आयपीएलच्या विस्ताराला कोण आहे राजी आणि कुणाची आहे नाराजी?

BCCI - IPL

कोरोना (Corona) काळातही आयपीएल-२०२० च्या (IPL 2020) यशस्वी आयोजनानंतर पुढच्या आयपीएलची तयारी सुरू झाली आहे; मात्र २०२१ च्या स्पर्धेसाठी आयपीएलच्या स्वरू पात काही बदल होण्याची शक्यता आहे. यासंदर्भात जी चर्चा सुरू आहे त्यानुसार पुढच्या आयापीएलमध्ये नववा संघ येऊ शकतो आणि संघाने प्लेइंग इलेव्हनमध्ये अधिकाधिक चार परदेशी खेळाडू घेण्याचे बंधन सैल करून पाच खेळाडू खेळविण्याची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.

परदेशी खेळाडूंच्या संख्येवर निर्बंध असल्याने यंदाच्या आयपीएलमध्ये काही संघांच्या कामगिरीवर परिणाम झालेला दिसला. त्यांच्या उपलब्ध स्थानिक खेळाडूंमध्ये त्यांचा संघ व्यवस्थित जमू शकला नाही हे पाहता चारऐवजी पाच परदेशी खेळाडू खेळविण्याची परवानगी मिळावी असा विचार पुढे आला आहे. दुसरीकडे भारतीय क्रिकेट नियामक मंडळ (BCCI) संघ वाढविण्याच्या विचारात असले तरी विद्यमान फ्रँचाईजी त्याला अनुकूल नसल्याचे समजते.

जादा संघांचा समावेश म्हणजे अधिक मोठा लिलाव, त्यासाठी पूर्णपणे नव्याने तयारी व आखणी यासाठी फ्रँचाईजी तयार नाहीत; कारण कोरोनामुळे आता त्यासाठी त्यांच्याकडे फारसा वेळच नाही. आधीच यंदाची आयपीएल जवळपास सहा महिने,उशिराने संपली आहे आणि पुढची आयपीएल नेहमीप्रमाणे मार्च-एप्रिलमध्येच झाली तर फ्रँचाईजींकडे फारसा वेळच नसेल.

सध्याचे आयपीएलचे जे आर्थिक समीकरण आहे ते २०२३ पर्यंतसाठीचे आहे; पण त्यात जर आणखी एक-दोन संघांची भर पडली तर येणाऱ्या उत्पन्नाची विभागणी होऊन विद्यमान फ्रँचाईजींच्या उत्पन्नात घट होण्याची शक्यता आहे. याशिवाय अधिक संघ आले तर स्पर्धेचा दर्जा खालावेल की काय अशीही फ्रँचाईजींना भीती आहे. आता यंदाच काही संघांना खेळाडूंबद्दल अडचणी जाणवल्या. संघांची संख्या वाढली आणि केवळ चारच परदेशी खेळाडूंचे बंधन राहिले तर संघांना उपलब्ध भारतीय खेळाडूंमधून दर्जेदार संघ निवडायला अडचणी येऊ शकतात.

सद्य:स्थितीत मुंबईसारखा एखादा अपवाद वगळता इतर संघांना संघबांधणीत अडचणीच होत्या. सात ते आठ नियमित खेळाडूंभोवतीच संघ मर्यादित राहिले आणि तीन ते चार खेळाडू बदलत राहिले. अशा स्थितीत संघांची संख्या जर १० केली तर चांगले खेळाडू आणायचे कुठून ही समस्या जाणवू शकते.

आयपीएलचे मुख्य सूत्रच असे आहे की, फ्रँचाईजींची खर्चाची ऐपत कितीही असू दे, सर्वच संघांचा दर्जा साधारण सारखाच असावा. यालासुद्धा संघ वाढविल्यास धक्का पोहचेल असे फ्रँचाईजींना वाटते.

दरम्यान, अधिक परदेशी खेळाडूंना प्लेईंग इलेव्हनमध्ये परवानगी देण्याचा निर्णय योग्यच राहील असे मंडळाच्या एका पदाधिकाऱ्याने म्हटलेच आहे. हल्लीच्या चार खेळाडूंच्या बंधनामुळे काही संघांकडे चांगले परदेशी खेळाडू असूनही ते त्यांना खेळवू शकले नाहीत. त्यांना बेंचवरच बसावे लागले. मुंबईने यंदाच्या मोसमात तीन परदेशी खेळाडूंना एकही सामन्यात खेळवलेच नाही. अर्थात मुंबई इंडियन्सला त्यांची गरजसुद्धा भासली नाही.

दुसरीकडे, माजी कर्णधार व अनुभवी क्रिकेटपटू राहुल द्रविडने आयपीएलच्या विस्ताराचे समर्थन केले आहे. त्याच्या मते आयपीएलचा विस्तार झाला तर १९ वर्षाआतील होतकरू तरुण खेळाडूंना संधी मिळेल. द्रविडने तर टी-२० क्रिकेटचा ऑलिम्पिकमध्येही समावेश व्हायला हवा, असे मत व्यक्त केले आहे.

द्रविडच्या मते २००८ पासून आयपीएलने मोठ्या संख्येने गुणवान खेळाडू समोर आणले आहेत आणि आतासुद्धा नववा संघ खेळवायचा झाला तर आपल्याकडे भरपूर प्रतिभावान खेळाडू आहेत. त्यांना संधी मिळेल. द्रविड हे सध्या राष्ट्रीय क्रिकेट अकादमीचे प्रमुख असून त्यांना त्या माध्यमातून किती प्रतिभावान खेळाडू ‘वेटिंगवर’ आहेत याची कल्पना आहे. राजस्थान रॉयल्सचे यशस्वी जैस्वाल व कार्तिक त्यागी आणि किंग्ज इलेव्हनचा रवी विश्नोई हे ज्या पद्धतीने समोर आले आहेत त्यांचे उदाहरण त्यांनी दिले आहे. मात्र याच वेळी भारतीय क्रिकेटचा मर्यादित षटकांच्या क्रिकेटबाबत दर्जा पाहिजे तेवढा चांगला नसल्याच्या मतावर ते ठाम आहेत. मात्र आयपीएलच्या माध्यमातून युवा खेळाडूंना संधी देऊन तो सुधारता येईल. मुंबई इंडियन्सने तसाच युवा खेळाडूंना पुन्हा पुन्हा संधी देत बलाढ्य संघ घडवला आहे आणि त्यांच्या संघात युवा व अनुभवींचे योग्य मिश्रण असल्याचे द्रविड यांनी म्हटले आहे.

गुणवत्तेचाच विचार केला तर आपण आयपीएलचा निश्चितपणे विस्तार करू शकतो, असे त्यांनी स्पष्ट शब्दांत म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER