
कसोटी क्रिकेट हे आंतरराष्ट्रीय क्रिकेटचे सर्वांत जुने स्वरूप आहे. १४० वर्षांपूर्वी कसोटी क्रिकेटचे आयोजन केले गेले होते. त्यानंतर आतापर्यंत कसोटी क्रिकेट सतत खेळला जात आहे; पण फक्त चार प्रसंग आले आहेत, जेव्हा एक कसोटी सामन्यात एखाद्याने ४०० किंवा त्याहून अधिक धावा केल्या आहेत.
आश्चर्याची बाब म्हणजे या यादीमध्ये कोणत्याही भारतीय खेळाडूचे नाव समाविष्ट नाही. कसोटी सामन्याच्या एका डावात फक्त एका फलंदाजाने ४०० धावांचा टप्पा गाठला आहे; परंतु एका कसोटी सामन्याच्या दोन्ही डावांत एकूण ४ फलंदाजांनी ४०० किंवा अधिक धावा केल्या आहेत. एका कसोटी सामन्यात फक्त एकाच फलंदाजाने ४५० धावांचा टप्पा ओलांडला आहे. इंग्लंड संघाचा माजी दिग्गज ग्राहम गूचने एका कसोटी सामन्यात ४५६ धावा फटकावून विश्वविक्रम केला होता, जो ३० वर्षांनंतरही अतूट आहे.
ग्राहम गूचने भारताविरुद्ध जुलै १९९० मध्ये लॉर्ड्सच्या मैदानावर झालेल्या कसोटी सामन्याच्या पहिल्या डावात ३३३ धावा केल्या, तर दुसऱ्या डावात त्याने १२३ धावा केल्या. अशा प्रकारे त्याने दोन्ही डावांत ४५६ धावा केल्या होत्या. यानंतर ऑस्ट्रेलियन दिग्गज फलंदाज मार्क टेलरचे नाव दुसऱ्या क्रमांकावर आहे.
पाकिस्तानविरुद्धच्या ऑक्टोबर १९९८ मध्ये पहिल्या डावात ३३४ धावा आणि दुसर्या डावात ९२ धावा मार्कने केल्या. अशा प्रकारे त्याने एका सामन्यात ४२६ धावा केल्या. एका कसोटी सामन्यात सर्वाधिक धावा करणाऱ्यांच्या यादीत श्रीलंकेचा माजी कर्णधार कुमार संगकाराचा तिसरा क्रमांक आहे.
संगकाराने फेब्रुवारी २०१४ मध्ये बांगलादेशविरुद्धच्या पहिल्या डावात ३१९ धावा, त्याच सामन्याच्या दुसर्या डावात त्याने १०५ धावा केल्या. अशा प्रकारे संगकाराने एका कसोटीत ४२४ धावा केल्या. या यादीमध्ये वेस्ट इंडीजचा फलंदाज ब्रायन लारा एकमेव खेळाडू आहे ज्याने एका कसोटी सामन्याच्या एकाच डावात ४०० धावा केल्या होत्या.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला