संभाव्य सरकारमध्ये उद्धव ठाकरे मुखयमंत्री तर, अजित पवार उपमुख्यमंत्री?

Ajit Pawar-Uddhav Thackeray

मुंबई : राज्यातील सत्तास्थापनेसाठी भाजपाने असमर्थता दाखविल्यानंतर शिवसेनेची सत्तास्थापनेसाठी हालचाली सुरु झाल्या आहेत. बहुमताचा आकडा गाठण्यासाठी शिवसेनेला काँग्रेस-राष्ट्रवादीच्या पाठिंब्याची गरज भासणार आहे. त्यामुळे शिवसेना आघाडीच्या पाठिंब्यावर राज्यात मुख्यमंत्रिपद बसविणार हे जवळपास निश्चित झालं आहे पण यासाठी काँग्रेस-राष्ट्रवादी कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.

ही बातमी पण वाचा:– अखेर शिवसेना ‘एनडीए’तून बाहेर; अरविंद सावंत आज मंत्रीपदाचा राजीनामा देणार 

शिवसेनेने आज सत्तास्थापनेचा दावा सादर करणार असल्याची माहिती पुढे येत आहे. तर त्यांचे मुख्यमंत्री कोण असतील? स्वत: पक्षप्रमुख उद्धव ठाकरे, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे की ‘ठाणे’दार एकनाथ शिंदे या बाबतची चर्चा आता जोरात सुरू झाली आहे. तर दुसरीकडे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार हे उपमुख्यमंत्री असतील अशी माहिती पुढे येत आहे.

मला एक ना एक दिवस शिवसैनिकाला मुख्यमंत्रिपदाच्या खुर्चीत बसवायचे आहे आणि तसा शब्द मी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना दिलेला होता, असे उद्धव हे सातत्याने सांगत आले आहेत. आता शिवसैनिकाला मुख्यमंत्री करण्याची ‘हीच ती वेळ’ असे बोलले जात आहे. शिवसैनिकाला मुख्यमंत्री करणार म्हणजे कोणाला हे त्यांनी स्पष्ट केलेले नव्हते. उद्धव जसे पक्षप्रमुख आहेत तसेच ते काय किंवा आदित्य काय हेदेखील पहिल्या प्रथम शिवसैनिकच आहेत. त्यामुळे मुख्यमंत्रिपदासाठी त्यांच्यापैकी कोणतरी असावे अशी सामान्य शिवसैनिकांची भावना असल्याचे एका शिवसेना नेत्याने बोलून दाखविले.

तर दुसरीकडे, माजी उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे विधीमंडळ गटनेते अजित पवार यांच्या निर्णयाकडे असणार आहे. कारण राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या केलेलं पत्र अजित पवार यांच्याकडे सोपवलं आहे. राष्ट्रवादीचे गटनेते ज्या पक्षाला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतील तो निर्णय आम्हाला मान्य असेल अशा आशयाच्या पत्रावर राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांनी सह्या केल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.