काँग्रेसमधील जी-२३ बंडखोरांचा पक्षनेतृत्वाला इशारा

Who is the warning of G-23 leaders in Congress

जम्मू : काँग्रेसच्या नेतृत्वावरून घराणेशाहीवर तडाखेबंद पत्र लिहिणाऱ्या काँग्रेसच्या जी -२३ नेत्यांनी आज जम्मूत येऊन पक्षाच्या नेतृत्वाला सुनावले. काँग्रेस कमजोर होत चालली आहे, तुम्ही काय करत आहात, असा प्रश्न करत ग्रुप २३ च्या नेत्यांनी काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर अप्रत्यक्ष टीका केली. पक्षाचे नेतृत्व  काँग्रेसला उभारी देण्यासाठी काही करत नाही, अशी टीका या नेत्यांनी पत्र लिहून केली होती. त्यानंतरही काहीच न झाल्याचा उद्वेग आणि संताप या नेत्यांच्या भाषणातून दिसला. त्यांनी आधी गांधी परिवारावर राग काढला.

गुलाम नबी आझाद, आनंद शर्मा, कपिल सिब्बल, राज बब्बर यांनी भाषणांमधून काँग्रेस नेतृत्वाला आता तरी काही करा, असा कठोर संदेश दिला. गुलाम नबी आझाद म्हणाले,  मी राज्यसभेतून रिटायर झालो, राजकारणातून नाही. जम्मू – काश्मीरच्या जनतेसाठी आतापर्यंत संसदेत आवाज उठवला, आता रस्त्यावर येऊन आवाज उठवेन. ३७० हटविल्यानंतर राज्याचा गमावलेला दर्जा मिळविण्यासाठी संघर्ष करेन. गुलाम नबी यांच्या राजकारणातून रिटायर झालो नाही, या विधानाचा नेमका अर्थ काय, यावर सोशल मीडियात चर्चा सुरू झाली आहे. हा इशारा कोणाला, यावर तर्क सुरू आहेत. काँग्रेसचे नेतृत्व अजूनही जी – २३ नेत्यांचे ऐकत नाही का? वगैरे चर्चा सुरू आहे. गुलाम नबींना राज्यसभेतून रिटायर केल्यानंतर काँग्रेस नेतृत्वाने त्यांना कोणतेही पद दिले नाही. त्याची खंत जी – २३ च्या नेत्यांनी व्यक्त केली.

आनंद शर्मांचे भाषण सगळ्यात जोरदार झाले. ते म्हणाले की, आम्ही काँग्रेसमध्ये आहोत की नाही किंवा राहायचे की नाही, हे सांगण्याचा अधिकार मी कोणालाही दिलेला नाही. आम्ही खूप संघर्ष करून इथपर्यंत पोहचलो आहोत. खिडकीतून उडी मारून काँग्रेसमध्ये आलेलो नाहीत. कोणालाही आम्हाला सुनावण्याचा अधिकार नाही. आम्ही पक्षबांधणी करू. काँग्रेसला मजबूत करू. काँग्रेसच्या मजबुतीवर आणि ऐक्यावर आमचा विश्वास आहे. आनंद शर्मा यांनी खिडकीचा उल्लेख करून नेमका कोणाला टोमणा मारला याची चर्चा सोशल मीडियावर सुरू झाली. अनेकांनी त्यांचे हा प्रियंका गांधींकडे इशारा असल्याचा निष्कर्ष काढला. सगळ्या नेत्यांनी गांधी घराण्याची कोंडी करणारी भाषणे केली.

गुलाम नबी आझाद यांच्याबद्दल कपिल सिब्बल म्हणाले, काँग्रेस कमजोर होत चाललीय ही वस्तुस्थिती आहे. काँग्रेसला मजबूत करण्यासाठीच आम्ही इथे जमलो आहोत. आम्हाला एकत्र राहून पक्ष मजबूत करायचा आहे. त्यात गुलाम नबी आझादांची भूमिका काय? ते इंजिनीअर आहेत. बऱ्याच गोष्टी दुरुस्त करू शकतात! काँग्रेसला पूर्ण वेळ अध्यक्ष पाहिजे, असे पत्र २३ नेत्यांनी सोनिया गांधींना पत्र लिहिले होते. त्या पत्रातील भाषा थोडी कडक होती. त्यावेळी या नेत्यांना जी – २३ म्हणजे ग्रुप – २३ असे नाव पडले. आजच्या भाषणांमध्ये जी – २३ नेत्यांची भाषा त्यावेळच्या पत्रापेक्षा जास्त कडक आणि काँग्रेस नेतृत्वाला गंभीर इशारे देणारी होती, हे उल्लेखनीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER