तयार आहेत. सारेच आपले व्हायला उतावीळ असल्याने कोण आपला आणि कोण विरोधक यावरून युतीत गोंधळ उडतो आहे. भाजप हाउसफुल्ल होत आल्याने अनेकांना शिवसेनेत पाठवले जात आहे. पण युतीने आता हे इनकमिंग थांबवले पाहिजे. आमदार न फोडताही तुमची सत्ता येऊ घातली आहे. मग कशाला फोडता? त्यापेक्षा आपल्या आमदारांना अधिक बळ द्या. निष्ठावंतांना डावलले जात असल्याची भावना निवळायला त्यामुळे मदत होईल.