साखर दरवाढीचा फायदा कोणाला?- हसन मुश्रीफ

Hasan Mushrif

कोल्हापूर : केंद्र सरकारने साखरेच्या किमान विक्री दरात दोन रुपयांची वाढ केली. साखरेची दरवाढ स्वागतार्ह आहे. मात्र, या निर्णयाची अंमलबजावणी १ ऑक्टोबरपासून होणार असल्याने व्यापाऱ्यांचाच फायदा होणार असल्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ (Hassan Mushrif) यांनी रविवारी पत्रकाद्वारे स्पष्ट केले. केंद्राच्या निर्णयामुळे साखरेचा दर ३१०० रु. प्रतिक्विंटलवरून ३३०० रुपये होईल. साखर कारखाने प्रतिटन ४०० ते ५०० रुपयांचे नुकसान सोसत असल्याने दर ३५०० प्रतिक्विंटल असणे आवश्यक होते.

अतिरिक्त कर्ज व व्याजामुळेच कारखानदारी अडचणीत आहे. साखर दरवाढीस मंत्रिमंडळाची मान्यता नाही. तत्पूर्वीच निर्णय बाहेर आल्याने व्यापाऱ्यांचाच फायदा होणार आहे. ऑक्टोबरपर्यंत कारखान्यांना साखरेचा कोटा विकावा लागेल. कारण त्यांना तोडणी -वाहतूक, कारखान्याची मेन्टेनन्सची कामेही अत्यावश्यक आहेत. त्याशिवाय नाही विकली तर व्याजाचा भुर्दंड बसणार आहे. या खर्चासाठी कारखान्यांना साखर ३१०० रुपयेच विकावी लागेल. व्यापारी ती घेतील व १ ऑक्टोबरपासून विकतील. त्यामुळे व्यापाऱ्यांच्या फायद्यासाठीच निर्णय जाहीर केला की काय? असा सवालही मुश्रीफ यांनी पत्रकाद्वारे केला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी साखर कारखानदारांना घेऊन मंत्रिमंडळ उपसमितीचे अध्यक्ष व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन सविस्तर चर्चा केली. बफरस्टॉकची मुदत जुलै २०२० असून ती वाढवणे, साखरेचे एक्सपोर्ट धोरण ठरविणे, इथेनॉल, एक्सपोर्ट अनुदान व बफर स्टॉकचे व्याज कारखान्याना परत देणे, कारखान्यांना तोटा भरून काढण्यासाठी प्रतिटन ६०० रुपये अनुदान देणे. कारखान्याच्या कर्जाचे पुनर्गठन आदी मुद्यांवर या बैठकीत चर्चा झाल्याचे समजते. यंदा उसाचे बंपर उत्पादन होणार आहे, साखर व्यवसाय अडचणीमध्ये आहे. त्यातील अनेक प्रश्नांवर सकारात्मक निर्णय झाल्यास भाजप साखर कारखानदारांना धन्यवाद देईल, असेही मुश्रीफ यांनी म्हटले आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER