प्रदेश काँग्रेसचा नवा अध्यक्ष कोण?

Congress
  • दिल्लीत जबरदस्त लॉबिंग
  • सातव यांचे नाव आघाडीवर

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसच्या (Congress) अध्यक्षपदी बाळासाहेब थोरात (Balasaheb Thorat) यांच्याऐवजी नवीन चेहर्‍याचा शोध सुरू झाला आहे स्वतः बाळासाहेब थोरात दिल्लीत पोहोचले असून ते काँग्रेस नेत्यांच्या गाठीभेटी घेत आहेत. प्रदेशाध्यक्षपदासाठी राज्यसभा सदस्य राजीव सातव यांचे नाव सर्वात आघाडीवर आहे.काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधी (Sonia Gandhi) काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) आणि काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी (Priyanka Gandhi) या तिघांशीही अत्यंत जवळचे संबंध असलेले सातव यांच्या रूपाने बहुजन समाजाला प्रदेशाध्यक्षपदाची संधी दिली जाऊ शकते. स्वच्छ प्रतिमा, शांत स्वभाव आणि सर्वांना घेऊन चालण्याची भूमिका हे सातव यांचे प्लसपॉईंट आहेत. प्रदेश काँग्रेसचे अध्यक्षपद आतापर्यंत बाळासाहेब थोरात यांच्याकडे आहे आणि ते मराठा समाजाचे आहेत याशिवाय ते विधिमंडळ काँग्रेस पक्षाचे नेतेदेखील आहेत. बहुजन चेहरा म्हणून विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले (Nana Payole),पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार (Sunil Kedar) यांची नावेदेखील चर्चेत आहेत.

मात्र पटोले हे भाजपमधून कॉंग्रेसमध्ये आलेले आहेत. तसेच सुनील केदार हे नागपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेतील 153 कोटी रुपयांच्या आर्थिक घोटाळ्यातील मुख्य आरोपी आहेत. यामुळे या दोघांची नावे मागे पडून सातव यांना पसंती दिली  जाण्याची शक्यता आहे. सातव यांची काँग्रेस पक्षश्रेष्ठींशी असलेली जवळीक लक्षात घेता त्यांच्या आदेशाला प्रदेश काँग्रेसमध्ये महत्त्व असेल आणि पक्षातील गटबाजी ते खपवून घेणार नाहीत ही देखील त्यांची जमेची बाजू मानली जाते.

प्रदेश काँग्रेसचे प्रभारी के एच पाटील आणि बाळासाहेब थोरात यांचे संबंध काहीसे ताणले गेले असल्याची चर्चा आहे.थोरात हे पक्षकार्याकडे अधिक लक्ष देत नाहीत अशी पाटील यांची भावना असल्याचे म्हटले जाते. थोरात यांच्याकडे महसूल मंत्री पददेखील आहे. काँग्रेसच्या एक व्यक्ती एक पद या नियमाप्रमाणे त्यांना तसेही प्रदेशाध्यक्ष सोडावे लागेल. प्रदेशाध्यक्षपद सोडा असा आदेश त्यांना पक्षश्रेष्ठींकडून मिळाला असल्याचीदेखील चर्चा आहे पण त्याला अधिकृत दुजोरा मिळू शकला नाही.

राज्यात आगामी काळात महापालिका, जिल्हा परिषदा, नगरपालिका या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत या निवडणुकांमध्ये काँग्रेसला चांगले यश मिळावे यासाठी पूर्णवेळ प्रदेशाध्यक्ष असण्याची नितांत गरज असल्याचे पक्षातील ज्येष्ठ नेत्यांना वाटते. पूर्वी काँग्रेसचे संघटन हे पूर्णपणे स्वतंत्र होते.मात्र नंतरच्या काळात हे संघटन नेत्यांमध्ये विभागले गेले. आता पुन्हा एकदा काँग्रेस पक्षात संघटना मजबूत करण्यावर भर दिला जात असून त्यादृष्टीनेही संघटनेच्या कार्याचा चांगला अनुभव असलेले सातव यांना पसंती दिली जाऊ शकते. नाना पटोले, सुनील केदार याच्याशिवाय विजय वडेट्टीवार व यशोमती ठाकूर या मंत्र्यांच्या नावांची देखील प्रदेशाध्यक्षपदासाठी चर्चा आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER