चंद्रकांत दादांनी सांगितलेले ते प्रदेश कार्याध्यक्ष कोण ?

माजी मंत्री नितीन राऊत, आ.यशोमती ठाकूर आ. विश्वजीत कदम, आ. बसवराज पाटील आणि माजी आमदार मुजफ्फर हुसेन हे काँग्रेसचे पाच कार्याध्यक्ष आहेत. भाजपच्या प्रदेश अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर चंद्रकांत पाटील यांची पहिली पत्रकार परिषद झाली त्यात त्यांनी काँग्रेसच्या राज्यातील पाच कार्याध्यक्षांपैकी एक जण नजीकच्या काळात भाजपमध्ये आला तर तुम्ही आश्चर्य वाटू देऊ नका असा गौप्यस्फोट केल्याने हे कार्याध्यक्ष नेमके कोण? याबाबत उलटसुलट चर्चा सुरू झाली आहे.

माजी मंत्री श्री बाळासाहेब थोरात यांना काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नेमताना काँग्रेसश्रेष्ठींनी वरील पाच कार्याध्यक्ष देखील नेमले ते नेमताना जातीय आणि विभागीय संतुलन साधण्याचा प्रयत्न करण्यात आला थोरात श्‍चिम महाराष्ट्राचे आहेत त्यांच्या सोबतीला पाच कार्याध्यक्ष देताना जातीय आणि विभागीय संतुलनाचाही काँग्रेसश्रेष्ठींनी विचार केला. अखिल भारतीय काँग्रेसच्या दलित मोर्चाचे अध्यक्ष माजी मंत्री नितीन राऊत आणि आणि अमरावती जिल्ह्यातील आमदार व राहुल ब्रिगेडच्या सदस्य यशोमती ठाकूर असे दोघे विदर्भातील आहेत. राऊत दलित समाजाचे तर ठाकूर या मराठा समाजाच्या आहेत.लातूर जिल्ह्यातील औसाचे आमदार बसवराज पाटील हे लिंगायत समाजाचे आहेत.माजी मंत्री डॉ.पतंगराव कदम यांचे पुत्र आणि सांगली जिल्ह्यातील आमदार विश्वजीत कदम मराठा समाजाचे तसेच ठाणे जिल्ह्यातील मिरा-भाईंदर शहराततील असलेले माजी विधान परिषद सदस्य मुजफ्फर हुसेन मुस्लिम आहेत.

ही बातमी पण वाचा : चंद्रकांतदादा म्हटले, मग आमचा रामराम..!

आता प्रश्न असा आहे की या पाचपैकी नेमकं कोण भाजपमध्ये जाण्याची शक्यता आहे?चंद्रकांतदादा कोणत्या नावाकडे अंगुलिनिर्देश करीत आहेत? या पाचपैकी नेमकं कोण भाजपच्या गळाला लागू शकतो? काँग्रेसचे एक कार्याध्यक्ष लवकरच भाजपत येऊ शकतात असे विधान करून चंद्रकांत दादांनी प्रदेशाध्यक्ष झाल्याझाल्या खळबळ  नक्कीच  उडवून कळवण दिली आहे.

आता या पाच कार्याध्यक्षांपैकी एकेका नावावर आणि त्याच्या पार्श्वभूमीवर थोडी नजर टाकुयात. लहानपणी  एक सोपी पत्त्यांची जादू आम्ही शिकलो. एकाखाली एक तीन तीन पत्ते टाकायचे आणि हात त्यावरून बोट आडवे-उभे फिरवून तुम्ही मनात धरलेला पत्ता या रांगेत आहे का, या रांगेत आहे का, या रांगेत आहे का, असे आलटून पालटून विचारायचे आणि आणि समोरच्याने नेमकं कोणतं फक्त मनात धरलेले आहे ते ओळखायचे अशी ती जादू होती. त्याच जादूचा वापर या पाच जणांच्या बाबतीत केला तर भाजपमध्ये कोण जाऊ शकतं याचं उत्तर मिळेल.

