
शिवसेनेचे ठाण्यातील आमदार प्रताप सरनाईक हे मंगळवारी अचानक चर्चेत आले. सकाळी सकाळी अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) त्यांच्या कार्यालयावर छापे टाकले. त्यांच्या काही कथित आर्थिक गैरव्यवहारांची माहिती घेण्यासाठी हे छापे होते असे म्हटले जाते. या छाप्यांमुळे एकच खळबळ उडाली. टीव्ही चॅनेल्सनी बातम्या सुरू केल्या की सरनाईक हे आणि त्यांचे एक चिरंजीव पूर्वेश व पूर्वेशची पत्नी हे सगळे विदेशात आहेत. त्यांचे दुसरे पुत्र विहंग यांना ईडीने ताब्यात घेतले आणि चौकशी सुरू केली. वस्तुत: दुपारपर्यंत हे तथ्य समोर आले की सरनाईक विदेशात वगैरे गेलेले नव्हते. ते मुंबईतच होते. दुपारी त्यांनी शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना कार्यालय गाठले. ते खा.संजय राऊत यांना भेटले. दीडतास बंद खोलीत दोघांनी चर्चा केली. यावेळी सरनाईक बरेच टेन्स होते असे म्हणतात.
सरनाईक यांची राजकारणातील वाटचाल विलक्षण आहे. ते एका निम्न मध्यमवर्गीय कुटुंबातून आलेले आहेत. ते मूळचे विदर्भाचे.त्यांचे वडील बाबूराव सरनाईक हे वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे. तेथून ते ४५ वर्षांपूर्वी डोंबिवलीत स्थलांतरित झाले. सरनाईक यांनी हळुहळु राजकारणात पाय रोवले. २००८ पर्यंत ते राष्ट्रवादीत होते. एकदा अजित पवार यांना त्यांनी हिरेजडित मोबाईल सेट गिफ्ट केला होता तो अजित पवार यांनी तत्काळ परत केला होता. सरनाईक यांनी पुढे शिवसेनेत प्रवेश केला. २००९ मध्ये ते विधानसभेवर पहिल्यांदा निवडून गेले आणि आता तिसºयांदा ओवळा-माजीवाडा मतदारसंघाचे आमदार आहेत. ठाण्याच्या शिवसेनेतील अंतर्गत राजकारणात ते नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे पक्षांतर्गत विरोधक मानले जातात.
सरनाईक यांच्या श्रीमंतीचा आलेख चढता आहे. ते बिल्डर आहेत आणि ठाण्यात त्यांचे अलिशान घर व कार्यालय आहे. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी संपत्तीचे जे विवरण उमेदवारी अर्जासोबत जोडले होते त्यावरून त्यांची श्रीमंती लक्षात येते. त्यांची स्थावर व जंगम संपत्ती १२६ कोटी २९ लाख रुपये इतकी आहे. ते दहावी पास असून त्यांच्यावर आठ गुन्हे दाखल आहेत. जंगम मालमत्ता २१ कोटी ८९ लाख रुपये तर स्थावर मालमत्ता १०४ कोटी ४० लाख रुपये इतकी आहे.
सरनाईक यांचे आणखी एक विदर्भ कनेक्शन आहे. त्यांचे पुत्र पूर्वेश हे ठाण्यात शिवसेनेचे नगरसेवक आहेत आणि पूर्वेश हे भाजपचे अकोल्यातील नेते डॉ.रणजित पाटील यांच्या कन्येशी विवाहबद्ध झालेले आहेत. प्रताप सरनाईक आणि माजी गृह राज्यमंत्री डॉ.रणजित पाटील हे एकमेकांचे व्याही आहेत. सरनाईक हे एकेकाळी डोंबिवलीत आटोरिक्षा चालवत असत. प्रख्यात मराठी साहित्यिक आणि जेष्ठ पत्रकार प्र. के. अत्रे यांच्या मराठा या दैनिकात सरनाईक यांचे वडील प्रूफ रिडर होते.
सरनाईक यांच्यावरील ईडी छाप्यांची तीव्र प्रतिक्रिया शिवसेनेने दिलेली आहे. ईडीच काय आम्ही कोणाच्याही बापाला घाबरत नाही.
उद्या आमचे मंत्री, आमदारांच्या घरासमोर ईडीने कार्यालयं थाटली तरी आम्ही घाबरणार नाही असे त्यांनी ठणकावून सांगितले आहे. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळाासाहेब थोरात यांनी सरनाईक यांची पाठराखण केली असून ईडीची कारवाई ही राजकीय हेतूने केली असल्याचा आरोप केला आहे.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनीही, भाजप आता राज्यात पुन्हा सत्तेत येऊ शकत नाही हे लक्षात आल्याने केंद्रातील सत्तेचा गैरवापर करून राजकीय विरोधकांना अडचणीत आणण्याच्या कारवाया सुरू आहेत, अशी प्रतिक्रिया ईडीच्या सरनाईकांवरील कारवाई संदर्भात दिली. मुंबई काँग्रेसचे माजी अध्यक्ष संजय निरुपम यांनी मात्र वेगळा सूर लावला. शिवसेनेच्या बºयाच नेत्यांनी गेल्या दहावीस वर्षांत कमावलेल्या संपत्तीची चौकशी झाली पाहिजे असे निरुपम म्हणाले.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला