साबातिनीसाठी खेळायला अवघड खेळाडू कोण होती?

Sabatini

दमदार खेळासोबतच आपल्या सौंदर्याने एकेकाळी स्टेफी ग्राफ हिच्यापेक्षाही अधिक चाहते असणारी अर्जेंटिनी टेनिसपटू गॅब्रिएला साबातिनी हिने स्टेफीचा कधीच हेवा किंवा द्वेष केला नाही असे म्हटले आहे. या दोन्ही एकाच काळातील खेळाडू आणि त्यांच्यात यशासाठी स्पर्धासुद्धा तेवढीच तगडी होती; पण स्टेफीने साबातिनीपेक्षा मैदानावर कितीतरी अधिक यश मिळवले.

ही बातमी पण वाचा:- महेंद्रसिंग धोनीचे ‘नंबर 7 कनेक्शन’ काय ? त्याचे कारण जाणून घेतल्यास तुम्हाला आश्चर्य वाटेल

त्यामुळे त्या काळातील त्यांच्या स्पर्धेने या दोन्हीतील संबंध फारसे सलोख्याचे नसल्याच्या चर्चा होत्या. त्यांना पूर्णविराम देताना साबातिनीने म्हटलेय की, ‘आपण कधीच तिचा द्वेष केला नाही आणि ती एक शानदार व्यक्ती आहे.’ काही वर्षांपूर्वी साबातिनीचा टेनिसच्या इंटरनॅशनल हॉल ऑफ फेममध्ये समावेश करण्यात आला.  त्यावेळी स्टेफीनेच तिच्यावर गौरवपर भाषण दिले होते. या दोघींनी एकत्र खेळताना १९८८ मध्ये विम्बल्डनच्या महिला दुहेरीचेही विजेतेपद पटकावले होते.

स्टेफीबाबत बोलताना साबातिनी म्हणते की, ‘आमच्यातील स्पर्धा ही केवळ मैदानापुरती होती आणि माझ्यातील सर्वोत्तम खेळ हा तिच्याशी असलेल्या कडव्या स्पर्धेमुळेच झाला. तिच्यासारखी तगडी प्रतिस्पर्धी लाभली हे मी माझे भाग्यच समजते. मैदानाच्या बाहेर स्टेफी ही मनमोकळी नाही आणि भिडस्त स्वभावाची आहे.आम्ही खेळायचे थांबविल्यावर कालांतराने आम्ही आणखी चांगल्या मैत्रिणी बनलो.

मी तिची नेहमीच प्रशंसक राहिले आहे आणि केवळ स्टेफीच नाही तर आपल्या काळातील सर्वच प्रतिस्पर्धी खेळाडूंशी आपले संबंध चांगले राहिले.’ आपण खेळ आणि स्पर्धा मैदानापुरतीच मर्यादित ठेवली, त्याबाहेर सर्वांशीच चांगले संबंध राखले. अरांता सांचेझ व्हिकारियो ही माझ्या मते खेळायला सर्वांत अवघड खेळाडू होती; कारण तिची मनोवृत्तीच लढण्याची होती आणि शेवटच्या गुणापर्यंत ती लढायची. बऱ्याच सामन्यांमध्ये तिने याच मनोवृत्तीतून मुसंडी मारली आणि शेवटच्या चेंडूपर्यंत लढणे कधीच सोडले नाही.

त्यामुळे तिच्याविरुद्ध खेळणे फारच अवघड होते. मोनिका सेलेसविरुद्धसुद्धा खेळणे माझ्यासाठी सोपे नव्हते. मात्र हे मैदानावरच. मैदानाबाहेर माझे संबंध सर्वांशी चांगलेच राहिले, असे तिने स्पष्ट केले. मार्टिना नवरातिलोव्हासारख्या दिग्गज खेळाडूंबद्दल ती सांगते की, या दिग्गज खेळाडूची मला फार मदत झाली. तिने नेहमीच मला खेळाबद्दल मार्गदर्शन केले आणि  प्रोत्साहन दिले. मार्टिनाने मला काही सांगावे हेच माझ्यासाठी अतिशय महत्त्वाचे होते.

यामुळे मला नेहमीच तिचा आदर व प्रेम आहे. आम्ही जेव्हा शेवटचा सामना एकमेकांविरुद्ध खेळलो तेव्हा माझ्या भावना संमिश्र होत्या; कारण एकतर मी तिला हरवू इच्छित नव्हते आणि दुसरीकडे आपला चांगला खेळ दाखवायची हीच संधी आहे, असेही मला वाटत होते. मी नेहमीच मार्टिनाची आभारी राहीन, असे तिने म्हटले आहे.


बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER