मातोश्रीच्या जवळचे ते मंत्री कोण?

Kriti Somaiya-Matoshri

या आठवड्याच्या अखेर मातोश्रीच्या अगदी नजीकच्या असलेल्या एका मंत्र्यांचा भ्रष्टाचार मी चव्हाट्यावर आणणार आहे’ असे भाजपचे नेते माजी खासदार किरिट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी जाहीर केल्याने खळबळ माजली आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत, मी कागदपत्रांसह येईन असेही त्यांनी ठासून सांगितले. विधिमंडळाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सोमवारपासून सुरू झाले. सोमय्या यांच्या विधानाची विधानभवन परिसरात चांगलीच चर्चा होती. मातोश्रीच्या अगदी जवळचे मंत्री कोण असू शकतात यावर चर्चा रंगली. त्यात एकदोन नावे प्रामुख्याने घेतली जात होती. सोमय्या हे पुराव्यांसह आरोप करण्यात वाकबगार मानले जातात. यापूर्वी त्यांनी पुराव्यानिशी काही जणांवर आरोप केले होते. त्यामुळे यावेळी त्यांचे टार्गेट कोण आहेत या विषयी उत्सुकता आहे.

भाजपच्या नेत्या, राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी त्यांचे चुलत बंधू धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याची मागणी करून खळबळ उडवून दिली. भाजपच्या प्रदेश उपाध्यक्ष चित्रा वाघ यांनी संजय राठोड यांच्या राजीनाम्याचे प्रकरण उचलून धरले होते. आज पंकजा यांनी अचानक पत्रपरिषद घेऊन धनंजय यांच्या राजीनाम्याची मागणी केली. काही दिवसांपूर्वी एका महिलेने धनंजय यांच्यावर बलात्काराचा आरोप केला होता. त्यावेळी पंकजा यांनी धनंजय यांच्या राजीनाम्याची मागणी केलेली नव्हती. मात्र, आज त्यांनी पहिल्यांदाच ही मागणी केली. धनंजय यांनी राजीनामा द्यावा ही माझी आणि माझ्या पक्षाचीही मागणी आहे असे त्या म्हणाल्या. संजय राठोड यांना राजीनामा द्यायला लावून भाजपने ताकद दाखविली. आता पंकजा यांच्या मागणीनुसार भाजप धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्या राजीनाम्याची मागणी अधिवेशनात लावून धरणार का या बाबत उत्सुकता आहे.

महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) सरकारमधील मंत्र्यांमागचे शुक्लकाष्ठ संपण्याची शक्यता दिसत नाही. संजय राठोड यांनी रविवारी राजीनामा दिला. आता सोमय्या यांनी एक नवा भ्रष्टाचार समोर आणण्याचे जाहीर केले आहे. काँग्रेसचे तरुण नेते आणि राज्यमंत्री विश्वजित कदम आता अडचणीत येताना दिसत आहेत. त्यांच्या पत्नी स्वप्नाली कदम यांची फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट अ‍ॅक्ट म्हणजे फेमा अंतर्गत ईडीने सोमवारी चौकशी केली. स्वप्नाली या राज्यातील एक बडे कंत्राटदार अविनाश भोसले यांच्या कन्या आहेत. भोसले यांच्या पुण्यातील कार्यालयावर ईडीने गेल्या महिन्यात छापेही टाकले होते. अविनाश भोसले हे एक बडे प्रस्थ आहेत. अनेक मंत्री, बडे अधिकारी यांच्याशी त्यांचे निकटचे संबंध आहेत. मुंबई, पुण्यात त्यांची प्रचंड  मोठी संपत्ती आहे.

विधानसभेचे अधिवेशन सोमवारी अध्यक्षांविनाच सुरू झाले. उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी कामकाज पाहिले. नाना पटोले यांनी राजीनामा दिल्याने अध्यक्षपद हे रिक्त आहे. या अधिवेशनात अध्यक्षपदाची निवडणूक घ्या असे पत्र राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Governer Bhagat Singh Koshyari) यांनी विधानमंडळास लिहिले होते. मात्र, काँग्रेसचा अध्यक्षपदाचा उमेदवार इतक्या लवकर ठरण्याची शक्यता नाही. त्यामुळे या अधिवेशनात तरी नवीन अध्यक्ष होतील असे वाटत नाही. राज्यपाल सरकार वा विधानमंडळास केवळ निवडणूक घेण्याबाबत संदेश पाठवू शकतात, आदेश देऊ शकत नाहीत, कोणत्या तारखेला निवडणूक घ्यावी हे तर मुळीच सांगू शकत नाहीत असा तर्क महाविकास आघाडीचे नेते देत आहेत. मात्र, कोणत्या तारखेला निवडणूक घ्यावी हे सांगण्याचा अधिकार राज्यापालांना घटनेने दिलेला आहे असे भाजपचे एक ज्येष्ठ नेते आज पत्रकारांना सांगत होते. कोणत्या तारखेला निवडणूक घ्यावी या बाबतचे सुस्पष्ट आदेश येत्या एकदोन दिवसात राज्यपालांकडून जाण्याची शक्यता आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER