
वेस्ली माधेवेरे (Wesley Madhevere) ..झिम्बाब्वेचा (Zimbabwe) हा अष्टपैलू खेळाडू! ह्या गड्याने कसोटी क्रिकेटमध्ये अजून भोपळासुध्दा फोडलेला नाही पण तरीसुध्दा कसोटी क्रिकेटच्या इतिहासात एक वेगळा विक्रम करणारा तो केवळ दुसराच फलंदाज ठरलाय. एकही धाव केलेली नाही तरी कसोटी क्रिकेटच्या विक्रमांमध्ये त्याला स्थान मिळालेय हे कसे काय? तर ह्या 20 वर्षीय खेळाडूने आतापर्यंत कसोटी क्रिकेटमध्ये केवळ दोनच डाव फलंदाजी केली आहे आणि योगायोगाने दोन्ही डावात तो अगदी पहिल्याच चेंडूवर बाद झाला आहे. कसोटी क्रिकेटची सुरुवात अशा गोल्डन डकच्या (Golden Duck) चष्म्यासह करणारा तो केवळ दुसराच फलंदाज आहे.
अफगणिस्तानविरुध्द (Afghanistan) पहिल्या कसोटीत अबुधाबीला आमीर हमजाने त्याला पहिल्याच चेंडूवर पायचीत बाद केले. यानंतर दुसऱ्या कसोटीतही वेस्ली माधवेरे पहिल्याच चेंडूवर बाद झाला.यावेळी सय्यद शिरझाद याने त्याला अफसर झझाईकडून झेलबाद केले. याप्रकारे कसोटी क्रिकेटच्या आपल्या पहिल्या दोन डावात वेस्ली माधवेरे अगदी पहिल्याच चेंडूवर बाद झाला.
अद्भुत, आश्चर्यजनक आणि अविश्वसनीय खरेच पण त्याहून आश्चर्याची बाब म्हणजे असे स्पेशल गोल्डन डक मिळवणारा तो काही पहिलाच फलंदाज नाही.
त्याच्याआधीसुध्दा एक गडी असाच आपल्या पहिल्या दोन डावात पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता. तो म्हणजे दक्षिण आफ्रिकेचा (South Africa) टॉमी वार्ड (Tommy Ward) . आणि कधी तो असा बाद झाला तर फार फार वर्षांपूर्वी म्हणजे अगदी 1912 च्या मँचेस्टर कसोटीत. वार्डला आॕस्ट्रेलियाच्या जिमी मॕथ्थ्यूज (Jimmy Matthews) याच गोलंदाजाने दोन्ही डावात अगदी पहिल्याच चेंडूवर बाद केले होते.
आता योगायोगाचा भाग…टाॕमी वार्ड व वेस्ली माधेवेरे हे दोन्ही आपल्या पहिल्या दोन कसोटी डावात अगदी पहिल्याच चेंडूवर बाद झाले. आणि योगायोगाने दोघेही पहिल्यांदा पायचीत आणि दुसऱ्यांदा झेलबाद अशा सारख्याच पध्दतीने बाद झाले. आणखी वैशिष्ट्यपूर्ण बाब ही की टाॕमी वार्ड जेंव्हा बाद झाला तेंव्हा दोन्ही डावात प्रत्येक वेळी जिम्मी मॕथ्यूज नावाच्या आॕस्ट्रेलियन गोलंदाजाने हॕट्ट्रिक केली होती आणि या दोन्ही हॕट्ट्रिक पूर्ण करणारा म्हणजे बाद होणारा तिसरा गडी टॉमी वार्डच होता.
याप्रकारे ‘गोल्डन डक’चा चष्मा मिळवलेला वार्ड हा आतापर्यंत एकमेव होता पण आता वेस्ली माधवेरेची त्याला कंपनी मिळाली आहे.
या कंपनीत पाकिस्तानी फलंदाज उमर गुलसुध्दा आला होता. कसोटी पदार्पणातील पहिल्याच डावात तो एकही चेंडूचा सामना न करताच धावबाद झाला होता आणि दुसऱ्या डावातही तो पहिल्याच चेंडूवर बाद झाला होता पण पहिल्या डावात धावबाद झाल्याने तो या पंक्तीत आला नाही.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला