भामा-आसखेड नक्की कुणाला पाणी पाजणार?

Shailendra Paranjapeपुण्यामध्ये नवी २३ गावं समाविष्ट होत असतानाच अनेक वर्षे पाण्यासाठी वंचित राहाव्या लागलेल्या पूर्व पुण्यातल्या नागरिकांसाठीही नववर्षाला शुभवर्तमान आले. ते म्हणजे बहुप्रतीक्षित भामा-आसखेड धरणातले पाणी पूर्व पुण्यासाठी मिळणार. भल्या पहाटे एकत्र जाऊन मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन संपूर्ण राज्याला धक्का देणारे देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि अजित पवार (Ajit Pawar) एकत्र आले आणि त्यांनी या भामा-आसखेडच्या प्रकल्पाचे शुक्रवारी लोकार्पण केले. त्यामुळे नवे वर्ष पुणेकरांसाठी शुभवर्तमानांचे ठरले आहे.

पुणे शहराला पाणीपुरवठ्यासाठी पानशेत, वरसगाव, खडकवासला आणि टेमघर ही चार धरणं आहेत; पण पुण्याचा महानगरासारखा होत असलेला विस्तार आणि याच धरणांमधून पुण्याच्या पुढच्या दौंड-इंदापूरसह सोलापूरपर्यंतच्या गावांना शेतीसाठी आवश्यक असलेला पाणी पुरवठा, याची सोयही करावी लागते. त्यातून शेतीसाठी कालव्यामधून आवश्यक ती आवर्तने सोडली जातात आणि पुण्यासाठी लागणारे पाणीही पुरवले जाते. नव्या धरणामुळे एकूण तीसेक टीएमसी साठवणक्षमता आणि पुण्याची गरज १८-१९ टीएमसी असा हिशेब आहे. त्यात नव्या समाविष्ट गावांमुळे पाच-साडेपाच लाख लोकसंख्येची भर पडणार आहे. त्यामुळे ही गरज वीसेक टीएमसीपर्यंत जाईल.

खेड तालुक्यात भामा नदीवर असलेललं भामा-आसखेड धरण पुण्यापासून ४० किलोमीटरवर आहे आणि महापालिकेने पालिकेच्या हद्दीबाहेर ६० ते ७० टक्के काम केलेले हे पहिलेच धरण असावे. पूर्व पुण्यातल्या येरवडा, खराडी, धानोरी, विश्रांतवाडी, कळस, वडगाव शेरी अशा भागांमध्ये पाण्यासाठी दाहीदिशा ही अवस्था आता नक्कीच बदलेल. १० ते १५ लाख नागरिकांना या धरणामुळे पाणी पुरवठा होणार आहे. भामा आसखेड धरणाची चर्चा गेली दहाहून अधिक वर्षे सुरू आहे. इतर सर्वच पाटबंधारे प्रकल्पांप्रमाणेच हाही प्रकल्प रेंगाळलेले प्रकल्प या प्रकारचाच होता. मात्र, मागच्या सरकारमध्ये म्हजेच माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यकाळात या प्रकल्पाला गती मिळाली आणि सहा वर्षे उशिराने का हाईना, पण प्रकल्प पुरा झालाय. अर्थात, प्रकल्पबाधितांचे पुनर्वसन आणि त्यांच्या भरपाईचे प्रश्न याही प्रकल्पाने पाहिले आहेत. तेही विलंबाचे एक कारण होतेच.

अखेर हा प्रकल्प लोकार्पण झालाय; पण तो होताना महापालिकेत सत्तारूढ असलेला भारतीय जनता पक्ष आणि राज्यात सत्तेत तर पुण्यात सत्तेबाहेर असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी या प्रकल्पाच्या श्रेयावरून जोरदार घोषणाबाजी केली. त्यातून विकासाच्या प्रश्नातच राजकारण असते, हेही त्यांनी सिद्ध केले. विशेष म्हणजे पुण्याचे खासदार गिरीश बापट यांच्या समर्थनाच्या जोरदार घोषणा कार्यक्रमस्थळी दिल्या जात असताना बापट मात्र या कार्यक्रमाला उपस्थित नव्हते. काँग्रेसनं तर या कार्यक्रमावर बहिष्कार टाकला होता. त्यामुळे पवार फडणवीस एकत्र व्यासपीठावर असताना कॉंग्रेसचे नगरसेवक मात्र महापालिकेकडे फिरकले नव्हते. राजकारणाची खरी गंमत तर हीच आहे की, ते करताना आम्ही राजकारण करत नाही, असंच म्हणायचं असतं.

मुळात सत्तेवर यायचं कशासाठी तर लोकांचा विकास करायला. मग दुसऱ्याने तो केला नाही असं म्हणत सत्तेवर यायचं तर विकास प्रकल्पात राजकारण आणायचे नाही म्हणजे नेमके काय करायचे… तर बोलायचे एक आणि करायचे दुसरेच, हा राजकारण्यांचा स्थायिभाव. त्यामुळे आम्ही राजकारण करत नाही, असं कोणी सांगितलं तर ते शब्द बापुडे केवळ वारा, म्हणून घ्यायचं असतं, हेच खरं. व्यासपीठावर अजित पवार आणि फडणवीस तुझ्या गळा माझ्या गळा असं म्हणत असले तरी सभागृहाबाहेर पुण्याची ताकद गिरीश बापट, या घोषणा किंवा दादा दादा या घोषणा, हेही एक वास्तव होते.

राजकारणात वावरणाऱ्या लोकांनी कधीच कोणाशीही ३६ चा आकडा करू नये, असं शरद पवार नेहमी म्हणायचे. त्याची प्रचितीच शुक्रवारी पुण्यात आली. अजित पवारांना काकांचे म्हणणे नक्कीच माहीत असणार. त्यामुळे शुक्रवारच्या घटनांचा अर्थ पक्षांतर्गत राजकारणापासून ते खिरीत मीठ टाकण्यापर्यंत आणि नववर्षांच्या सुरुवातीलाच नव्या समीकरणांची वेळ अजूनही गेलेली नाही तर ती समीकरणे सुयोग्य वेळेच्या प्रतीक्षेत आहेत, हेच सिद्ध करणारा आहे.

शैलेंद्र परांजपे

Disclaimer:-‘संपादकीय’ लिहिणारे हे ज्येष्ठ पत्रकार असून त्यांचे स्वतंत्र मत आहे. त्यांच्या लेखासोबत ‘महाराष्ट्र टुडे’चा कसलाही संबंध नाही. आम्ही केवळ त्यांचे मत मांडण्याचा प्रयत्न आमच्या माध्यमातून करत आहोत.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER