मराठा आरक्षण कुणाला नको?, मंत्र्यांची नावे तर जाहीर करा – अशोक चव्हाण

Ashok Chavan

मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाला (Maratha Reservation) अंतरिम स्थगिती दिल्यानंतर विरोधकांकडून महाविकास आघाडी सरकारवर अनेक आरोप केल्या जात आहे. सरकारमध्ये असलेल्या काही मंत्र्यांना मराठा आरक्षण नको, असा आरोप भाजपचे (BJP) प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) यांनी केला. यावर आत मराठा आरक्षण समन्वय समितीची अध्यक्ष आणि मंत्री अशोक चव्हाण (Ashok Chavan) यांनी थेट चंद्रकांत पाटील यांना आव्हान दिले आहे.

प्रसारमाध्यमांशी बोलताना अशोक चव्हाण यांनी चंद्रकांत पाटील यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले. मराठा आरक्षण कुणला नकोय? त्यांची नावं चंद्रकांत पाटील यांनी स्पष्ट केली पाहिजे. रोज मतमतांतरे होण्यापेक्षा सकल मराठा समाजाचा एकच आवाज आला पाहिजे. रोज वेगवेगळी विधाने करून गोंधळ निर्माण केला जात आहे, असा आरोपही चव्हाण यांनी केला.

बडे मराठा नेतेच आरक्षण विरोधी आहेत, हे मी गेल्या अनेक वर्षांपासून सांगत आलो आहे, असा गौप्यस्फोट चंद्रकांत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन केला होता. गेली १५ वर्षे राज्यात काँग्रेस-राष्ट्रवादीची क्लिअरकट सत्ता होती. मग मराठा समाजाला का नाही आरक्षण दिलं?, असा सवाल करतानाच मराठा समाजाला आरक्षण दिल्याने त्यांच्या पुढे बॅकवर्ड हा शब्द लागेल. तेच मराठा नेत्यांना नको आहे. त्यांच्या मनात आपण फॉरवर्ड असल्याची भावना असून या भावनेला धक्का बसू नये असं त्यांना वाटतं. पण आता मराठा समाजाच्या प्रगतीसाठी या नेत्यांनी फॉरवर्ड आणि बॅकवर्ड कपाटात ठेवावं, असा टोलाही त्यांनी लगावला होता. या पार्श्वभूमीवर चव्हाण यांनी पाटील यांना हे आव्हान दिलं आहे.

दरम्यान, चव्हाण यांनी आज राष्ट्रवादीचे (NCP) सर्वेसर्वा शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेऊन त्यांच्याशी मराठा आरक्षणासंदर्भात बैठक घेतली. या बैठकीला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील उपस्थितीत होते. “मराठा आरक्षणाबाबत काही कायदेशीर मुद्दे आहेत. त्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंबरोबर चर्चा झाली होती. त्याची माहिती शरद पवारांना दिली,” अशी प्रतिक्रिया चव्हाण यांनी या बैठकीनंतर दिली.

यावेळी त्यांनी कृषीविधेयकावरही आपली प्रतिक्रिया व्यक्त केली. केंद्र सरकारने मांडलेल्या कृषी विधेयकामुळे शेतकऱ्यांची गळचेपी होतं आहे. मध्यस्थांचा फायदा होतो आहे. याला काँग्रेसचा विरोधचं आहे. पण शिवसेना आणि राष्ट्रवादीने सभात्याग का केला ते त्यांनाच विचारा. राज्यात आम्ही एकत्र आहोत, केंद्रांतही एकत्र असायला हवं होतं. शेतकरी हितासाठी काँग्रेस लढत आहे, तिथे सगळ्यांनी एकत्र येऊन शेतकर्‍यांचे हात मजबूत केले पाहिजेत, असं त्यांनी सांगितलं.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER