७२ कोटींची संपत्ती जप्त झालेला प्रवीण राऊत आहे तरी कोण?

Praveen Raut

शिवसेनेचे (Shivsena) नेते खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांच्या पत्नी वर्षा राऊत (Varsha Raut) यांना ईडीने नोटीस पाठविली असून चौकशीसाठी बोलविले आहे. त्या ५ जानेवारी रोजी ईडीच्या (ED) मुंबईतील कार्यालयात जाणार असल्याचे समजते. वर्षा राऊत ज्या दिवशी ईडी कार्यालयात जातील त्या दिवशी शिवसैनिकांच्या माध्यमातून ईडी कार्यालयासमोर शक्तिप्रदर्शन करण्याची एक योजना होती; पण शिवसेनेच्या वरिष्ठांनी त्यास अनुमती दिली नाही, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांनी महाराष्ट्र टुडेला दिली. राज्यात आपलेच सरकार असताना आपल्या शिवसैनिकांनी ईडी कार्यालयासमोर जाऊन शक्तिप्रदर्शन करणे योग्य होणार नाही, असा सल्लावजा आदेश वरून देण्यात आला, असेही कळते.

संजय राऊत असोत की ठाण्यातील शिवसेनेचे आमदार प्रताप सरनाईक (Pratap Sarnaik), या दोघांबाबतही वैयक्तिक वा कौटुंबिक आर्थिक व्यवहारांसाठी ईडी चौकशी करीत आहे. त्यामुळे या दोघांनी वैयक्तिक पातळीवर ईडीच्या कारवाईचा सामना करावा, असा मोठा सूर आता शिवसेनेत असल्याचे म्हटले जाते. पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी सध्या प्रवीण राऊत ही व्यक्ती अटकेत आहे. तपास यंत्रणेला त्याने दिलेल्या माहितीच्या आधारे काही खळबळजनक बाबी समोर येऊ पाहात आहेत. प्रवीणची ७२ कोटी रुपयांची संपत्ती ईडीने शुक्रवारी जप्त केली. प्रवीण राऊत हा संजय राऊत कुटुंबाच्या जवळचा असल्याचे बोलले जाते. त्याच्या बँक खात्यातून वर्षा राऊत यांच्या खात्यात काही व्यवहार झाल्याची चौकशी केली जात असल्याची माहिती आहे. मुंबईलगत साम्राज्य असलेल्या एका भाईचाही प्रवीण राऊत हा डावा-उजवा हात मानला जातो.

पीएमसी बँक आणि एचडीआयएलच्या वाधवान ग्रुपचा समावेश असलेल्या ४ हजार ३५५ कोटींच्या घोटाळ्याची चौकशी ईडी करत आहे. रिझर्व्ह बँकेला २०१९ मध्ये एका व्हिसल-ब्लोअरच्या मदतीने पीएमसी बँकेने खोटे बँक खाते दाखवत एका रियल इस्टेट डेव्हलपरला जवळपास ६५०० कोटी रुपये कर्ज देत असल्याची माहिती मिळाली. हा व्यवहार होऊ नये आणि पैसे वाचावे या हेतूने रिझर्व्ह बँकेने पीएमसी बँकेवर २४ सप्टेंबर २०१९ रोजी निर्बंध लादले. हे निर्बंध ३१ मार्च २०२१ पर्यंत वाढवण्यात आले आहेत. या प्रकरणी ईडीचा तपास सुरू आहे.

पीएमसी बँक घोटाळाप्रकरणी आतापर्यंत बऱ्याच जणांना अटक करण्यात आली आहे. ईडीने १६ नोव्हेंबर २०१९ रोजी बँकेचे माजी संचालक रजनीत सिंह याला अटक केली होती. त्याआधी वरयाम सिंह, व्यवस्थापकीय संचालक जॉय थॉमस आणि एचडीआयएलचे प्रवर्तक यांच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली आहे. चौकशीनंतर माजी संचालक सुरजित सिंह अरोडा, एचडीआयएल समूहाचे प्रवर्तक राकेश आणि सारंग वाधवन, बँकचे माजी अध्यक्ष वरयाम सिंह आणि माजी संचालक जॉय थॉमस यांना अटक केली होती. त्याशिवाय आॅडिटर जयेश संघानी, केतन लकडावाला यांनाही अटक करण्यात आली होती.

ही बातमी पण वाचा : वर्षा राऊत पीएमसी बँक घोटाळा : राऊतांच्या जवळचे प्रवीण राऊतांची संपत्ती ईडीने केली जप्त

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER