कोहली, मॕक्सवेल व डीविलियर्सला बाद करणारा हरप्रीत आहे तरी कोण?

Harpreet Brar - Maharashtra Today
Harpreet Brar - Maharashtra Today

आयपीएलच्या (IPL) एकाच सामन्यातून जो खेळाडू चर्चेत आलाय तो म्हणजे पंजाब किंग्जचा (Punjab Kings) फिरकी गोलंदाज हरप्रीत ब्रार (Harpreet Brar). याच्याआधी हे नाव कुणी ऐकलेसुद्धा नव्हते; कारण याच्याआधी खेळलेल्या तीन आयपीएल सामन्यात त्याच्या नावावर एकही विकेट नव्हती. यंदा तर त्याला एकही सामना खेळायला मिळालेला नव्हता; पण शुक्रवारी त्याला संधी मिळाली आणि एकाच सामन्यात विराट कोहली, ग्लेन मॕक्सवेल आणि एबी डीविलियर्ससारखे खंदे फलंदाज बाद करून तो एकदम प्रकाशझोतात आला. यापैकी कोहली व मॕक्सवेल यांना तर त्याने लागोपाठच्या चेंडूंवर बाद केले. त्याच्या या तीन दणक्यांनीच राॕयल चॕलेंजर्स बंगलोरचे कंबरडे मोडले.

त्याच्याआधी फलंदाजीतही त्याने १७ चेंडूंत २५ धावांचे योगदान दिले होते. हा २५ वर्षीय डावखुरा फिरकीपटू मूळचा पंजाबमधील मोगा गावचा. हरमनप्रीत कौर हीसुद्धा याच गावची. पंजाबसाठी बऱ्याच वयोगटाच्या स्पर्धा खेळल्यानंतर २०१९ मध्ये किंग्ज इलेव्हन पंजाबने त्याला आपल्या संघात घेतले. त्याच्या बालपणी एका क्रिकेट अकादमीची जाहिरात त्याने पाहिली. ती बघून त्याला क्रिकेटपटू बनण्याची इच्छा झाली. त्याच्या आईने सांगितले की, खेळायला हरकत नाही; पण मनापासून खेळणार असशील तरच! आई अशी म्हणाली याचे कारण हे की, ब्रार कुटुंबातील त्याची काही भावंडे क्रिकेट खेळत होती; पण आर्थिक अडचणीमुळे त्यांना सोडून द्यावे लागले. त्याचे नातेवाईकही म्हणायचे की, क्रिकेट खेळून काही फायदा नाही. सारी दुनियाच क्रिकेट खेळते. पण हरप्रीतने त्यांना चुकीचे ठरवले. क्रिकेट खेळला नसता तर कदाचित तो पंजाब पोलिसात असता. त्याचे वडील पंजाब पोलिसातच ड्रायव्हर होते.

नाही तर तो कॕनडात शिक्षणासाठी गेला असता. खरं तर तो कॕनडाला जाण्याच्या तयारीतच होता; कारण मुंबई इंडियन्ससाठी दोन वेळा आणि पंजाब किंग्जसाठी तीन-चार वेळा ट्रायल देऊनसुद्धा त्याची निवड होत नव्हती. पण २०१९ मध्ये पंजाब किंग्जने त्याला आपल्या संघात घेतले आणि हरप्रीतचे कॕनडाकडे जाणे रद्द झाले. गुरकिरतसिंगची त्याला या काळात फार मदत झाली. इतरांच्या जुन्या बॕट घेऊन किंवा बॕट थ्रेडिंग करून हरप्रीत खेळत राहिला. २०१८ च्या सी. के. नायडू ट्रॉफी स्पर्धेत ११ सामन्यांतच त्याने १६.४१ च्या सरासरीने ५६ बळी मिळवले आणि त्याने लक्ष वेधून घेतले. या कामगिरीने त्याला किंग्ज इलेव्हन पंजाबचे दरवाजे उघडून दिले. २०१९ मध्ये दिल्ली कॕपिटल्सविरुद्ध तो आयपीएल पदार्पणाचा सामना खेळला. आर. अश्विनने त्याचे मिस्टरी स्पिनर म्हणून वर्णन केले.

दोन सामन्यांत त्याला फक्त पाचच षटके गोलंदाजी मिळाली; पण यश मिळाले नाही. त्याच वर्षी सय्यद मुश्ताक अली स्पर्धेत त्याने पंजाबसाठी सर्वाधिक १४ विकेट काढल्या. त्यात दिनेश कार्तिक, देवदत्त पडीक्कल व पृथ्वी शॉ यासारखे फलंदाज त्याने बाद केले. गेल्या वर्षी त्याला आयपीएलचा एकच सामना मिळाला आणि त्यात शेन वाॕटसन व फाफ डू प्लेसिस यांनी त्याची धुलाई केली. त्यानंतर पुन्हा यंदाच्या मुश्ताक अली ट्रॉफी स्पर्धेत त्याने बळी सातच मिळवले; पण इकॉनाॕमी ५.७० ची राखली. आणि त्यानंतर आता पहिले सहा सामनेसुद्धा बेंचवर बसावल्यावर पंजाब किंग्जने त्याला शुक्रवारी संधी दिली आणि तो त्यांचा मॕचविनर ठरला. कोहली व मॕक्सवेल यांना त्याने लागोपाठच्या चेंडूवर बाद केले. पुढच्या षटकात त्याने एबी डीविलियर्सलाही टिपले.

या प्रकारे आधीच्या ११ षटकांत एकही बळी न मिळालेल्या या गोलंदाजाने फक्त सात चेंडूतच एकही धाव न देता कोहली, मॕक्सवेल व डीविलीयर्स यांना बाद करण्याची अविश्वसनीय कामगिरी बजावली. माझी पहिली आयपीएल विकेट ही विराट पाजींची ठरली हा माझ्यासाठी मोठा आनंदाचा क्षण ठरला. एकदा का विकेट मिळाली की मन:स्थिती बदलते, विश्वास वाढतो. माझ्याबाबतीतही तसेच झाले. अक्षरशः स्वप्नवत सगळे झाले, असे हरप्रीतने या कामगिरीबद्दल म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button