धनंजय मुंडे पुन्हा अडचणीत आले कुणामुळे?

Dhananjay Munde

मुंबई : राज्याचे सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांच्यावर लिव्ह इन मध्ये राहणाऱ्या महिलेच्या बहिणीने बलात्काराचे आरोप केले आणि नंतर मागे घेतले व बराच गदारोळ होऊन प्रकरण शांत झाले असे वाटत असतानाच लिव्ह इनमधील महिलेने आता त्यांच्याविरोधात गंभीर आरोप केल्याने प्रकरण पुन्हा तापणार असे दिसते. धनंजय यांना अडचणीत आणण्यामागे नेमके कोण याची चर्चा आता नव्याने सुरू झाली आहे.

धनंजय मुंडे यांच्याविरुद्ध बलात्काराचे आरोप झाल्यानंतर महाराष्ट्रात प्रचंड खळबळ उडाली होती. भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली होती. प्रसिद्धी माध्यमांमधून मुंडे यांच्यावर टीकेची झोड उठवण्यात आली आणि त्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली होती.धनंजय मुंडे कुठल्याही क्षणी राजीनामा देतील अशी परिस्थिती होती मात्र त्यातच बलात्काराचा आरोप करणाऱ्या महिलेवर तिघांनी आम्हाला तिने ब्लॅकमेल केले असे आरोप केले आणि प्रकरणाला वेगळी दिशा मिळाली.या तक्रारींचा आधार घेत धनंजय मुंडे यांचा बचाव करण्यात आला. मुंडे हे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांच्या अत्यंत निकटवर्ती मानले जातात पक्षांतर्गत मुंडे यांच्या राजीनाम्याचा विषय आला तेव्हा अजित पवार त्यांच्या बचावासाठी धावले असे म्हटले जाते. धनंजय मुंडे यांच्यावरील आरोप गंभीर स्वरूपाचे आहेत पक्षातील नेत्यांशी चर्चा करून आपण त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घेऊ असे पक्षाचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी जाहीर केले. मात्र दुसर्‍या दिवशी त्यांनी धनंजय यांनी राजीनामा देण्याची गरज नाही अशी भूमिका घेतली होती. त्यातच आरोप करणाऱ्या महिलेने तिची तक्रार मागे घेतली आणि सर्व धुराळा खाली बसला धनंजय यांना अभय मिळाले, आता सगळे प्रकरण मिटले असे वातावरण असताना लिव्ह-इनमधील महिलेने त्यांच्यावर आरोप करणारे पत्र मुंबईच्या पोलीस आयुक्तांना बुधवारी दिले.

धनंजय मुंडेंनी ज्या महिलेसोबत सबंध असल्याचे मान्य केले होते त्या करुणा शर्मा यांनीच आता मुंडे यांच्याविरोधात कौटुंबिक हिंसाचाराची तक्रार केली आहे. सोशल मिडियावर तक्रारीचे पत्र व्हायरल झाल्यानंतर आता करुण शर्मा यांनी बातमी सध्या न चालवण्याची विनंती केली आहे. करुणा शर्मा या रेणू शर्मा यांच्या बहीण आहेत. करुणा शर्मा यांच्यासोबत आपले संबंध असून त्यांच्यापासून दोन मुले झाल्याची कबुली धनंजय मुंडे यांनी याआधीच दिली आहे. तसेच करुणा शर्मा (Karuna Sharma) यांची मुले आपल्यासोबतच राहत असल्याचेही त्यांनी सांगितले होते.

त्याच करूणा शर्मा यांनी आता मुंबईच्या पोलीस आयुक्तांकडे धनंजय मुंडे यांच्याविरोधात गंभीर आरोप केले आहेत. धनंजय मुंडे यांनी आपल्या दोन्ही मुलांना त्यांच्या चित्रकूट बंगल्याच्या मागच्या खोलीत 3 महिन्यांपासून कोंडून ठेवल्याचा आरोप त्यांनी पोलीस आयुक्तांना लिहिलेल्या पत्रात केला आहे. आपल्याला मुलांना भेट दिले जात नसल्याचा आरोपही त्यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांच्यावर बलात्कार, घरगुती हिंसाचार आणि इतर कलमार्गत गुन्हा दाखल करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

धनंजय मुंडे काय म्हणतात

या तक्रारी बाबत धनंजय मुंडे यांनी बुधवारी रात्री एक खुलासा जारी केला. त्यात त्यांनी म्हटले आहे की करुणा शर्मा यांचे बाबतीत मी पूर्वीच खुलासा केला आहे. त्यांच्यासोबत असलेल्या विवादात मी स्वतःहून उच्य न्यायालयात याचिका दाखल केली असून त्याबाबतीत सदर खुलाशात सविस्तर नमुद केले आहे. सदर याचिकेत उच्च न्यायालयाने  करुणा शर्मा यांना मनाई आदेशही दिला आहे. त्यानंतर विवादावर तोडगा काढण्यासाठी दोघांनी सहमतीने मेडिएटर नेमण्याची विनंती केल्यावरून उच्च न्यायालयाने  मद्रास उच्य न्यायालयाच्या निवृत्त मुख्य न्यायाधीश  ताहिलरामानी यांची मेडिएटर म्हणुन नियुक्तीसुद्धा केली आहे.

सदर मेडिएशनच्या दोन बैठक झालेल्या असून १३ फेब्रुवारी रोजी पुढील बैठक निश्चित झालेली आहे. या मेडिएशनमध्ये मुलांच्या संदर्भातील सर्व विवादासह इतर  सर्व मुद्दे चर्चेत व निर्णयार्थ आहेत.

असे असताना आणि सहमतीने

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार अतिवरिष्ठ न्यायिक अधिकाऱ्यांसमोर मेडिएशनची प्रक्रिया सुरु असताना अश्याप्रकारे मुलांच्या ताब्यावरून तक्रार करणे हेतूबद्दल शंका निर्माण करणारे आहे.

मुळात जो मुद्दा मेडिएशनमध्ये चर्चेत आहे त्याबद्दल जाहीर मागणी करणे म्हणजे समोरच्या विरोधी पक्षास न्यायिक प्रक्रियेत काहीही रस नसून निव्वळ मीडिया ट्रायल चालवून बदनामी करणे हाच हेतू दिसून येते. ही बाब न्यायप्रविष्ठ असून न्यायालयीन प्रक्रियेअंती जो निर्णय होईल तो सर्वांवर बंधनकारकच असणार आहे. यामुळे याप्रकरणात निव्वळ बदनामी करण्याच्या हेतुने करण्यात येत असलेल्या अशा आरोपात काहीही तथ्य नाही.कृपया ही वस्तुस्थिती व न्यायालयीन प्रकरण व एखाद्याच्या व्यक्तिगत आयुष्यातील बाब लक्षात घेऊन वृत्त देताना सामाजिक जीवनातील व्यक्तीची बदनामी होणार नाही याची काळजी असे धनंजय मुंडे यांनी म्हटले आहे.

प्रकरण पुन्हा पेटणार का?

राजकीय जाणकारांच्या मते धनंजय मुंडे यांच्या बाबतचे हे प्रकरण पुन्हा हा पेटण्याची शक्यता आहे. त्यांचे राजकीय जीवन संपवण्याची इच्छा बाळगणारे काही लोक आता नव्याने झालेल्या आरोपांचा आधार घेत त्यांची कोंडी करण्याची शक्यता आहे त्यात काही लोक बाहेरचे तर काही आतलेदेखील असू शकतात. धनंजय मुंडे प्रकरण पेटत राहावे अशी रणनीती आपली जात आहे त्यामागे वरदहस्त कोणाचा, मुंडे कोणाला नको आहेत याबाबतची चर्चादेखील होत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER