कौतुक कोणाचे करायचे तेजस्वीचे, चिरागचे की पंतप्रधान मोदींचे?

Modi & Paswan & Tejaswi

बिहारच्या विधानसभा निवडणुकीतील स्टार होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi), मुख्यमंत्री नितीशकुमार, राजदचे नेते तेजस्वी यादव (Tejaswi Yadav), लोक जनशक्ती पार्टीचे नेते चिराग पासवान (Chirag Paswan), विकासशील इन्सान पार्टीचे अध्यक्ष मुकेश सहानी,  हिंदुस्तानी अवाम मोर्चाचे अध्यक्ष (हम) जितराम मांझी. या प्रत्यक्ष निकालाकडे पाहता आणखी एक चेहरा प्रामुख्याने समोर आला तो म्हणजे एमआयएमचे अध्यक्ष असदुद्दिन ओवेसी यांचा. कारण, कोणलाही अपेक्षा नसताना या पक्षाने पाच जागा जिंकल्या. या शिवाय माकप, भाकपने प्रत्येकी दोन तर कम्युनिस्ट पार्टीने (मार्कसिस्ट-लेनिनिस्ट) तब्बल १२ जागा जिंकल्या. नक्षलवाद्यांना जवळचा वाटणारा एक पक्ष १२ जागा घेतो यावरून बिहारमध्ये कम्युनिस्टांचं वाढत प्रस्थ लक्षात येते.

आता प्रश्न आहे की निकाल हाती आल्यानंतर पहिल्यांदा कौतुक कोणाचं करायचं? कोणत्याही परिस्थितीत तेजस्वी यादव यांचा राजदच जिंकणार असे देशभरातील मीडिया समजत होता. देशभरातील सर्व न्यूज चॅनेल्स, सर्वेक्षण संस्थांच्या सर्वेक्षणात हेच चित्र एक्झिट पोलमध्ये दाखविण्यात आलं होतं. तेजस्वीच भावी मुख्यमंत्री असल्याचं चित्र रंगविण्यात आलं होतं. नितीशकुमार यांचा करिष्मा संपला, लॉकडाऊनमुळे त्रस्त झालेल्या बिहारी मजूर, गोरगरिबांनी भाजप-नितीश यांना नाकारलं असे दावे छातीठोकपणे केले जात होते. हे सगळे एक्झिट पोलचे आकडे पुरते फसले. त्यावर निकालानंतर सोशल मीडियात एक चांगलीच खोचक प्रतिक्रिया आली ती अशी होती – ‘च्यायला हे मीडियावाले सर्व्हे करण्यासाठी पब्लिकमध्ये गेले होते की नाही? की त्यांनी इथेही वर्क फ्रॉम होम केलं?’… मीडियाला जनसामान्यांची नाडी ओळखता येत नाही याचं उदाहरण या सर्वेक्षणांच्या निमित्तानं समोर आलं.

आजकाल सोशल मीडियात, मीडियामध्ये मोदींवर जहरी टीका म्हणजे काहीतरी भीम पराक्रम असे मानणारे काही कंपू सक्रिय आहेत. या कंपूंनी तर मतमोजणी आधीच निकाल लावून टाकला होता पण घडलं उलटं. त्यामुळे टीका करणारे हे लोक मंगळवारी दुपारनंतर गायब झाले. शेवटी मध्यरात्री निकाल लागला आणि तेजस्वीला विरोधी बाकावरच बसावे लागणार हे स्पष्ट झाल्याने बिच्चाऱ्यांची घोर निराशा झाली. पण काहीतरी तर व्यक्त व्हायला हवे नां म्हणून मग ते नितीश-भाजप सत्तेकडे पण जिंकला तेजस्वीच असे कौतुक करत सुटले. अरे बाबांनो! लोकशाहीत नंबर गेम सर्वात महत्त्वाचा असतो. जो जिता वही सिकंदर. आकड्यांचा खेळ नितीश-भाजप यांनी जिंकला. बिहारच्या जनतेनं त्यांच्या पारड्यात सत्ता आणि तुमच्या पारड्यात विरोधी बाकावर बसण्याचा आदेश दिला हे वास्तव स्वीकारा.

अगदी काही वर्षांपूर्वी दिल्ली कॅपिटल्सकडून आयपीएल क्रिकेटचे सामने खेळणारा तेजस्वी बिहारमध्ये वर्ष दीड वर्षांपूर्वी सक्रिय झाला. वडिलांनी यादव-मुस्लिम समीकरणाच्या आधारे वाढविलेल्या पक्षाची सूत्रं त्याने हाती घेतली आणि अशक्य अशा आश्वासनांचा पेटारा मतदारांसमोर ठेवत मते मागितली. बेरोजगारांच्या झुंडीच्या झुंडी असलेल्या बिहारमध्ये १० लाख नोकऱ्यांचं आश्वासन तेजस्वीच्या पथ्यावर पडलं. या आश्वासनाने काही मते त्यांच्या पारड्यात नक्कीच पडली असतील पण मोठा वर्ग असा होता की ज्याने या आश्वासनावर विश्वास ठेवला नाही.  लालूप्रसाद यादव यांचे जंगलराज आठवा, हे लोक तुम्हाला १० लाख नोकऱ्या देणार नाहीत तर १० लाख लोकांच्या हाती बंदुका देऊन हिंसा वाढवतील असा हल्ला विरोधकांनी केला.

१५ वर्षांची नितीशकुमार यांच्याबाबतची अँटीइन्कम्बन्सी कामाला आली. पण रणनीतीच्या पातळीवर तेजस्वी हे अपरिपक्व असल्याचेच सिद्ध झाले. काँग्रेसने ७० जागा मागितल्या आणि त्यांनी दबावाला झुकून त्या दिल्या, तिथेच घात झाला. काँग्रेसला केवळ १९ जागा जिंकता आल्या. तिथे तेजस्वी यांची एक बाजू लंगडी झाली. जितराम मांझी यांचा हम पक्ष महागठबंधनमधून बाहेर पडला आणि एनडीएसोबत गेला. या पक्षाने चार जागा जिंकल्या. तेजस्वी यांनी त्यांना रोखले असते तर आज त्यांची सत्ता राहिली असती. विकासशील इन्सान पार्टीचे अध्यक्ष मुकेश सहानी यांनी ऐन महागठबंधन जाहीर होणार होते त्या पत्र परिषदेतून बाहेर पडत महागठबंधनशी नाते तोडले आणि ते एनडीएसोबत गेले.

तेजस्वी यांना स्वत:च्या भरवश्यावर आपण जिंकू हा अतिआत्मविश्वास नडला. ते तरुण आहेत, तडफदार आहेत, त्यांच्या सभांना प्रचंड गर्दीही होत होती पण निवडणुका जिंकण्यासाठी एवढेच पुरेसे नसते. रणनीती महत्त्वाची असते आणि त्या बाबत ते नितीशकुमार आणि भाजपपेक्षा कमी पडले. आपल्या वडिलांच्या १५ वर्षांच्या काळात काही चुका झाल्या, त्या बद्दल आपण माफी मागतो असे जाहीर पापक्षालन तेजस्वी यांनी केले पण त्याचाही फायदा झाला नाही, कारण लोक विश्वास ठेवायला तयार नव्हते.

काश्मीरमधील ३७० कलम हटविणे, अयोध्येत राममंदिराची उभारणी, केंद्र सरकारच्या विविध योजनांमधून गरिबांच्या बँक खात्यात आलेला पैसा, चीनला भारताने दिलेले चोख प्रत्युत्तर, पाकिस्तानात केलेला सर्जिकल स्ट्राईक यामुळे नरेंद्र मोदींची जनमानसातील लोकप्रियता किती प्रचंड आहे हे निकालावरून दिसले. तेजस्वीने निर्माण केलेली हवा काढून घेत एनडीएला सत्तेप्रत नेण्याचे काम मोदींच्या करिष्म्यानेच शक्य झाले. अँटिइन्कम्बन्सीचा फटका एनडीएला बसू न देण्याचे श्रेय त्यांना आहेच.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER