‘ठाकरे सरकारवर रिमोट कंट्रोल कोणाचा?’ या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले…

Sharad Pawar

पुणे :- ठाकरे सरकारवर रिमोट कंट्रोल कोणाचा, असा प्रश्न राजकीय वर्तुळात नेहमीच चर्चेत असतो. ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांनी नेमका हाच प्रश्न राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना विचारला. तुम्ही ठाकरे सरकारचे रिमोट कंट्रोल आहात, असे बोलले जाते. त्यावर पवार हसून म्हणाले की, मी काही या सरकारच्या दैनंदिन कामात लक्ष घालत नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नियंत्रणात हे सरकार काम करत आहे. आम्ही तीनही पक्ष हे एका सरकारचे घटक म्हणून काम करत आहे, असे पवार यांनी सांगितले. मी मात्र निसर्ग चक्रीवादळ असो की कोरोनासारखे संकट, त्यांच्या आपत्ती व्यवस्थापनात जरूर लक्ष घालतो, असेही आवर्जून सांगितले. पवार यांनी एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. यावेळी त्यांनी महाराष्ट्रातील कोरोना विषाणूमुळे निर्माण झालेल्या स्थितीवर भाष्य केले.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि तुमच्यात कोरोना लाॅकडाऊन शिथिल करण्याबाबत मतभेद होते का, या प्रश्नावर पवार म्हणाले की, त्यात थोडे तथ्य आहे. पण मुंबई, पुणे, ठाणे, सोलापूर आदी शहरे वगळून इतर ठिकाणी लाॅकडाऊन थोड्या प्रमाणात उठवावा, असे  मी सुचविले होते. त्यानुसार तसे घडलेले आहे. तीन पक्षांचे सरकार असूनही कोरोनाची परिस्थिती सक्षमपणे हाताळत आहे. काॅंग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांची साथ आणि पाठिंबा ठाकरे यांना आहे, असा निर्वाळा त्यांनी दिला.

ही बातमी पण वाचा :  शरद पवारांवर टीका पडळकरांना पडली महाग, धनगर समितीनेही उचलले कठोर पाऊल

राज्यात कोरोनाची स्थिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे उत्तमरीत्या हाताळत आहेत. आघाडीतील तीनही पक्षांमध्ये उत्तम समन्वय असून सरकार पाच वर्षांचा कार्यकाळ निश्‍चितपणे पूर्ण करेल, असा विश्‍वास त्यांनी यावर व्यक्त केला.`हे सरकार मतभेदांमुळे फार काळ चालणार नाही. सारे निर्णय नोकरशाही घेत आ हे, असा भाजप आरोप करत असल्याच्या प्रश्नावर पवार म्हणाले की, त्यांना मूर्खांच्या नंदनवनात राहायचे असेल तर राहू द्या. मात्र ठाकरे सरकार भक्कम आहे. ठाकरे सरकार पाच वर्षांचा कालावधी नक्की पूर्ण करेल. एवढेच नाही तर त्यानंतरच्या निवडणुकाही तीनही पक्ष एकत्रित लढवतील, असे पवार यांनी सांगितले.

देशावर चीनसारखे संकट असताना राजकारण करण्याची ही वेळ नाही. त्यामुळे कुणाचे काय चुकले, यावर चर्चा करण्यापेक्षा संकटाच्या या काळात सर्वांनी एकत्र येऊन सीमेवर लढणाऱ्या भारतीय सैनिकांच्या मागे खंबीरपणे उभे राहिले पाहिजे, असे मत पवार यांनी व्यक्त केले. चीनच्या प्रश्‍नावर चर्चा करण्यासाठी शक्‍य होईल तेवढ्या लवकर सरकारने संसदेचे विशेष अधिवेशन बोलविण्याची मागणी त्यांनी यावेळी केली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER