मंत्रिमंडळाचे निर्णय बदलण्याचे अधिकार मुख्य सचिवांना कुणी दिलेत? जयंत पाटलांचा संताप अनावर

Jayant Patil - Maharashtra Today

मुंबई :- मंत्रिमंडळाचे निर्णय बदलण्याचे अधिकार मुख्य सचिवांना कुणी दिलेत? असा सवाल राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील (Jayant Patil) यांनी उपस्थित केला आहे. राज्याच्या कॅबिनेटमध्ये एखादा निर्णय झाला असेल तर तो निर्णय बदलण्याचा अधिकार कुणालाच नाही. मग ते मुख्य सचिव असले म्हणून काय झाले? आम्ही एवढी वर्षे राजकारणात आहोत. मंत्रिमंडळ म्हणून काही आमचे अधिकार आहेत की नाहीत? जर उच्चाधिकार समिती ही मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमलेली असताना अतिरिक्त मुख्य सचिवांच्या खांद्यावर जबाबदारी झटकून टाकता येणार नाही. कोरोनाच्या काळात तात्काळ खरेदी करण्यासाठी जर समिती मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली नेमली असेल तर मागील आठवड्यात याबाबत किती बैठका झाल्या? असा सवाल पाटील यांनी उपस्थित केल्याने मंत्री, अधिकारी आणि वर्षावरून मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित असलेले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) हे सर्वच अवाक झाले.

जयंत पाटील हे मुख्यमंत्र्यांप्रमाणेच शांत, संयमी आणि कुणालाही न दुखावता आपले वा खात्याचे काम करण्यात वर्षानुवर्षे हातखंडा. मात्र, शांत असणार्‍या जयंतरावांना झाले काय असा प्रश्न उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar), राष्ट्रवादीचे सर्व मंत्री यांना पडला. तर जलसंपदामंत्री जयंत पाटील यांचा पारा चढण्याचे कारण काय हे काही मिनिटे मुख्यमंत्र्यांनाही कळले नाही. त्यामुळे कॅबिनेटच्या २८ एप्रिलच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीची सुरुवातच काहीशी वादळी झाल्याची माहिती एका वरिष्ठ मंत्र्याने दिली.

२८ एप्रिलची बैठक सुरू होताच मुख्य सचिवांकडून मागील बैठकीचे इतिवृत्तांत वाचून दाखवायला सुरुवात झाली तेव्हा जलसंपदामंत्री असलेल्या जयंत पाटील यांनी मुख्य सचिव असलेल्या सीताराम कुंटेंना विचारणा केली की आपण उच्चाधिकार समितीचे अध्यक्ष असताना मागील आठवड्यात आरोग्य सेवा सुधारण्यासाठी आवश्यक असलेल्या ऑक्सिजन प्लान्ट, रेमडेसिवीरच्या तुटवड्याबाबत किती बैठका घेतल्या याची माहिती आम्हाला मिळेल का? यावर कुंटे यांनी अतिरिक्त मुख्य सचिव वित्त मनोज सौनिक यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली असून, मदत पुनर्वसन विभागाचे प्रधान सचिव असीम गुप्ता आणि आरोग्य खात्याचे प्रधान सचिव डॉ. प्रदीप व्यास हे या समितीचे सदस्य असल्याचे सांगताच मंत्री पाटील प्रचंड संतापले आणि कॅबिनेटचे वातावरण गंभीर झाले.

मुख्य सचिव यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा कॅबिनेटचा निर्णय झालेला असताना आपण परस्पर अतिरिक्त मुख्य सचिव वित्त यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली कशी? आपणाला कुणी अधिकार दिला? अशी प्रश्नांची सरबत्ती सुरू झाल्यावर उपमुख्यमंत्री असलेल्या अजित पवार यांच्यासह अनेक मंत्र्यांना नेमके काय झाले याची कल्पनाच येईना. आरोग्य विभागात कोणताही निर्णय वेळेवर होत नाही, लोकांचे जीव जाताहेत तरी आपण कामाची गती वाढवणार आहोत की नाही, असे म्हणत आम्ही एवढी वर्षे मंत्रिमंडळात आहोत पण असे कधी झाले नाही सांगत आपली नाराजी बोलून दाखवली.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला

MT LIKE OUR PAGE FOOTER

MT google button