साईबाबा कुठले, कोणाचे?

shirdi-saibaba

badgeसाधुसंतांची जात, गाव विचारायचे नसते. त्या काळात तर बाळंतपणं घरीच होत. त्यामुळे जन्माचे दाखले असण्याची शक्यता कमीच. अनेक संत कुठे जन्मले, कुठे प्रगटले याच्या कथा अनंत आहेत. अलीकडे तर साधुसंतच दुर्मिळ झाले आहेत. अयोध्येत रामाचे मंदिर बांधत आहेत. पण तिथे राम कुठून आणणार? सज्जनशक्तीच आटत चालल्याने आता साईबाबांच्या तोडीचे साधुसंत पाहायला मिळण्याची संधी कमी आहे. पाप वाढले, पुण्य कमी होत चालल्याने जुन्या साधुसंतांच्या पुण्याईवर आपणा सर्वांना दिवस काढायचे आहेत. अशा वेळी कुण्या बाबाच्या जन्मस्थळावरून दोन गावं आपसात भिडतात तेव्हा तो चिंतेचा विषय होतो.

‘सब का मालिक एक’ असे सांगून गेलेल्या साईबाबा यांच्यावर दोन गावांनी हक्क सांगितला आहे. आतापर्यंत साईबाबा म्हणजे नगर जिल्ह्यातील शिर्डी असे गणित होते. परभणी जिल्ह्यातील पाथरी ह्या गावचा उल्लेख मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी साईबाबांचे जन्मस्थळ म्हणून नुकताच केला, त्या तीर्थस्थळाच्या विकासासाठी १०० कोटी रुपये मंजूर केले आणि भांडण पेटले. शिर्डीकरांनी आक्रमक होत मोठे आंदोलन पुकारले. आजच्या भेटीत मुख्यमंत्र्यांनी जन्मस्थळाचा उल्लेख मागे घेतल्याचे शिर्डीकर सांगतात; पण पाथरीकरांचे समाधान कोण करणार? हा प्रश्न उरतोच.

गृहमंत्र्यांच्या नागपुरात राष्ट्रवादीचा गेम

मराठवाड्यातील पैठणजवळील धूपखेडा गावानेही ह्या वादात उडी घेतली आहे. साईबाबा आमच्याकडे प्रगटले असा दावा करून आमच्याही गावाला तीर्थक्षेत्र म्हणून निधी मिळावा अशी मागणी धूपखेड्याने केली आहे. म्हणजे नेमकी समस्या काय? पाथरीला जन्मस्थळ म्हणून मान्यता मिळाली तर शिर्डीचे माहात्म्य कमी होईल, अशी भीती शिर्डीकरांना आहे काय? बाबा आयुष्यभर साध्या कपड्यात जगले. पण त्यांचे मंदिर चकाचक आहे. भक्तांनाही ते हवे असेल तर बाबांचा ताबा घेऊन बसलेले मंदिरवाले कशाला हरकत घेतील? त्यामुळे बऱ्याचशा मंदिरांत हल्ली देखावा, तामझाम दिसतो. गणेशाच्या नावाची मंदिरेही तगडी बॅलन्स शीट दाखवत आहेत. शेगावच्या गजानन मंदिराने काही पथ्य पाळून आदर्श निर्माण केला आहे; पण बहुतेक जागी गोंधळ आहे. बाबा हातून केव्हा निसटले ते भक्तांनाही कळले नाही. साईबाबांच्या जन्मस्थळाचा वाद म्हणूनच निरर्थक आहे. जिथे श्रद्धा, सबुरी आहे तेच बाबांचे खरे जन्मस्थळ आहे.