रशियाच्या राष्ट्राध्यक्ष्याशी पंगा घेणारा टेलीग्रामचा मालक आहे तरी कोण?

Who owns the telegram

व्हाट्सअपनं प्रायव्हसी सेटींगमध्ये बदल करण्याचा निर्णय घेतल्यानंतर टेलिग्राम चर्चेत आलंय. आपला डेटा सुरक्षित रहावा अशी त्यांची भावना आहे. यासाठी टेलिग्राम अत्यंत उपयोगी आणि सामान्यांचं माध्यम आहे. व्हाट्सअपला टक्कर देणारं अप्लिकेशन ज्याने बनवलंय तो जगातल्या सर्वात ताकदवान माणसाला खूप आधीपासून टशन देतोय. ब्लादिमीर पुतिन हे जगातलं शक्तीशाली नाव. आणि पुतीन यांच्याशी पंगा घेतलाय तो टेलिग्रामचा मालक म्हणजेच पावेल दुरोव. या दोघांच्या दुश्मनीचे किस्से जगप्रसिद्ध आहेत.

पावेल दुरोव याचा जन्म १९८४ ला सोवियत रशियातल्या लेनिनग्राड शहरात झाला. आता लेनिनग्राड शहराचं नाव बदलून सेंट पिटर्सबर्ग झालंय. दुरोव यांचा जन्म लेनिनग्राड मध्ये झाला पण लहानपण इटलीत गेलं. असं म्हणतात की, शाळेत असतांना त्यांने शाळेतले कॉम्प्युटर हॅक केले होते.

इटलीहून पुन्हा मायदेशी रशियात परत आल्यानंतर दुरोव यांनी सेंट पिटर्सबर्ग युनिवर्सिटीत प्रवेश घेतला. पण त्यांचा विषय होता भाषा विज्ञान. 2006 मध्ये हे ग्रॅज्युएशन पूर्ण केलं. पण असं म्हणतात की त्याचं डिग्री सर्टिफिकेट त्यांनी आजपर्यंत कॉलेजमधून घेतलेलं नाही.

युनिवर्सिटीतून बाहेर पडल्यानंतर पावेल दुरोवने सोशल मिडिया नेटवर्क व्ही-कॉन्टॅक्टे म्हणजेच व्हीके सुरू केलं. सुरुवातीला व्हीके फेसबुकचं रशियन वर्जन असल्यासारखं वाटायचं. म्हणून दुरोवला रशियाचा मार्क झुकरबर्ग म्हटलं जातं. नंतर त्यांनी टेलीग्राम हे मेसेंजर अॅप सुरू केलं. याच काळात मार्क झुकरबर्गने व्हाट्सअॅप विकत घेतलं होतं. व्हीके खूप कमी काळात लोकप्रीय झालं आणि दुरोव प्रचंड प्रसिद्धी व पैसा मिळाला. या प्रक्रियेत त्यांनी रशियाचे राष्ट्राध्यक्ष पुतीन यांच्याशी पंगा घेतला.

विषय असा झाला की, पुतीन यांनी 2011 मध्ये संविधानात बदल करून तिसर्‍यांदा स्वतःला राष्ट्रपती पदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं होतं. या विरोधात खूप मोठी आंदोलनं होऊ लागली होती. या आंदोलनात जनजागृतीसाठी आणि एकत्र येण्यासाठी व्हीके या सोशल मिडीया नेटवर्कचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. रशियन प्रशासनाने पुतीन यांच्या सर्व विरोधकांना व्हीके वर बंदी घालावी असं सांगितलं. पण दुरोवच्या स्वभावात बंडखोरी होती. ट्विटर आणि व्हीके वर दुरेवनी दोन फोटो टाकले. एका फोटोत जीभ दाखवणारा कुत्रा होता आणि दुसर्‍या फोटोत स्वतः दुरोव मधलं बोट दाखवत होते. यामुळं पुतीन चिडले होते. त्यानंतर पुतीन यांनी चांगलाच बदला घेतला. पुतीन यांच्या सहकार्‍यांनी मोठ्या प्रमाणात व्हीके सोशल मिडीया नेटवर्क मधील शेअर्स विकत घेतले. त्यानंतर मात्र पावेल दुरोवला रशिया सोडावं लागलं.

ज्यावेळी पुतीन आणि दूरोवचं वाजलं होतं त्यावेळी SWAT ची टिम दुरोवच्या दरवाजापर्यंत येऊन पोहोचली होती. तेव्हा आपल्या भावाला मेसेज करताना दुरेवला जाणवलं की, आपल्याकडे सुरक्षित संदेशवहन म्हणजे Secured Messeging करण्यासाठी कोणतच मेसेंजर नाही. आणि याचं विचारातून जन्माला आलं टेलिग्राम मेसेंजर. आज जगात मोठ्या प्रमाणात टेलिग्राम मेसेंजर वापरलं जातं आणि ते इतर मेसेंजरपेक्षा खूप सुरक्षित असल्याचंही म्हटलं जातं.

पण हे सुरक्षित असल्याचे काही तोटेही आहेत. काही दहशतवादी संघटना या टेलिग्रामचा वापर करतात असं म्हटलं जातं. यावरून पुतीन यांनी मुद्दा उचलला होता. टेलिग्रामचा अॅक्सेस बंद करण्याचा प्रयत्नही रशिया सरकारकडून करण्यात आला होता, पण स्वतः रशियातले मोठमोठे लष्करी अधिकारीही टेलिग्राम वापरतात ही यातली खरी गोम.

टेलिग्रामचा लोगो कागदी विमान आहे. 2012 मध्ये व्हीकेच्या सेंट पिटर्सबर्गच्या मुख्यालयाच्या खिडकीतून चाहत्यांसाठी पैसे खाली फेकले होते. नोटांचं विमान करून हे पैसे फेकण्यात आले होते. यातूनच प्रेरित कागदी विमान हा टेलिग्रामचा लोगो आहे. पुतीन यांना कपडे काढून फोटो काढायला आवडतात. त्याची खिल्ली उडवायला दुरोव पण तसे फोटो काढून सोशल मिडियावर टाकत असतात. दोघांमधील खुन्नस अजूनही तशीच आहे. पुतीन जरी राष्ट्राध्यक्ष असले तरीही पावेल दुरेवदेखील पंगा घ्यायला मागं पुढं पाहत नाहीत.

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER