पांडुरंग रायकरच्या मृत्यूची जबाबदारी घेणार कोण?

Pandurang Raikar

टीव्ही नाईनचे पुण्यातील पत्रकार पांडुरंग रायकर (Pandurang Raikar) यांचा वयाच्या केवळ ४२ व्या वर्षी कोरोनाने ज्या परिस्थितीत मृत्यू झाला ते बघता आरोग्य व्यवस्थेतील लक्तरे वेशीवर टांगली गेली आहेत. रायकर यांच्या मृत्यूप्रकरणी चौकशीचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या चौकशीत आता कोणावर तरी गदा आणली जाईल आणि सरकार चौकशीच्या कर्तव्यातून मोकळे होईल पण रायकर यांच्यासारख्या उमद्या पत्रकाराच्या मृत्यूची जबाबदारी सरकारनेच घेण्याची गरज आहे.

या ठिकाणी काही गोष्टी अत्यंत खेदाने नमूद कराव्या लागत आहेत.रायकर यांना वेळीच उपचार मिळाले असते तर ते नक्कीच वाचू शकले असते. रायकर यांची अँटीजन टेस्ट निगेटीव्ह आली होती. त्यानंतर ते अहमदनगर जिल्ह्यातील कोपरगाव या आपल्या विश्रांतीसाठी गेले पण तब्येत थोडी बिघडली म्हणून स्वॅब टेस्ट झाली आणि ते कोरोना पॉझिटीव्ह असल्याचे स्पष्ट झाले. मग कोपरगावच्या हॉस्पिटलमध्ये त्यांना भरती करण्यात आले, तिथे त्यांना ४० हजार रुपये भरण्यास सांगण्यात आले. तेथे भरती न होता ते पुण्याला जम्बो कोविड सेंटरमध्ये भरती झाले. तिथे त्यांची प्रकृती खालावली. त्यांना खासगी रुग्णालयात हलविण्यासाठी कुटुंब आणि मित्रांनी हालचाली केल्या.

रायकर यांची आॅक्सिजन पातळी फारच खालावली होती. अखेर काल संध्याकाळी दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये बेड उपलब्ध झाला. तिकडे त्यांना हलविण्यासाठी कार्डियाक अ‍ॅम्ब्युलन्स हवी होती.मंगळवारी रात्री उशिरा एक अ‍ॅम्ब्युलन्स आली पण त्यातील व्हेंटिलेटर खराब होते. दुसरी अ‍ॅम्ब्युलन्स मिळविण्याचा प्रयत्न झाला पण त्यात डॉक्टर नव्हते. बुधवारी पहाटे ४ वाजता अ‍ॅम्ब्युलन्स मिळाली, रायकर यांना दीनानाथ मंगेशकर हॉस्पिटलमध्ये हलविण्याची तयारी सुरू झाली पण तोवर खूप उशीर झाला होता, रायकर यांचा हकनाक बळी गेला. मन सुन्न करणारा हा घटनाक्रम आहे. पुण्याच्या इलेक्ट्रॉनिक मीडियातील बडे पत्रकार हे रायकर यांना तातडीने उपचार मिळावेत यासाठी प्रयत्न करत असताना ही अवस्था झाली तर सामान्य माणसांचे काय होत असेल याचा विचार न केलेलाच बरा.

कोविड सेंटरमधील ज्या डॉक्टर, कर्मचाºयांनी रायकरांवरील उपचाराबाबत हलगर्जीपणा केला त्यांना तत्काळ निलंबित केले पाहिजे. ‘माझा भाऊ यंत्रणेच्या असुविधेमुळे गेला. कोटींचा प्रोजेक्ट उभा केला पण साधी अ‍ॅम्ब्युलन्स त्याला नेण्यासाठी मिळाली नाही. दादाला भूक लागली होती. त्याने डबा आणायला सांगितला, मी डबा दिला पण तो त्याला मिळालाच नाही, औषधंही मिळाली नाहीत, असा धक्कादायक आरोप रायकर यांच्या शोकाकुल बहिणीने केला आहे.

पांडुरंग रायकर हे अत्यंत धडाडीचे पत्रकार होते. पुण्यावरील कोरोना संकटकाळात कोरोनासंबंधीच्या बातम्या देण्यात ते आघाडीवर होते. नियतीने त्यांच्यावरच डाव साधला. सरकारने त्यांच्या कुटुंबाला तत्काळ आर्थिक मदत जाहीर करण्याची गरज आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी भाजपतर्फे त्यांच्या कुटुंबास पाच लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. आणखी काही जणांनी मदत देण्यास पुढे आले पाहिजे. या निमित्ताने कोरोनाबाधित पत्रकारांचा प्रश्नही ऐरणीवर आला आहे. बीड, लातूरमधील दोन पत्रकारांचा कोरोनाने मृत्यू झाला पण सरकारने त्यांच्या कुटुंबास कोणतीही आर्थिक मदत दिलेली नाही.

मुंबईत नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी मदत केली नसती तर कोरोनाबाधित दोन डझन पत्रकारांची काय अवस्था झाली असती याचा विचारच न केलेला बरा. शिंदे आणि त्यांच्या यंत्रणेने वेळीच केलेल्या धावपळीमुळे अनेक पत्रकारांचे जीव वाचले. शेवटी तेच की ज्यांची ओळख आहे, जे यंत्रणेवर दबाव आणू शकतात त्यांना मदत मिळते पण राज्यभरात फिल्डवर काम करणाºया पत्रकारांचा वाली कोण हा खरा प्रश्न आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER