ऑक्सिजन टँकर अडवल्यास केंद्रात कोणाशी संपर्क साधायचा? केजरीवाल यांचा पंतप्रधानांना सवाल

Arvind Kejriwal - PM Narendra Modi

नवी दिल्ली :- देशासह अनेक राज्यांत ऑक्सिजनचा (Oxygen) तुटवडा जाणवत आहे. ऑक्सिजनचा तुटवडा जाणवत असता पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी देशातील १० राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत आज बैठक घेतली. या बैठकीत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) हेसुद्धा सहभागी होते. ही बैठक व्हर्च्युअल पद्धतीने आयोजित करण्यात आली. यावेळी केजरीवाल यांनी मोदींशी दिल्लीच्या रुग्णालयांतील ऑक्सिजनच्या तुटवड्यासोबतच आरोग्याच्या सोई-सुविधांवर चर्चा केली. केजरीवाल यांनी केंद्रासमोर दिल्लीच्या सद्य:स्थितीची माहिती दिली.

“मुख्यमंत्री असतानाही दिल्लीसाठी काहीही करू शकत नाही आहे. दिल्लीत ऑक्सिजन उत्पादन संयंत्र नाहीत. त्यामुळे आम्हाला ऑक्सिजन मिळणार नाही का? दिल्लीत येणारे ऑक्सिजन टँकर इतर राज्यांत रोखले जात असतील तर मी केंद्र सरकारमध्ये कुणाशी बोलू?” असा प्रश्न मुख्यमंत्री केजरीवाल यांनी पंतप्रधानांना विचारला.

या बैठकीत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray), उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, कर्नाटकचे मुख्यमंत्री बी. एस येडीयुरप्पा, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन, छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल, राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपाणी, तामिळनाडूचे मुख्यमंत्री पलानीस्वामी हेदेखील उपस्थित झाले होते.

पंतप्रधानांकडे ऑक्सिजन पुरवठा वाढवण्याबद्दलही केजरीवाल यांनी काही सूचना केल्या. आपल्याला एक ‘राष्ट्रीय योजना’ आखणे आवश्यक आहे. देशातील सर्व ऑक्सिजन प्लांट्सची जबाबदारी सेनेच्या ताब्यात द्यावी, अशी मागणी अरविंद केजरीवाल यांनी केली. “प्रत्येक टँकरसोबत लष्कराचा एस्कॉर्ट व्हेईकल असेल, तर तो टँकर कोणीही थांबवणार नाही. शक्य असेल तर तातडीने हवाई मार्गाने उपलब्ध करून द्या, अथवा तुमच्या योजनेनुसार, ‘ऑक्सिजन एक्सप्रेस’च्या साहाय्याने दिल्लीला ऑक्सिजन पुरवा.” असे केजरीवाल पंतप्रधानांना म्हणाले.

“लसीचे दर केंद्र सरकारसाठी वेगळे आणि राज्य सरकारसाठी वेगळे, असे का? लस बनवणाऱ्या कंपनीने केंद्र सरकारला लस १५० रुपयांत, तर राज्य सरकारला ४०० रुपयांत देणार असल्याचे सांगितले. एकाच देशात लसीसारख्या गोष्टीची किंमत वेगवेगळी कशी असू शकते? संपूर्ण देशाला एकाच किमतीत लस उपलब्ध व्हायला हवी.” असेही केजरीवाल यांनी म्हटले आहे.

ही बातमी पण वाचा : दिल्लीत सर गंगाराम रुग्णालयात ऑक्सिजन अभावी २५ रुग्ण दगावले

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button