दिल्लीच्या दंगली कोण पेटवत आहे?

Amit Shah-Sonia Gandhi

badgeरोम जळत असताना राजा निरो फिडल वाजवत बसला होता असे म्हणतात. दिल्ली तब्बल तीन दिवस जळत असताना आपले सत्ताधारी असेच काही करीत होते का? दिल्लीच्या दंगलींमध्ये २० लोक मारले गेले. यात दोन्ही धर्मांचे लोक आहेत. आज दंगल बरीचशी काबूत आल्यानंतर राजकीय घमासान सुरू झाले आहे. सुदैवाने ईशान्य दिल्लीतल्या काही भागांपुरतीच ही दंगल मर्यादित राहिली. पसरली असती तर काय भयंकर झाले असते याची कल्पनाच करवत नाही; पण असे काही झाले तर त्याला तोंड द्यायला दिल्ली पोलीस सक्षम आहेत का? असे मोठे प्रश्नचिन्ह ह्यानिमित्ताने उभे झाले आहे.

गेल्या तीन महिन्यापासून देशाची राजधानी असलेले हे शहर अशांत आहे. नागरिकत्व सुधारणा कायद्याच्या विरोधात जामिया मिलिया, जेएनयू आणि शाहिनबाग परिसर धुमसतो आहे. तो शांत व्हावा असे सत्ताधारी किंवा विरोधी बाकांवरील कोणालाच का वाटू नये? ‘रविवारपासून अमित शहा कुठे होते?’ असा सवाल करताना सोनिया गांधी यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. पण त्या कुठे होत्या? त्यांच्या काँग्रेसचे नेते कुठे होते? असा प्रश्न त्यांनाही विचारला जाऊ शकतो. फाळणीनंतर दंगली उसळल्या तेव्हा महात्मा गांधी स्वतःहून दंगलग्रस्त भागात फिरले. आज शाहिनबागमध्ये कोणी नेता का जाण्याची हिंमत करीत नाही? १९८४ मध्ये राजीव गांधी यांची हत्या झाल्यानंतर दिल्लीत शिखांच्या विरोधात दंगली भडकल्या होत्या. त्या काँग्रेसने भडकावल्या असा आरोप होतो. मग आजच्या दंगली कोण भडकवतंय? देशाचे गृहमंत्री म्हणून अमित शहा यांच्याकडे काय उत्तर आहे?

पवार, मोदी, सोनिया यांना सांभाळताना उद्धव यांची कसरत

ज्या भागात हिंसक घटनांना ऊत आला तो भाग मुस्लिमबहुल आहे. रविवारी तिथले आंदोलन समाजकंटकांच्या हाती गेले. कपिल मिश्रा नावाच्या भाजपच्या एक नेत्याने केलेल्या चिथावणीखोर भाषणाने आगीत तेल ओतले. दोन्ही बाजूचे समाजकंटक रस्त्यावर उतरले असताना पोलीस बघ्याची भूमिका घेत होते हे कोडे आहे. अशा दंगलींमध्ये कसे वागावे याचे प्रशिक्षण दिल्ली पोलिसांना नाही का? असा प्रश्न सामान्य माणसाला पडतो. नेमका काय प्रकार आहे? तोंडावर आलेल्या बिहार, बंगाल, उत्तर प्रदेशच्या निवडणुकांवर डोळा ठेवून तर दंगलीचे राजकारण खेळले जात नाही ना?


Web Title : Who is burning the riots in Delhi?

(Maharashtra Today : Online Marathi News Portal)