फलंदाजीत कोण अधिक सफल- विराट कोहली की बाबर आझम?

Virat Kohli - Babar Azam - Maharashtra Today

क्रिकेट जगतात भारत विरुध्द पाकिस्तान (India Vs Pakistan) म्हणजे अगदी हातघाईवर येण्याचा विषय, त्याप्रमाणेच श्रेष्ठ फलंदाज कोण, भारताचा विराट कोहली (Virat Kohli) की पाकिस्तानचा बाबर आझम (Babar Azam) हा वादसुध्दा अगदी टोकाला पोहोचतो. आता पुन्हा हा वाद पेटायचे कारण म्हणजे इंग्लंडविरुध्दच्या मालिकेत विराट कोहलीने केलेल्या धावा आणि तिकडे दक्षिण आफ्रिकेविरुध्द पहिल्या वन डे सामन्यात बाबर आझमने केलेली शतकी खेळी.

विराटने इंग्लंडविरुध्दच्या वन डे मालिकेत 56, 66 व 7 धावांच्या खेळी केल्या तर त्याआधी टी-20 मालिकेत 0, 73, 77, 1 व 80 धावांच्या खेळी केल्या. दुसरीकडे बाबर आझमने मायदेशात दक्षिण आफ्रिकेविरुध्दच्या कसोटी मालिकेत 42, 62, 188 व 27 धावांच्या खेळी केल्यावर टी-20 मालिकेत तो अपयशी ठरला होता. मात्र त्यानंतर आता दक्षिण आफ्रिकेतील पहिल्याच वन डे सामन्यात सेंच्युरियन येथे 104 चेंडूत 103 धावांची खेळी बाबर आझमने केली आहे. वन डे सामन्यांच्या गेल्या 10 डावात त्याने 781 धावा केल्या असून सरासरी 90 व स्ट्राईक रेट 95 चा आहे. त्यामुळे विराट कोहली श्रेष्ठ की बाबर आझम याचीचर्चा पुन्हा सुरू झाली आहे.

सेंच्युरियन येथील बाबर,आझमची 103 धावांची खेळी हे त्याचे 13 वे वन डे इंटरनॅशनल शतक होते आणि 76 व्या डावात त्याने ते झळकावले. यासह वन डे इंटरनॅशनलमध्ये सर्वात कमी डावात म्हणजेच सर्वात जलद 13 शतके आपल्या नावावर लावण्याचा विक्रम त्याने केला आहे. हाशीम आमला (83 डाव), विराट कोहली (86 डाव), क्विंटन डी काॕक (86 डाव) आणि डेव्हीड वाॕर्नर (91 डाव) यांच्यापेक्षाही कमी डावात त्याने ही शतकं केली आहेत.

केव्हिन पीटरसनने बाबर आझमबद्दल म्हटलेय की तो अगदी बघतच रहावे असा खेळ करतो. त्याचा कव्हर ड्राईव्ह आणि बॕकफूटवरचे पंचेस बघण्यासारखे असतात. मार्क बाउचरही बाबरच्या खेळाने प्रभावीत झाला आहे. आणि तो फक्त 26 वर्षांचा आहे तर विराट कोहली 32 वर्षांचा आहे.हा वयातील सहा वर्षांचा फरक फार महत्वाचा आहे कारण विराटच्या वयात बाबर पोहोचेल तेंव्हा त्याच्या नावावर काय विक्रम असतील याची आपण कल्पनाच करु शकतो.

बाबर आझम हा सध्या 78 वन डे इंटरनॅशनल सामने खेळला आहे. या प्रवासात प्रत्येक 20 सामन्यात त्यांची तुलना केली तर प्रत्येक टप्प्यावर तो धावा, स्ट्राईक रेट आणि शतकांच्या बाबतीत विराट कोहलीच्या पुढेच आहे. सरासारीमध्येसुध्दा पहिल्या 20 सामन्यांच्या टप्प्यानंतर पुढे बाबर आझमच विराटच्या पुढे आहे. म्हणूनच जेंव्हा तो विराटच्या वयाचा होईल (32 वर्षे) किंवा विराटएवढे सामने (254) खेळलेला असेल तेंव्हा त्याचे हे आकडे काय असतील, हे सांगता येणे अवघड आहे.

आझम व कोहली तुलना (वन डे क्रिकेट)

खेळाडू – सामने – धावा – सरासरी – स्ट्राईक – शतके
कोहली – 20 – 759 – 54.21 – 83.49 – 2
आझम – 20 – 953 – 50.15 – 91.45 – 3

कोहली – 40 – 1479 – 46.21 – 82.48 – 4
आझम – 40 – 1779 – 52.32 – 84.63 – 7

कोहली – 60 – 2208 – 44.16 – 81.74 – 5
आझम – 60 – 2478 – 50.57 – 84.63 – 8

कोहली – 78 – 3001 – 46.16 – 83.63 – 8
आझम – 78 – 3683 – 56.66 – 88.15 – 13

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button