प्रकाश आंबेडकर कोणासोबत बसणार?

badgeडॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे नातू प्रकाश आंबेडकर जन्मात कधीही भाजपच्या सोबत जाऊ शकत नाहीत. तो त्यांचा डीएनए नाही; पण अलीकडच्या घडामोडी पाहता त्यांच्याभोवती शंकेचे मोठे धुके निर्माण होऊ पाहात आहे. प्रकाश आंबेडकर यांची वंचित बहुजन आघाडी ही भाजपची बी टीम असल्याचा आरोप नवा नाही; पण आता संघाचे लोक त्यांच्या वंचित बहुजन आघाडीत घुसल्याचा आरोप त्यांचेच ज्येष्ठ सहकारी लक्ष्मण माने यांनी केल्याने खळबळ आहे. नक्की काय सुरू आहे? कळत नकळत प्रकाश आंबेडकर भाजपच्या जवळ ढकलले जात आहेत का? असा प्रश्न आंबेडकर यांच्या चाहत्यांनाही पडत असेल. अनेक जण तसे बोलूनही दाखवत आहेत. लोकसभा निवडणूक युतीने जिंकल्याने तोंडावर आलेल्या विधानसभा निवडणुकीत आंबेडकरांशी आघाडी करायला काँग्रेस उतावीळ आहे. आंबेडकरांशी आघाडीची बोलणी करायची जबाबदारी काँग्रेसने माणिकराव ठाकरे आणि हर्षवर्धनपाटील ह्या दोघा नेत्यांवर सोपवली आहे. महाराष्ट्रात विधानसभेच्या २८८ जागा आहेत; पण यापैकी फक्त ४० जागा आघाडीला देऊ असे परवा जाहीर करून आंबेडकरांनी ब्रेक मारला आहे. लोकसभा निवडणुकीत आंबेडकरांनी काँग्रेसला झुलवत ठेवले होते. असाच आडमुठेपणा राहिला तर आताही आघाडी होणार नाही.

लोकसभा निवडणुकीत जे झाले  तेच आताही होईल . लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला एकही जागा मिळाली नाही; पण मतविभाजन होऊन काँग्रेस आघाडीच्या १० जागा पडल्या. आता ६० जागा पडतील. समविचारी मित्रपक्षांचे एवढे नुकसान आंबेडकरांना कसे परवडते? आंबेडकरांच्या भूमिकेवर विधानसभेतील विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनीही नागपुरात शंका बोलून दाखवली. लोकसभा निवडणुकीत वंचित आघाडीला ६ टक्के मते मिळाली तर काँग्रेस आघाडीला १५ टक्के मते मिळाली. असे असताना आंबेडकर वेगळी भूमिका का घेत आहेत? त्यांना लढायचे आहे की पाडापाडी करायची आहे? असा प्रश्न काँग्रेसवाल्यांना पडणे साहजिक आहे.

प्रकाश आंबेडकरांचे कुणाशी फार सख्य टिकत नाही असे अनेक जण बोलून दाखवतात. मागे बी. जी. कोळसे पाटील विरोधात गेले होते. आता लक्ष्मण माने यांनी बंड पुकारले आहे. आंबेडकर संघाच्या विरोधात बोलत असतात. आता त्यांच्याच आघाडीत संघाचे लोक घुसल्याचा आरोप माने यांनी केला आहे. वंचित बहुजन आघाडी उभी करून आंबेडकर यांनी मोठा प्रयोग केला. हा प्रयोग यशस्वी करायचा असेल तर आंबेडकरांनी संशयाचे वातावरण निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. त्यासाठी त्यांना अधिक पारदर्शी व्हावे लागेल. त्यांना कुणी वादग्रस्त बनवत असेल तर त्यात समाजाचे आणि वंचितांचेच नुकसान आहे.