जेएनयूत अफझल गुरूच्या कार्यक्रमाची परवानगी कुणी दिली होती ?

- खासदार सुप्रिया सुळेंना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील विद्यार्थ्यांचा प्रश्न

Supriya Sule Afzal Guru

पुणे :- जेएनयूत अफझल गुरूच्या फाशीच्या दिवशी घेतलेल्या कार्यक्रमाची परवानगी कुलगुरूंनी दिली होती का, असा प्रश्न खासदार सुप्रिया सुळेंना सावित्रीबाई फुले विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी विचारला आहे. रा. स्व. संघाच्या कार्यक्रमाला कुलपतींनी परवानगी कशी दिली याबद्दल विचारणा करणाऱ्या सुळे यांना विद्यार्थ्यांनी थेट प्रत्युत्तर दिले आहे.

विश्व संवाद केंद्र, पुणे आणि सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्या संयुक्त विद्यमाने ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची ओळख’ (Knowing RSS), कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. १५ फेब्रुवारी २०२० रोजी सकाळी ९ ते १ वाजताच्या दरम्यान हा कार्यक्रम होणार होता. याबद्दलची पूर्वकल्पना विद्यार्थ्यांनाही देण्यात आली होती.

मात्र, खासदार सुप्रिया सुळे यांनी ट्विट करत “सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात नेमकं काय सुरू आहे? विद्यार्थ्यांना राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यक्रमाला पाठविण्याची आयडिया कुणाची? संज्ञापन आणि वृत्तपत्र विभागात खास नोटीस काढून, वेळापत्रकात संघाशी संबंधित कार्यक्रम जाणीवपूर्वक लावला. कुलगुरूंचीही याला संमती आहे का?” असा प्रश्न आयोजकांना केला.

यावर विद्यार्थ्यांकडूनही प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली असून ‘जेएनयूत अफझल गुरूच्या फाशीच्या दिवशी झालेल्या कार्यक्रमाची परवानगी कुलगुरूंनी दिली होती का, असा प्रश्न एकाने विचारला आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मध्यप्रदेशमध्ये झालेली विटंबना, राजस्थान सरकारने स्वातंत्र्यवीर सावरकर आणि पंडित दीनदयाल उपाध्याय यांच्या प्रतिमा शाळांमधून हटवण्याचे दिलेले आदेश यावर खासदार सुळे गप्प का, असा प्रश्न विचारण्यात आला आहे.

‘knowing Rss’ या कार्यक्रमाला पत्रकारितेच्या द्वितीय वर्षाला असलेल्या विद्यार्थ्यांचा आक्षेप नव्हता. पत्रकारितेतील विद्यार्थ्यांना समाजातील विविध संस्था, संघटना, पक्ष, गट इत्यादीबाबत सखोल माहिती व्हावी या उद्देशाने सदर कार्यक्रम वेळापत्रकात समाविष्ट केलेला आहे. फक्त रा. स्व. संघच नाही तर समाजातील विविध संस्था-संघटनांचा आम्हा विद्यार्थ्यांना अभ्यास करायचा आहे. यात कोणताही मतभेद असूच शकत नाही, असे या कार्यक्रमाचे समर्थन करणाऱ्यांनी म्हटले आहे.

विविध विचारसरणी असलेल्या लोकांचा-वक्त्यांचा कार्यक्रम विभागातर्फे नेहमीच आयोजित केला जातो. विविध विचारसरणींचे आकलन विद्यार्थ्यांना होण्यासाठी आमचा विभाग नेहमीच तत्पर असतो. विभागात आतापर्यंत विविध संस्था-संघटनांचे अध्ययन झाले आहे. ज्यांनी यावर आक्षेप घेतला आहे त्यांना हा प्रश्न आहे की, पत्रकारितेचा विद्यार्थी म्हणून आम्ही आरएसएस असो किंवा इतर कोणतीही संघटना असो, यांना जाणून घ्यायचंच नाही का?

समाजातील विविध पक्ष, गट संस्था, संघटना जाणून घ्यायला आम्हाला निश्चितच आवडेल. यावर कोणीही आक्षेप घेणार नाही. झुंडशाहीने विभागावर दबाव आणून आणि विद्यार्थ्यांच्या रुंदावणाऱ्या विचारकक्षांना आडकाठी घालून कोणता ‘चिकित्सक’ समाज आपणास निर्माण करायचा आहे? विभागाचा विद्यमान विद्यार्थी या नात्याने असल्या झुंडशाहीचा मी तीव्र कठोर शब्दात निषेध करतो. आपण आत्मपरीक्षण करून आपल्या लयाला गेलेल्या सद्सदविवेकबुद्धीला पुन्हा जाग यावी अशी इच्छा व्यक्त करतो, अशी प्रतिक्रिया  विद्यापीठातील विद्यार्थी चेतन झडपे यांनी दिली आहे.

तसेच खासदार सुप्रिया सुळे यांना भाजपा प्रवक्ते अवधूत वाघ यांनी ट्विटवर त्यांना देण्यात आलेल्या प्रतिक्रिया वाचण्याचे आवाहन केले आहे.  त्यामुळे जनमत कुठल्या बाजूला आहे, याचा प्रत्यय येईल, असा सल्लाही त्यांनी दिला आहे.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचे निवेदन

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या संज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागाच्यावतीने ‘एमजेएमसी’ हा अभ्यासक्रम चालवला जातो. त्याअंतर्गत ‘वर्ल्ड व्ह्यू’ हा विषय शिकवला जातो. विद्यार्थ्यांना विविध विचारप्रवाहांची माहिती व्हावी व त्यांना सभोवतालचे योग्य प्रकारे आकलन व्हावे, या हेतूने विविध संघटनांची ओळख करून दिली जाते. या विषयात सर्वच विचारधारा व संघटनांच्या परिचयाचा समावेश आहे. ही व्याख्याने विविध ठिकाणी आयोजित केली जातात. त्याचाच भाग म्हणून विद्यार्थ्यांसाठी ‘knowing RSS’ या परिसंवादाचे शनिवारी आयोजन करण्यात आले होते. शनिवार पेठेतील मोतीबाग येथे हा कार्यक्रम आयोजित केला जाणार होता. मात्र, या व्याख्यानाला काही संघटनांनी विरोध दर्शवल्याने शनिवारचा हा कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे, अशी माहिती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या माध्यम कक्षाद्वारे देण्यात आली आहे.

कार्यक्रम होणारच!

दरम्यान, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या जनसंज्ञापन व वृत्तपत्रविद्या विभागात विविध संघटनांची माहिती देणारे कार्यक्रम, परिसंवाद, व्याख्याने आता विभागातच होणार आहेत, अशी घोषणा एका परिपत्रकाद्वारे करण्यात आली आहे.