मास्क न घालणाऱ्या नेत्यांचे प्रबोधन कोणी करावे? किशोरी पेडणेकरांचा मनसेला टोला; भाजपवरही निशाणा

kishori Pednekar - Raj Thackeray - Maharastra Today

मुंबई : राज्यात कोरोनाचा (Corona) पुन्हा एकदा विस्फोट झाला आहे. मुंबईतील कोरोनाची आकडेवारी चिंता वाढवणारी आहे. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर महापौर किशोरी पेडणेकर यांनी आज पत्रकार परिषद घेतली. या बैठकीत शहरात कडक निर्बंध लागू करण्यात येणार असल्याची माहिती दिली. नागरिकांकडून केल्या जाणाऱ्या निष्काळजीपणावरही त्यांनी नाराजी व्यक्त केली. यावेळी राजकीय कार्यकर्ते आणि नेतेदेखील मास्क वापरण्याच्या नियमांकडे गांभीर्याने घेत नसल्याच्या मुद्द्यावरून पेडणेकरांनी मनसेवर (MNS) निशाणा साधला.

“कोरोनाला टाळण्यासाठी मास्क वापरणे ही तर प्राथमिक गरज आहे. शहरात सार्वजनिक ठिकाणी वावरताना मास्क वापरणे बंधनकारक आहे. अनेक ठिकाणी याकडे गांभीर्याने पाहिले जात नसल्याचे दिसून येत आहे. अशा लोकांवर १०० टक्के कारवाई केली जाईल.” असे किशोरी पेडणेकर (Kishori Pednekar) म्हणाल्या.

मनसेला टोला
मनसेच्या नेत्यांकडून मास्क वापरणे टाळले जात आहे. यावर किशोरी पेडणेकर यांनी मनसेवर टीका केली. “राजकीय नेते जनतेचे प्रबोधन करत असतात; पण या जीवघेण्या रोगाबाबत आता नेत्यांचे प्रबोधन कोणी करावे हा प्रश्न निर्माण झाला आहे. ज्या जनतेच्या मतांच्या आधारावर आपण निवडून येतो, त्यांच्या सुरक्षेची काळजी घेणे, हे प्रत्येक राजकीय पक्षाचे आणि कार्यकर्त्याचे काम आहे. कोरोनाच्या मुद्द्यावरून स्वत:च्या फायद्याचे राजकारण करणे चुकीचे आहे.” असे किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

भाजपवरही निशाणा
मुंबईतील धार्मिक स्थळ पुन्हा एकदा बंद करण्याचा विचार महापालिका करत आहे. मात्र, भाजप नेत्यांकडून विरोध केला जात आहे. याबाबत किशोरी पेडणेकर यांनी निर्बंध झुगारणाऱ्यांनी राजकारण करण्यापेक्षा जनतेच्या आरोग्याच्या काळजीचा विचार करावा, अशी टीका केली आहे. “मुख्यमंत्री राज्याची एका कुटुंबाप्रमाणे काळजी घेत आहेत. लॉकडाऊन कोणालाच नकोय. पण वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता, कठोर निर्णय घेणे गरजेचे होऊन बसले आहे. भाजपने रस्त्यावर उतरून काम करावे, मग त्यांना लक्षात येईल.” असे रोखठोक मत पेडणेकर यांनी व्यक्त केले.

कोरोना आकडेवारी चिंताजनक
मुंबईत काल आठ हजारांहून अधिक रुग्ण आढळले. दिवसेंदिवस शहरात वाढत्या रुग्णसंख्येबाबतही पेडणेकर यांनी चिंता व्यक्त केली. “सध्याची आकडेवारी पाहता येत्या दिवसांत रुग्ण मोठ्या प्रमाणावर वाढू शकतात. यामुळे शहरात बेड्सची संख्या अपुरी पडू शकते. या गोष्टींबाबत महापालिका गांभीर्याने विचार करत आहे. काही लोक अजूनही निष्काळजीपणे वागत आहेत. त्यामुळे कठोर निर्बंध लादणे गरजेचे आहे.” असे पेडणेकर म्हणाल्या.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button