चंद्रकांतदादा बिनदिक्कतपणे विधान करीत आहेत. याचा अर्थ जो कार्याध्यक्ष भाजपमध्ये येण्याची शक्यता आहे तो दादांच्या पश्चिम महाराष्ट्रातील असण्याची शक्यता आहे. अर्थात हा पत्त्याच्या जादूसारखा तर्क आहे. नितीन राऊत आणि दादांचा संपर्क कुठे आला असण्याची शक्यता नाही. राऊत नागपूरचे आहेत. निष्ठावंत काँग्रेसजन आहेत. तीन वेळा आमदार होते. दलित चळवळीत सक्रिय राहिले आहेत. दलितांचे प्राबल्य असलेल्या उत्तर नागपुरातून ते निवडून यायचे. संघ-भाजपच्या विचारांशी संघर्ष करीत आलेले आहेत. ते भाजपमध्ये कधीही जाणार नाहीत. यशोमती ठाकूर काँग्रेसच्या घराण्यातील आहेत. त्यांचे वडील आमदार होते. त्या स्वतः तिसऱ्यांदा आमदार आहेत. काँग्रेसचे अध्यक्ष राहुल गांधी यांच्या अत्यंत निकटवर्ती आहेत. त्या आणि आणि आमदार वीरेंद्र जगताप हे दोघे अमरावती जिल्ह्यातील काँग्रेसचा चेहरा आहेत. बसवराज पाटील निष्ठावंत काँग्रेसी आहेत. यावेळी विधानसभा निवडणुकीत त्यांची लढत मुख्यमंत्र्यांचे पीए अभिमन्यू पवार यांच्याशी होईल हे जवळपास निश्चित आहे. बसवराज यांनी भाजपमध्ये यावे यासाठी कोणी त्यांच्याशी  संपर्कही साधलेला नाही. ते कोणत्याही परिस्थितीत भाजपमध्ये जाण्याची शक्यता नाही. मुजफ्फर हुसेन यांना पक्षात घेण्यासाठी भाजपवाले घर टाकतील इतके मुळात ते मोठे नाहीत. त्यांच्या राजकारणाचा जीव खूपच लहान आहे. चंद्रकांतदादा बहुतेक त्यांना ओळखता येत नसावेत. कोणीतरी सांगत होतं की,” काय वैभव तुमचे बाबा कसे आहेत” असे चंद्रकांत दादांनी विधानभवनात मुजफ्फर हुसेन यांना एकदा विचारले. मुजफ्फर यांना काही कळेना नंतर उलगडा झाला की दादा त्यांना वैभव पिचड समजत होते.

आता राहता राहिले आमदार विश्वजीत कदम. लोकसभा निवडणुकीच्या आधीच त्यांची त्यांच्या भाजप प्रवेशाची चर्चा होती. तसे काही माध्यमांमध्ये आले होते. सांगली जिल्ह्याच्या राजकारणात  हा उमदा तरुण नेता आपल्याकडे असावा असे मुख्यमंत्र्यांना आणि चंद्रकांतदादांनाही वाटणे स्वाभाविक आहे. विश्वजीत हे राजकारणात त्यांचे दिवंगत वडील डॉ. पतंगराव कदम यांचा वारसा चालवत आहेत.महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वच दिग्गजांशी अत्यंत जिव्हाळ्याचे संबंध असलेले प्रख्यात उद्योजक आणि आणि ज्यांच्या एका शब्दावर मंत्रालयातील कुठलेही काम होऊ शकते असे अविनाश भोसले यांचे विश्वजीत हे जावई आहेत. पश्चिम महाराष्ट्रात प्रचंड मोठा पसारा असलेल्या आणि डॉ. पतंगराव कदम यांनी अत्यंत कष्टाने उभारलेल्या भारती विद्यापीठाची सूत्रे विश्वजीत यांच्याकडे आहेत.

एवढे असूनही विश्वजीत जमिनीवर आहेत। बोलण्यामध्ये कुठलाही अहंकार नसतो. माहिती अशी आहे की ते मुख्यमंत्र्यांमुळे अतिशय प्रभावित आहेत. मुख्यमंत्र्यांच्या कामाचा सपाटा, कामाची पद्धत आणि निर्णयक्षमता याचे ते चाहते आहेत. विश्वजीत यांना राजकारणात किमान पंचवीस वर्षे बॅटिंग करायची आहे. अशावेळी राजकारणात स्थिर होण्याच्या दृष्टीने आजच्या परिस्थितीत त्यांना भाजप जवळचा वाटू शकतो. ते भाजपसाठी असेट ठरू शकतात.त्यामुळे त्यांना भाजपमध्ये आणण्याचा पुरेपूर प्रयत्न होत असल्याची माहिती आहे. चंद्रकांतदादांनी काल केलेले वक्तव्य याला जोडूनच बघितले जात आहे.