ज्यांच्या अभिवादनाचे ट्विट गाजले ते दीनदयाल उपाध्याय कोण होते ?

Deendayal Upadhyaya

भारतीय जनसंघाचे माजी राष्ट्रीय अध्यक्ष आणि एकात्म मानवतावादाचे प्रणेते पंडित दीनदयाल उपाध्याय यांची शुक्रवारी जयंती होती. त्या निमित्त मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांनी त्यांच्या मातोश्री निवासस्थानी सकाळीच पंडितजींच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले. उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) हे राष्ट्रनेत्यांना जयंती-पुण्यतिथीनिमित्त अभिवादन करणारे ट्विट सकाळीच करत असतात. त्या प्रमाणे पंडित दीनदयाल उपाध्याय (Deendayal Upadhyaya) यांना जयंतीनिमित्त अभिवादन करणारे ट्विट त्यांनी सकाळी ८ वाजून ४७ मिनिटांनी केले. सोशल मीडियात त्याची चर्चा सुरू झाली. दादांच्या ट्विटर हँडलवर प्रतिक्रिया सुरू झाल्या. तासाभरात दादांनी अभिवादनाचे ते ट्विट मागे घेतले. ‘भारतीय जनसंघाचे सहसंस्थापक, ज्येष्ठ नेते स्वर्गीय पंडित दीनदयाळ उपाध्याय यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या स्मृतीस विनम्र अभिवादन’ असे ते ट्विट होते.

सगळीकडे त्यावर सुरू झालेली चर्चा अर्थातच मोठ्या साहेबांच्या कानावर गेली असणार. चर्चा अशी आहे की मोठ्या साहेबांनी ते डिलिट करण्यास अजित पवारांना सांगितले. अजित पवार यांनी प्रतिक्रिया सूचक होती. ‘’हयात नसलेल्या व्यक्तींबाबत चांगले बोलणे ही आपली संस्कृती व परंपरा आहे. त्यानुसार मी हे ट्विट केले होते. परंतु समाजकारण, राजकारण करत असताना वरिष्ठांचे ऐकावे लागते. इतर गोष्टीही असतात,असे स्पष्टीकरण अजितदादांनी पुणे येथे पत्रकारांशी बोलताना दिले. अजित पवारांचे वरिष्ठ म्हणजे कोण हे सामान्य माणसालाही समजेल. वेगळे सांगण्याची वा नाव नमूद करण्याची गरज नाही.

अजित पवार सहसा व्यक्त होत नाहीत. महाविकास आघाडी सरकार आल्यापासून वादाच्या अनेक मुद्यांवर अजितदादा बोलत नाहीत. ‘आपले काम भले, आपण भले’ असे सूत्र त्यांनी स्वीकारले आहे. आज त्यांच्या ट्विटवरुन थोडी राजकीय चर्चादेखील रंगली. अजितदादा भाजपच्या जवळ जाताहेत वगैरे तारे तोडले गेले. अजितदादा वाद टाळत असताना एका अभिवादनाने वाद निर्माण झाला. आम्हाला अजितदादांना एवढेच सांगायचे आहे की पंडित दीनदयाल उपाध्याय यांना अभिवादन करण्यात काहीही गैर नाही. वरून आदेश आला म्हणून अभिवादनाचे ट्विट तुम्ही मागे घेतले; हरकत नाही पण तुम्ही एका देशभक्तालाच अभिवादन केले होते.दादा राष्ट्रवादीचे नेते आहेत आणि पंडित दीनदयाल उपाध्याय हे प्रखर राष्ट्रवादी नेते होते.

कोण होते दीनदयाल उपाध्याय?

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची राजकीय शाखा म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जनसंघाचे ते राष्ट्रीय अध्यक्ष राहिले. महाविद्यालयीन जीवनात ते बापूजी महाशब्दे यांच्यामार्फत संघाच्या संपर्कात आले. संघाचे संस्थापक डॉ.केशव बळीराम हेडगेवार यांना ते भेटले.

बिहारमधील मुगलसराय रेल्वेस्थानकात उपाध्याय मृतावस्थेत आढळले. आजही असे म्हणतात की त्यांची हत्या झाली. दीनदयालजींच्या मृत्यूचे गूढ आजही कायम आहे. डिसेंबर १९६७ मध्ये ते जनसंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले आणि दोनच महिन्यांनंतर फेब्रुवारी १९६८ मध्ये त्यांचे देहावसान झाले. अध्यक्ष होण्यापूर्वी ते जनसंघाचे १५ वर्षे राष्ट्रीय सरचिटणीस होते. ते हयात असताना १९६७ मध्ये झालेल्या सार्वत्रिक निवडणुकीत जनसंघाने देशभरात ३५ जागा जिंकल्या आणि तो तिसरा मोठा पक्ष ठरला होता. एकात्म मानवतावादाचे प्रणेते म्हणून दीनदयाल उपाध्याय यांचा सदैव उल्लेख होतो. सर्वोदय, स्वदेशी आणि ग्रामस्वराज या तिन्हींच्या संगमातून त्यांनी मानवकेंद्रीत विकासाची स्वदेशी अर्थशास्रावर आधारित एकात्म मानवतावादाची संकल्पना मांडली. जनसंघाने ती स्वीकारली. समाजवाद आणि भांडवलवादाला पर्याय म्हणून ती समोर आली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER