राज ठाकरे, नारायण राणे यांच्यापैकी सर्वांत जास्त राग कोणाचा येतो? आदित्य ठाकरेंचे उत्तर वाचून व्हाल थक्क

मुंबई :- संगमनेरच्या अमृतवाहिनी महाविद्यालयात ‘संवाद तरुणाईशी’ नावाचा युवा सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमात प्रसिद्ध पार्श्वगायक अवधूत गुप्ते यांनी पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे, राज्यमंत्री आदिती तटकरे, आमदार रोहित पवार, धीरज देशमुख, ऋतुराज पाटील, झिशान सिद्दिकी या युवा नेत्यांची मुलाखत झाली.  या मुलाखतीत राजकीय प्रश्नांसोबतच काही वैयक्तिक प्रश्नही विचारण्यात आलेत.

गायक अवधूत गुप्ते यांनी आदित्य ठाकरेंना प्रश्न केला, सर्वांत जास्त राग कोणाचा येतो, राज ठाकरे की नारायण राणे? यावर आदित्य ठाकरेंनी दिलेले उत्तर थक्क करणारे आहे.

आदित्य म्हणाले, “तुम्ही माझ्या वडिलांच्या मुंबई महापालिकांच्या निवडणुकांनंतरच्या मुलाखती बघितल्या असतील किंवा विधानसभा निवडणुकीचा निकाल समोर आल्यानंतर बघितलं असेल तर, प्रत्येक पत्रकार परिषदेत त्यांना अशा प्रकारचा प्रश्न विचारला गेला. राणे – राज ठाकरेंसंदर्भात अजूनही असे प्रश्न विचारले जातात. तेव्हा ते म्हणतात की, सबको माफ कर दिया. आता माफ करण्याइतपत मी मोठा नाही. परंतु, नेहमी काही तरी घडामोडी घडतच असतात. म्हणून मी नेहमीच लक्षात ठेवलेलं असतं की राग कुणाचाही धरायचा नसतो.

जेव्हा आपण लोकांची मदत करण्याची शपथ घेतो तेव्हा कोणताही भेदभाव न करता आपण मदत करत असतो आणि लोकांची सेवा करत असतो. राग, द्वेष मनात धरून तुम्ही कुठे जाऊ शकत नाहीत. मग ते तुमच्या चेहऱ्यावर दिसायला लागतं. तुमच्या अंगाच्या हालचालींवरून दिसायला लागतं. तुमच्या डोळ्यांमध्ये तो राग दिसायला लागतो. मग तुम्ही डोळे चुकवायला बघतात. तुम्ही जे काही कराल ते स्वच्छ मनाने करा. तुमच्यासोबत त्या माणसानं कसंही वागलं असेल तरी तुमचं मन साफ ठेवा. जगात घाबरण्याची गरज नाही.”

आदित्य ठाकरेंच्या या उत्तराचे राजकीय वर्तुळात कौतुक होत आहे.