कोण आहेत चहलच्या आधी सामनावीर ठरलेले बदली खेळाडू?

Who were substitute man of the match in international cricket

भारताने (India) पहिल्या टी२० सामन्यात (T20 cricket) यजमान ऑस्ट्रेलियावर (Australia) ११ धावांनी विजय मिळवला आणि या विजयात बदली खेळाडू असूनही सामनावीर ठरताना युझवेंद्र चहलने (Yuzvendra Chahal) एका नव्या विक्रमाची नोंद केली. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये चहलच्या आधीसुध्दा काही खेळाडू ‘बदली’ खेळाडू असूनही सामनावीर ठरले होते पण यावेळचे वेगळेपण असे की युझवेंद्र चहल हा सामनावीर ठरलेला पहिला कॉनक्युजन सबस्टीट्युट (Concussion Substitute) आहे.

काय आहे कॉन्क्युजन सबस्टिट्यूट?

आॕस्ट्रेलियात फिलीप ह्युजेसच्या (Philip Hughes) निधनानंतर आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद (आयसीसी ICC) ने आॕगस्ट 2019 पासून आंतरराष्ट्रीय सामन्यांसाठी हा नियम लागू केला. त्यानुसार सामन्यादरम्यान एखाद्या खेळाडूला डोक्याला किंवा शरीराच्या कोणत्या भागाला मार बसल्यावर त्याचा मेंदू प्रभावीत झाला, त्याला गरगरल्यासारखे, चक्रावल्यासारखे झाले तर त्याच्या जागी त्याच्याच शैलीचा खेळाडू (फलंदाजाला फलंदाज व गोलंदाजाला गोलंदाज) बदली खेळाडू म्हणून खेळू शकतो. मात्र याला त्या संघाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी प्रमाणीत करायला हवे आणि मॕच रेफरी यांनी त्याला मान्यता द्यायला हवी. बदली खेळाडू उर्वरीत सामन्यात कोणकोणत्या जबाबदाऱ्या पार पाडू शकेल हे ठरविण्याचा अधिकार मॕच रेफरीला असेल.

या नियमानुसार गुरुवारी रविंद्र जडेजाला डावातील शेवटच्या षटकात मिशेल स्टार्कचा चेंडू हेल्मेटला लागल्यानंतर सामनाधिकारी डेव्हिड बून यांनी भारताला युझवेंद्र चहलला कॉन्क्युजन सबस्टिट्यूट’ म्हणून खेळवण्यास मंजूरी दिली. चहलने आरोन फिंच व स्टिव्ह स्मिथसह तीन गडी बाद करत विजयात महत्त्वाची भूमिका पार पाडली आणि सामनावीर पुरस्कार जिंकला.

सामनावीर ठरलेले बदली खेळाडू

याप्रकारे युझवेंद्र चहल हा आंतरराष्ट्रीय सामन्यात पहिला काॕन्क्युजन सबस्टिट्यूट’ सामनावीर ठरला. मात्र तो सामनावीर ठरलेला काही पहिला बदली खेळाडू नव्हता. त्याच्याआधीसुध्दा चार बदली खेळाडू आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये सामनावीर ठरले होते. हे चारही वन डे सामन्यांमध्ये होते.

हे खेळाडू असे…
1) शेन बाँड (न्यूझीलंड) वि. भारत, 2005
2) जेम्स अँडरसन (इंग्लंड) वि. पाकिस्तान, 2005
3) जीतन पटेल (न्यूझीलंड) वि. श्रीलंका, 2006
4) मलिंगा बंदारा (श्रीलंका) वि. दक्षिण आफ्रिका, 2006

हे सर्व खेळाडू आयसीसीच्या 2005- 06 मधील ‘सुपर सब’ नियमानुसार सामनावीर ठरले होते तर आता युझवेंद्र चहल हा काॕन्क्युजन सबस्टिट्यूट’ नियमानुसार सामनावीर ठरला आहे.

जीतन पटेलचा अनोखा विक्रम

यापैकी जीतन पटेल याची विशेष नोंद आहे. 2005 मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या टी-20 सामन्यात त्याच्या जागी बदली खेळाडू (सुपर सब) खेळवण्यात आला होता. तरी तो सामनावीर ठरला होता. याप्रकारे स्वतः सुपर सब असतानाही व सुपर सब झालेला असतानाही सामनावीर ठरलेला तो एकमेव खेळाडू आहे. याचप्रकारे बांगलादेशचा शहरयार नफीस याच्याजागी सुध्दा 2006 मध्ये केनियाविरुध्द सुपर सबस्टिट्यूट’ खेळवण्यात आला होता तरी शहरयार सामनावीर ठरला होता.

काय होते सुपर सबस्टिट्यूट?

सुपर सबस्टिट्यूट’ या नियमात दोन्ही कर्णधारांना सामन्यात नाणेफेकीआधी त्यांचा सुपर सबस्टिट्यूट’ हा बारावा खेळाडू कोण असेल हे जाहीर करावे लागत होते. त्यानंतर सामन्यादरम्यान केंव्हाही ते या सुपर सबस्टिट्यूटचा प्लेईंग इलेव्हनमधील खेळाडूऐवजी उपयोग करु शकत होते.मात्र ज्या खेळाडूच्या जागी सुपर सबस्टिट्यूट’ खेळवला आहे तो खेळाडू पुन्हा सामन्यात खेळू शकत नव्हता. आंतरराष्ट्रीय सामन्यात इंग्लंडचा विक्रम सोळंकी हा पहिला सुपर सबस्टिट्यूट’ होता तर आॕस्ट्रेलियन मार्नस लाबुशेन हा पहिला काॕन्क्युजन सबस्टिट्यूट’ आहे.”

या नियमाने अष्टपैलू खेळाडूंना संघ संधी देतील असा अंदाज होता पण बहुतेक संघांनी स्पेशालिस्ट फलंदाज व गोलंदाजाला सुपर सबस्टिट्यूट’ म्हणून खेळवले. याचा सर्वाधिक फायदा नाणेफेक जिंकणाऱ्या संघाला झाला कारण नाणेफेक जिंकणाऱ्या संघाने फलंदाजी घेतली आणि प्रतिस्पर्धी संघाने फलंदाजच सुपर सब घेतला असेल किंवा नाणेफेक जिंकणाराने गोलंदाजी घेतली आणि सुपर सब गोलंदाजच असेल तर नाणेफेक गमावणाऱ्या संघाला त्याचा उपयोग होत नव्हता. यामुळे या निर्णयावर मोठ्या प्रमाणात टीका झाल्यावर आयसीसीने नऊ महिन्यातच 2006 पासून तो नियम रद्द केला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER