मुख्यमंत्री कुणाचा? पवारांना माहित नाही

badgeराष्ट्रवादीचे सुप्रीमो शरद पवार दोन दिवस नागपूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. परतीच्या पावसाने केलेल्या शेतीच्या नुकसानीची त्यांनी पाहणी केली. शेतकऱ्यांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे पैसे मागू असे म्हणाले. दोन्ही काँग्रेस आणि शिवसेना मिळून सरकार बनवणार आणि ते पूर्ण पाच वर्षे टिकेल असा दावा त्यांनी पत्रकारांशी बोलताना केला. पण ह्या सरकारचा मुख्यमंत्री कुणाचा असेल? ह्या प्रश्नाचे उत्तर त्यांनी टाळले.

तिकडे, शिवसेनापक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यापासून खासदार संजय राऊत इथपर्यंत सारे शिवसेना नेते मात्र मुख्यमंत्री शिवसेनेचाच असेल असे छाती ठोकून सांगत आहेत. याचा अर्थ महाशिवआघाडीत सारे आलबेल नाही. मग शरद पवारांच्या मनातला मुख्यमंत्री कोण आहे?

‘आम्हाला विरोधी पक्षात बसायचा कौल जनतेने दिला आहे’ असे पवार सुरुवातीला म्हणत होते. विरोधी बाकांवरून पवार सत्ता बाकांवर केव्हा आले ते कोणालाच कळले नाही. आता त्यांनी अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपद मागितले तर आश्चर्य वाटायला नको. बोलतात त्याच्या नेमके उलटे होते. पवारांची ती खासियत आहे. त्यांच्या मनात काय चालू आहे? याचा अखेरपर्यंत पत्ता लागत नाही. मुख्यमंत्री मिळेल ह्या आशेने उद्धव हे पवारांच्या जाळ्यात अडकले. आता त्यांची घुसमट होत असणार. ‘मातोश्री’बाहेर न पडलेले उद्धव आता मित्र पक्षांचे उंबरठे घासत आहेत.

सेनेचा प्रस्ताव -शिवसेनेचा पाच वर्षे मुख्यमंत्री, काँग्रेस-राष्ट्रवादीला उपमुख्यमंत्रीपद: सूत्र

मुख्यमंत्रीपदाचा हट्ट करून उद्धव ठाकरे यांनी भाजपशी युती तोडली. पण इथे दोन काँग्रेसवाल्यांसोबत आल्यानंतरही काही खरे नाही. सध्या राज्यातले तिन्ही पक्षांचे नेते चर्चा करीत आहेत. मुंबईत बसून घेतलेले निर्णय पुढे दिल्लीत सोनिया गांधींपुढे जातील. त्यांना पसंत पडले तरच शिवसेना आघाडीचे घोडे गंगेत न्हाले समजायचे. पवारांवर विश्वास ठेवून उद्धव यांनी मोठी चूक केली हे सावकाश त्यांच्या लक्षात येईल. आमच्याशिवाय सरकार स्थापन होणे शक्य नाही असे भाजप नेते आजही म्हणत आहेत. त्याचा अर्थ पवारांच्या मौनात शोधायचा का? कारण पवारांना पकडून भाजप सरकार बनवणार असल्याची चर्चा सुरु झाली आहे.

१८ तारखेपासून संसदेचे अधिवेशन सुरु होत आहे. १७ तारखेला बाळासाहेब ठाकरे यांची पुण्यतिथी आहे. काय व्हायचे ते १७ तारखेलाच होईल. शरद पवार, उद्धव ठाकरे हे सोनिया गांधींशी चर्चा करणार आहेत. १७ तारीख टळली तर मग मुहूर्त मिळणे अवघड आहे. दोन दिवसात काय निर्णय होणार? तुम्ही लिहून ठेवा. काहीही होणार नाही. सोनिया शिवसेनेला टांगून ठेवतील. काँग्रेसने सत्तेत सामील व्हायचे की बाहेर राहून पाठींबा द्यायचा हेही अजून ठरायचे आहे. शेतकऱ्यांचे नेते म्हणवणाऱ्या ह्या नेत्यांना कसलीही घाई नाही. तिकडे शेतकरी मरणासन्न आहे. उद्धव सरकार आले तर खिशात पैसे येतील अशी भाबडी आशा शेतकरी बाळगून आहेत. पण शेतकऱ्याला आतापर्यंत कुठल्या सरकारने काही दिले आहे की हे सरकार देणार आहे? राज्य सरकारकडे पैसे नाही आणि मोदी काय म्हणून ह्या सरकारला जास्तीचा पैसे देतील?