कोण आहे जगात सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू? आणि त्याची कमाई किती?

Sport news-MaharashtraToday

जगातील सर्वाधिक कमाई करणारा खेळाडू (Highest earning sportperson in the world) कोण असेल? काही अंदाज? आणि त्याची काय कमाई असेल, याची काही कल्पना? कोरोनामुळे (Corona) गेल्या वर्षभरात जगभरात जवळपास सगळीकडेच खेळ ठप्प असताना खेळाडू कमाई ती काय करणार, असा तुमचा समज असेल तर तो साफ चुकीचा आहे. जगभरातील अब्जाधीश, सेलिब्रेटी, खेळाडू आणि कंपन्यांच्या कमाईचा त्यांच्या शास्त्रीय पध्दतीने हिशेब मांडणाऱ्या ‘फोर्बज्’ (Forbes’) या नियतकालिकाने दोन दिवसांपूर्वीच जगात सर्वाधिक कमाई करणाऱ्या ‘टॉप टेन’ (Top 10) खेळाडूंची वार्षिक यादी जाहीर केली आहे. 1 मे 2020 ते 1 मे 2021 या काळातील कमाईची ही यादी आहे आणि त्यात अतिशय आश्चर्यजनक आणि अविश्वसनीय बाबी समोर आल्या आहेत.

पहिली गोष्ट म्हणजे कोरोनाने खेळ आणि जगभरातील व्यवहार ठप्प असले तरी खेळाडूंची कमाई मात्र वाढली आहे. या यादीच्या इतिहासात पहिल्यांदाच चार खेळाडूंच्या वार्षिक कमाईने 100 मिलियन (10 कोटी) डॉलरचा टप्पा ओलांडला आहे. (डॉलरचा ताजा दर : एक डॉलर = 73.2791 रुपये). गेल्या तीन वर्षांपासून या यादीत अधिकाधिक तीनच खेळाडू 100 मिलीयन डॉलरपेक्षा अधिक कमाई करणारे होते. यंदा चार आहेत.

दुसरी गोष्ट म्हणजे टॉप टेन खेळाडूंची एकत्रित कमाई ही गेल्या वर्षीच्या टॉप टेनपेक्षा थोडथोडकी नाही तर तब्बल 28 टक्के वाढली आहे. यंदाच्या टॉप टेनची एकत्रीत कमाई 1052 मिलीयन डॉलर (105.2 कोटी डॉलर) आहे. ही कमाई आतापर्यंतची टॉप टेनची जी विक्रमी कमाई होती 2018 मध्ये 1060 मिलीयन डॉलर त्याच्या खालोखाल आहे.

तिसरी गोष्ट म्हणजे यंदा टॉप टेनसाठी कट आॕफ 75 मिलियन डॉलर एवढ्या उंचावर पोहोचला. याच्याआधी सर्वोच्च कट आॕफ 2019 मधील 65.4 मिलीयन डॉलरचा होता.

चौथी गोष्ट म्हणजे यंदाच्या टॉप टेनची मैदानाबाहेरची कमाई 512 मिलियन डॉलर राहिली. ही आधीची अशी विक्रमी कमाई- 2020 मधील 407.5 मिलियन डॉलरपेक्षा कितीतरी अधिक राहिली.

आणि हे सर्व डोळे विस्फारणारे आकडे त्या वर्षातले आहेत ज्यात कोरोनामुळे खेळ पूर्ण क्षमतेने झालेच नाहीत, फूटबॉल, बेसबॉल खेळाडूंच्या मानधनात कपात झाली, एनबीएने खेळाडूंच्या करारात बदल केले, त्यामुळे त्यांचे उत्पन्न घटले आणि प्रेक्षकांशिवाय स्पर्धा खेळल्या गेल्या. याशिवाय सुरक्षित बायोबबल निर्मितीचा भार आयोजकांवर पडला.

आता गेल्या वर्षभरात ज्या खेळाडूने सर्वाधिक कमाई केली तो म्हणजे कॉनर मॕकग्रेगर (Connor McGregor)! मिक्स्ड मार्शल आर्टचा (MMA) हा आयरीश खेळाडू…तो या यादीत पहिल्यांदाच सर्वोच्च स्थानी पोहोचला आहे आणि ‘फोर्बज्’नुसार गेल्या वर्षभरातील त्याची कमाई आहे 180 मिलियन युएस डाॕलर म्हणजे आजच्या एक्स्चेंज रेटनुसार तब्बल 1319 कोटी रुपये म्हणजे तो अब्जाधीश आहे. या त्याच्या कमाईत प्रमुख वाटा आहे तो त्याच्या व्हिस्की ब्रँडमधील आपल्या हिश्श्याच्या विक्रीचा. व्हिस्की ब्रँड प्रॉपर नंबर व्टल्व्ह मधील आपले भाग त्याने प्राॕक्झिमो स्पिरिटसला विकले आणि या व्यवहारातून त्याला दीडशे मिलीयन डॉलरची कमाई झाली. त्यामुळे हा 32 वर्षीय खेळाडू पहिल्यांदाच कमाईत नंबर वन बनला आहे आणि दुसऱ्यांदाच या यादीत टॉप टेनमध्ये आला आहे. याच्याआधी 2018 मध्ये 99 मिलीयन डॉलरच्या कमाईसह तो या यादीत चौथ्या स्थानी होता. या कमाईतून त्याने फूटबॉलमधील आघाडीचा मॕचेस्टर युनायटेडसारखा संघ विकत घेण्याचा मनोदयही बोलून दाखवला आहे.

आपल्या खेळातील कमाईशिवाय जाहिराती व प्रायोजकत्वातून त्याची कमाई गेल्या 12 महिन्यात 158 मिलियन डॉलरची आहे आणि खेळाबाहेर वर्षाला 70 मिलियन डॉलरपेक्षा अधिक कमाई करणारा रॉजर फेडरर व टायगर वूडस यांच्यानंतरचा तो पहिलाच आहे.

दुसऱ्या स्थानी आहे अर्जेंटिना व बार्सिलोनाचा 33 वर्षीय फूटबॉल सुपरस्टार लियोनेल मेस्सी (Lionel Messi) ज्याची फोर्बजनुसार गेल्या 12 महिन्यांतील कमाई 13 कोटी डॉलर (130 मिलियन डॉलर) आहे जी भारतीय रुपयांमध्ये 952 कोटी 62 लाख रुपये होते. गेल्या वर्षी मेस्सी बार्सिलोनासाठी खेळणार की बाहेर पडणार याचीच चर्चा होती. त्याचवेळी त्याचा बार्सिलोनासोबतचा करार 674 मिलीयन डॉलर एवढ्या प्रचंड रकमेचा असल्याची बाब समोर आली होती. याशिवाय आदिदास सोबतचा त्याचा करार आणि हिलफिगरसोबतच्या करारातून त्याला भरघोस कमाई होत असते.

12 कोटी डॉलरच्या कमाईसह मेस्सीचा प्रतिस्पर्धी, पोर्तुगालचा ख्रिस्तियानो रोनाल्डो (Christiano Ronaldo) तिसऱ्या स्थानी आहे. जगभरात सोशल मीडियावर त्याने 50 कोटी प्रशंसकांचा टप्पा फेब्रुवारीतच पार केला आहे. त्याचा युवेंटस सोबतचा चार वर्षांचा करार वार्षिक 6 कोटी 40 लाख डॉलरचा आहे. नाईकी सोबत त्याचा आयुष्यभराचा करार आहे आणि सीआर सेव्हन या त्याच्या ब्रँडच्या माध्यमातूनही त्याची कमाई खूप मोठी आहे.

गेल्या 12 महिन्यात कमाईत 100 मिलियन म्हणजे 10 कोटी डॉलरचा टप्पा ओलांडणारा चौथा खेळाडू म्हणजे अमेरिकन फूटबॉलचा 27 वर्षीय खेळाडू डॕक प्रेस्कॉट (Dak Prescott). याची कमाई आहे 10 कोटी 75 लाख डॉलर. एनएफएलच्या (NFL) खेळाडूची ही विक्रमी कमाई आहे. डलास काउबाॕईजशी करार केल्याच्या 6कोटी 60 लाख डॉलरच्या बोनसची ही करामत आहे.

फोर्बजच्या या यादीत या चौघांशिवाय केवळ राॕजर फेडरर, फ्लॉयड मेवेदर, नेमार, मॕनी पॕक्विनो आणि टायगर वुडस् यांनीच यापूर्वी एका वर्षात 100 मिलीयन म्हणजे 10 कोटी डॉलरपेक्षा अधिक कमाई केली आहे.

फोर्बजच्या यादीनुसार टॉप टेन धनिक खेळाडू (रक्कम युएस डॉलरमध्ये व भारतीय रुपयात)

1) कॉनर मॕकग्रेगर -आयर्लंड – एमएमए
18 कोटी डॉलर- 1319.02 कोटी रु.

2)लियोनेल मेस्सी- अर्जेंटिना- फूटबॉल
13 कोटी डॉलर- 952.62 कोटी रु.

3) ख्रिस्तियानो रोनाल्डो- पोर्तुगाल- फूटबॉल
12 कोटी डॉलर- 879.35 कोटी रु.

4) डॕक प्रेस्कॉट- अमेरिका- अमेरिकन फूटबाॕल
10 कोटी 75 लाख डॉलर- 787.85 कोटी रु.

5) लेब्रान जेम्स- अमेरिका- बास्केटबॉल
9 कोटी 65 लाख डॉलर- 707.14 कोटी रु.

6) नेमार – ब्राझील- फूटबाॕल
9 कोटी 50 लाख डॉलर- 696.15 कोटी रु.

7) राॕजर फेडरर- स्वीत्झर्लंड- टेनिस
9 कोटी डॉलर- 659.51 कोटी रु.

8) लुईस हॕमिल्टन- ब्रिटन- फॉर्म्युला वन
8 कोटी 20 लाख डॉलर- 600.88 कोटी रु.

9) टॉम ब्रॕडी- अमेरिका- अमेरिकन फूटबॉल
7 कोटी 60 लाख डॉलर- 556.92 कोटी रु.

10) केव्हिन ड्युरांट- अमेरिका- बास्केटबॉल
7 कोटी 50 लाख डॉलर- 549.59 कोटी रु.

(एक डॉलर = 73.2791 रुपये असा विनिमय दर धरुन रक्कम)

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button