नवीन मंत्रिमंडळाचे सेंटर ऑफ अट्रॅक्शन कोण ??

Ajit Pawar

नवीन मंत्रिमंडळाचे सेंटर ऑफ अट्रॅक्शन कोण असतील तर उत्तर आहे, उपमुख्यमंत्री अजित पवार. त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रीपद आणि वित्त मंत्रीपद असले तरी त्यांचा दबदबा एखाद्या मुख्यमंत्र्यांपेक्षा कमी नाही. शेवटी दादा हे दादा आहेत. मंत्रालयाच्या सहाव्या माळ्यावर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे बसतात. ते ज्यावेळी मंत्रालयात असतात तेव्हा त्यांच्या दालनात वा बाहेर गर्दी असते पण दादा हे एकमेव असे मंत्री आहेत की ज्यांच्या दालनात ते असले वा नसले तरी खच्चून गर्दी असते. या गर्दीत अर्थातच महाराष्ट्राष्या कानाकोपºयातून आलेले अनेक जण असतात. बारामतीतील कार्यकर्त्यांनी शनिवारी, रविवारी तिकडंच माझ्या भेटीला यायचं असा अलिखित आदेश खास स्वत:च्या शैलीत अजितदादांनी दिला असल्यानं मतदारसंघातील कार्यकर्ते मंत्रालयात तेवढी गर्दी करीत नाहीत. ती गर्दी झाली असती दादांच्या केबिनबाहेर रोजच्या रोज चेंगराचेंगरीच झाली असती.

कामांच्या प्रचंड घबडग्यातही दादा केबिनमध्ये आलेल्यांशी आपलेपणानं बोलतात. जे काम होण्यासारखं आहे ते नक्की होईल, काळजी करू नको असं ठामपणे सांगतात. जे काम नियमात बसणारं नाही, होऊ शकत नाही ते होणारच नाही आणि आता तू पुन्हा या कामासाठी यायचं नाही असंही बजावतात. दादांची ती स्वत:ची खास शैली आहे. लोकांना काय वाटेल याचा विचार करुन राजकारण त्यांनी कधी केलं नाही, कारण तो त्यांचा स्वभाव नाही. जे आपल्या मनाला पटतं, तत्वात बसतं तसं वागायचं पण हे असे तोच नेता करू शकतो जो मनाचा सच्चा असतो. दादांच्या मनात इतरांविषयी द्वेषाची भावना नाही, कुणाबद्दल असुया तर नाहीच नाही. स्वत:च्या कर्तृत्वावर विश्वास असलेला हा नेता आहे. रोखठोक बोलतो आणि वागतोही.

उपमुख्यमंत्री म्हणून दादांचा घोडा आता बेफाम सुटू पाहत आहे. एकेका दिवशी तीनचार बैठकी घेऊन ते लगेच निर्णय घेत आहेत. बैठकांना उशिरा येणाºया अधिकाºयांना त्यांनी चांगलाच दम दिला. त्यामुळे आता कोणीही अधिकारी त्यांनी बोलविलेल्या बैठकांना विलंबाने जाण्याची हिंमत करत नाही. अधिकारी जेवढे मुख्यमंत्र्यांना घाबरत नाहीत तेवढे ते अजित पवारांना घाबरतात. स्वत: एका ज्येष्ठ सनदी अधिकाºयाने ही माहिती दिली. एखादे अधिकारी मुख्यमंत्री ठाकरे यांच्यासमोर वेळकाढूपणा करू शकतात, विभागाच्या चुकांवर पांघरूण घालू शकतात. प्रशासकीय कामकाजाचा शून्य अनुभव असलेल्या ठाकरेंना असे गुंडाळून ठेवणे अधिकाºयांना जमू शकते पण अजितदादांच्या बाबतीत अशी हिंमत तर सोडाच असा विचारही कोणी अधिकारी करु शकत नाही. प्रशासकीय कामकाजाचा आणि विविध विषयांचा अजितदादांचा गाढा अभ्यास असल्याने त्यांना एखाद्या विषयाबाबत चुकीची, दिशाभूल करणारी माहिती देणे वा खोट्याचे खरे करून सांगणे हे कोणत्याही अधिकाºयाला जमू शकत नाही. हा खोटारडेपणा लगेच ओळखण्याची क्षमता दादांच्या ठायी आहे.

डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे येत्या दोन वर्षांत देखणे, दिमाखदार स्मारक : मंत्रिमंडळाचा निर्णय-अजित पवार

दादांकडे वित्त व नियोजन हे असे खाते आहे की ते कोणत्याही विषयाशी वा खात्याशी संबंधित बैठक बोलावू शकतात. तशी सुरुवातदेखील त्यांनी केली आहे. मुख्यमंत्री असल्याच्या आवेशात ते आदेश, निर्देश देत आहेत. ज्येष्ठ सनदी अधिकारी सांगतात की एखादी धोरणात्मक निर्णयाची फाईल मुख्य सचिवांकडून सही होऊन आल्याशिवाय त्यावर सही करायची नाही, असे सावध धोरण मुख्यमंत्री ठाकरे यांनी स्वीकारले आहे. कदाचित दादांना ते धोरण बोटचेपेपणाचे आणि निर्णय क्षमतेच्या अभावाचे वाटत असावे. एखाद्या विभागाचा प्रस्ताव आला की दादा तो नीटपणे वाचतात, त्यावर धोरणात्मक निर्णय घेण्याची गरज आहे की नाही ते ठरवतात आणि मग प्रस्ताव कशा पद्धतीने विभागाने सुधारुन द्यावा, त्यात कोणत्या बाबी अंतभूत करणे आवश्यक आहे या विषयी स्पष्टपणे सांगतात व त्यातून परिपूर्ण प्रस्ताव तयार होतो. मुख्यमंत्र्यांपेक्षा दादांचे हे वेगळेपण आहे.

इंदू मिल, चैत्यभूमी, कोरेगाव भीमा या ठिकाणी उपमुख्यमंत्री झाल्याझाल्याच भेट देऊन अजित पवार यांनी दलितांची मने जिंकण्याचा जोरदार प्रयत्न केला. राज्य मंत्रिमंडळाने इंदू मिलमधील भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या स्मारकातील पुतळ्याची उंची वाढविण्याचा निर्णय घेतला. त्याची माहिती अजित पवार यांनी पत्रकारांना दिली. यावरून दादा पुढील राजकीय वाटचालीत दलित समाजाला सोबत नेऊ इच्छितात असे स्पष्ट संकेत मिळतात. काँग्रेससोबत सरकारमध्ये असले तरी काँग्रेसच्या दलित व्होट बँकेवर दादांची नजर दिसते.

अजितदादा सुपरफास्ट आहेत. त्यांची ही सुपरफास्ट ट्रेन मुख्यमंत्री ठाकरे यांना मागे तर टाकणार नाही ना? दादांच्या समर्थकांना त्या बाबत विश्वास आहे. गृह, नगरविकास, सामाजिक न्यायसह महत्त्वाच्या विभागाच्या आढावा बैठकी ते आपल्या अधिकारात घेत आहेत. उपमुख्यमंत्रीपद हे राजकीय सोईचे पद आहे. अजितदादा मात्र अगदी मुख्यमंत्र्यांच्या शैलीत कामाला लागले आहेत. वाडिया रुग्णालयाबाबत मुख्यमंत्र्यांनी आढावा बैठक घेण्यापूर्वी अजितदादांनी एक बैठक घेतली होती. त्यानंतर मुख्यमंत्र्यांची बैठक झाली. आता तेथील तिढा सुटला आहे. पण, मुख्यमंत्री ठाकरे आणि उपमुख्यमंत्री पवार हे आपसात कामांचे स्पटपणे वाटत करत नाहीत तोवर कधीही असा विसंवाद समोर येऊ शकतो. अजितदादा हे मुख्यमंत्र्यांच्या अधिकारांवर अधिक्षेप करतात अशी टीका होऊ शकते. राष्ट्रवादीच्या कार्यकर्ते, नेत्यांना अजितदादाच मुख्यमंत्री वाटतात. अजितदादांनी कामांचा सपाटा असाच चालू ठेवला तर तेच मुख्यमंत्री असल्याचे सगळ्यांना वाटू शकेल.

ताजा कलम : मुंबईचे नाईटलाईफ, मुंबईचे पर्यटन हे नवे पर्यटन मंत्री आणि मुख्यमंत्र्यांचे पुत्र आदित्य ठाकरे यांचे आवडीचे विषय. ते स्वत: मुंबईतील वरळी मतदारसंघाचे आमदार आहेत. वरळी सीफेसचा परिसर सुंदर करण्याचा संकल्प आदित्य यांनी सोडला आहे. अजित पवार यांनी बुधवारच्या पत्र परिषदेत आदित्य यांच्या अखत्यारितील आणि आवडीचा विषय पळविला. वरळी सी-लिंकच्या जवळपास लंडन आयच्या धर्तीवर मुंबई आयची उभारणी केली जाईल, असे अजितदादांनी जाहीर केले. लंडनमध्ये थेम्स नदीच्या किनारी सर्वात उंच आणि मोठा पाळणा असून त्यातून सबंध लंडन बघता येते. त्याला लंडन आय असे म्हणतात. त्याच धर्तीवर वरळी सीफेसच्या ठिकाणी मुंबई आयच्या उभारणीचा निर्णय जाहीर करून अजितदादांनी आदित्य यांचा मुद्दा पळविला.