राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू कोण ? – शरद पवार

उत्तर दिले संजय राऊत यांनी

Sharad Pawar & Sanjay Raut

देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) सरकारमध्ये भाजप (BJP) हा मोठा भाऊ होता. फडणवीस नागपूरचे, वित्त मंत्री सुधीर मुनगंटीवार (Sudhir Mungantiwar) चंद्रपूरचे, ऊर्जा आणि उत्पादन शुल्क मंत्री चंद्रशेखर बावनकुळे नागपूरचे, सामाजिक न्याय मंत्री राजकुमार बडोले गोंदियाचे. महत्त्वाची अशी खाती विदर्भाकडे होती. त्यातच रा.स्व.संघाचे मुख्यालय नागपुरात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरीही (Nitin Gadkari) नागपूरचे. त्यामुळे फडणवीस सरकारच्या काळात नागपूरचा बोलबाला राहिला. आता शिवसेना (Shivsena) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे मुख्यमंत्री झाल्यानंतर राज्याच्या नेतृत्वाचा लोलक हा मुंबईकडे सरकला अशी सगळ्यांचीच धारणा होती. मात्र, या धारणेला शिवसेनेचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी शनिवारी छेद दिला. पुणे येथे पत्रकारांशी बोलताना त्यांनी पवार हे आमचे नेते आहेत असे सांगतानाच महाराष्ट्राच्या राजकारणाचा केंद्रबिंदु पुण्यातच आहे. बाळासाहेब  ठाकरे होते तोपर्यंत मुंबई हा केंद्रबिंदू होता. आता सगळे प्रमुख लोक पुण्यात आहेत, असे स्पष्ट केले आणि राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदू हा शरद पवारच असल्याचे त्यांनी मान्य केले.

राज्याचे मुख्यमंत्री शिवसेनेचे आहेत पण ते नव्हे तर शरद पवार हे राज्याच्या राजकारणाचा केंद्रबिंदु असल्याचे एकप्रकारे राऊत यांनी मान्य केले. मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांनी दोन दिवसांपूर्वी राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची भेट घेऊन वाढीव वीज बिलप्रश्नी न्याय द्यावा अशी मागणी केली होती. राऊत यांनी राज यांचे नाव घेतले नाही पण महाराष्ट्राचे प्रश्न घेऊन राज्यपालांना भेटणे हा महाराष्ट्राचा अपमान असल्याचा आरोप त्यांनी पुण्यात शनिवारी पत्रकारांशी बोलताना केला. कोणत्याही प्रश्नांसाठी आधी संबंधित खात्याच्या मंत्र्यांना, त्यानंतर मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे, राज्यपालांना कार्यकारी अधिकार नसतात अशी पुस्तीही त्यांनी जोडली.

राऊत यांनी राज्यपालांवर थेट निशाणा साधला. राज्यपालांना राजकारण करायचे असेल तर राजभवनच्या बाहेर या, मैदानात येऊन राजकारण करा. आम्ही घटनात्मक पदाचा मान राखतो असे आव्हान त्यांनी दिले. राज्यपालांनी मुख्यमंत्री ठाकरे यांना ‘तुम्ही कधीपासून सेक्युलर झालात असा चिमटा काढल्याची शिवसेनेला झालेली वेदना अजून कमी झाल्याचे दिसत नाही हे राऊत यांच्या वक्तव्यावरून जाणवले.

शिवसेनेत पवारांच्या सर्वात जवळचे असलेले नेते अशी संजय राऊत यांची ओळख आहे. मध्यंत्री सोशल मीडियात एक जोक फिरत होता. राऊत यांना अचानक ताप असल्याचे जाणवू लागले. डॉक्टरांनी त्यांना तपासले, टेम्परेचर अगदीच नॉर्मल होते. त्याचवेळी पवार साहेबांचं अंग थोडं गरम असल्याचं कळलं. तिकडे पवार साहेबांना किंचित ताप वाटताच राऊत यांना लगेच कणकण जाणवते, असा तो जोक होता. त्यातील गमतीचा भाग जाऊ द्या पण बरेचदा काही गोष्टी सरकार चालविताना उद्धव ठाकरे यांना मान्य नसतात पण पवार साहेबांचा त्यासाठी आग्रह असतो. अशावेळी त्या गोष्टी मुख्यमंत्र्यांच्या गळी उतरविण्यासाठी राऊत महत्त्वाची भूमिका बजावतात अशी माहिती आहे.

तिकडे सरकारमधील घटक पक्ष असलेल्या काँग्रेस पक्षात धुसफूस सुरू झाली आहे. मुख्यमंत्री ठाकरे हे काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या पालिकांना निधी देत नाहीत, अशी तक्रार माजी मुख्यमंत्री आणि राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी केली आहे. जाहीर कार्यक्रमात ते बोलले. महिला व बालकल्याण मंत्री यशोमती ठाकूर यांनी त्यास दुजोरा दिला. ओबीसी विभाग तसेच मदत व पुनर्वसन विभागाचे मंत्री विजय वडेट्टीवार यांच्याकडून सारथी संस्थेचा कार्यभार काढून तो उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या नियोजन विभागाकडे देण्यात आला. त्यामुळे वडेट्टीवारही नाराज असल्याचे समजते. शिवसेनेचे व राष्ट्रवादीचे कॅबिनेट मंत्री हे काँग्रेसच्या राज्यमंत्र्यांना अधिकारच देत नाहीत अशा तक्रारी आहेत. एकूणच कुरबुरी वाढत आहेत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER